या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

11) देवरूपी मोठी आई

समाजामध्ये काही चांगल्या, तर काही वाईट विचारांची माणसं आहेत, म्हणूनच सामाजिक समतोल राखला जातो असं म्हणतात! मात्र याहीपेक्षा देवरूपातील नव्हे, तर माणसाच्या जीवनाला दिशा देणारी देवमाणसं या पृथ्वीतलावर आजही आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, याचा प्रत्यय मला आला तो जीवनातील काही अविस्मरणीय प्रसंगांतून. मी शेतकरी कुटुंबातील! वडिलांनी पहिल्या पत्नीस अपत्य नाही म्हणून सुमारे पंधरा वर्षांनी दुसरं लग्न केलं आणि आम्ही चार मुले व तीन मुली, वडील, तसेच दोन सख्ख्या बहिणी असलेल्या आमच्या माता, असं आमचं कुटुंब. घर म्हटल्यावर थोडंसं भांड्याला भांडं लागतं खरं; मात्र यालाही आमच्या कुटुंबाचा अपवाद होता. कुटुंबातील तो जिव्हाळा, ती आपुलकी याचं महत्त्व काय, ते न्यारंच... गुण्यागोविंदानं एकत्र नांदणाऱ्या माझ्या त्या दोन मातांचं दर्शन घडलं आणि आम्ही भावंडं धन्य झालो. 

मी माणसातील पहिला देव अनुभवला तो आमच्या मोठ्या आईच्या रूपानं! आपली शेतीवाडी, धन-संपत्ती जतन व्हावी, वंशाला दिवा लाभावा, ही व अशी अनेक स्वप्नं उराशी बाळगून मोठ्या उमेदीनं त्या अटीतटीच्या काळात कायदेशीर सोपस्कार/ बाबी पूर्ण करून आपल्या पतीचा म्हणजे आमच्या वडिलांचा दुसरा विवाह आपल्या छोट्या बहिणीबरोबर करून देण्यास त्या माउलीनंच पुढाकार घेतला होता, असं गावातील जाणकार व्यक्ती, आप्तेष्ट आजही सांगतात. उराशी बाळगलेली ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या मातेनं आयुष्यभर काय कष्ट सोसले, ते मी अगदी लहान वयात अनुभवले. इतकंच नव्हे, तर असं म्हटलं जातं, की एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत; परंतु याही उक्तीला माझ्या माता अपवाद होत्या. माझ्या छोट्या आईला सवतीप्रमाणे वा बहिणीप्रमाणे नाही, तर मोठ्या मुलीप्रमाणं वागवणारी माझी मोठी आई अनोखं उदाहरणच होती. मातृत्वापेक्षा दातृत्व वा कर्तृत्व किती श्रेष्ठ असतं याचं बोलकं उदाहरण म्हणजे माझी मोठी आई! त्या काळी आमच्या छोट्या आईच्या सर्वच प्रसूतींमध्ये तिनं मोलाचं सहकार्य केलं. मात्र मळ्यात राहत असताना किती तरी स्त्रियांना या कामात मदत करताना मी तिला पाहिलंय. तिच्या या कार्याची दखल घेऊन डॉ. ठाणगे नावाच्या आरोग्य सेविकेनं तिला एक डिस्पेन्सरी बॉक्‍स देऊन विशिष्ट काही माहितीही दिली होती. असं सामाजिक कर्तृत्व असणारी आमची आई आम्हा भावंडांसाठी वेगळीच पर्वणी होती. 
छोटी आई किंवा वडील रागावले, तर मोठ्या आईनं प्रेमानं आपल्या कुशीत घ्यावं, ओंजारावं-गोंजारावं, रुसवा दूर करावा, प्रेमानं दोन घास भरवावेत. अभिमानानं "माझी मुलं गुणवान आहेत,‘ असं तोंड भरून कौतुक करावं, हे नेहमीचं होतं. ही मुलं माझी नाहीत; बहिणीची आहेत, असं अखेरच्या श्‍वासापर्यंत या माउलीला कधी वाटलंच नाही. आम्हीही आमच्या या मोठ्या आईला आई, तर छोट्या आईला ताई म्हणत असू. आई मळ्यात राहत असे. दोन चुलते आणि त्यांची मुलंही मळ्यात राहत होती. तसं प्रत्येकाचं कुटुंब वेगळं; मात्र विहीर, त्यावरील मोटार या बाबी एकत्रित होत्या. ऊस, गहू, कपाशी, घास ही व यांसारखी अनेक पिकं शेतात होती. चुलत्यांची मुलं मोठी असल्यानं शेतीच्या कामात ती कुटुंबीयांना मदत करत. आमच्या कुटुंबात मात्र आईच अगदी पुरुषाप्रमाणं रात्रंदिवस शेतीचं काम करी. घास कापणं, खुरपणी अशी कामं तर सोडाच, चक्क दोन बैलांचा नांगर चालवण्याचं कामही ती कधी-कधी करत असे. कधी-कधी आमच्या जिरायती क्षेत्रातील जमिनीमधील काटेरी झुडपं खोदण्याचं काम वडिलांबरोबर ती करत असे. आमच्या सामायिक विहिरीवरील शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दोन-दोन दिवसांच्या पाळ्या असत. त्यात कधी विजेचा लपंडाव, तर कधी इलक्‍ट्रिक मोटारचा फुटबॉल नादुरुस्तीमुळे शेण-पाणी भरण्याची वेळ म्हणून कायमच सतर्क राहावं लागे. आई मात्र न डगमगता, थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता आमच्या पाळीत ही कामं पार पाडत असे. वेळप्रसंगी रात्री-अपरात्री उंचच उंच उसाच्या शेतात कंदिलाच्या प्रकाशात उसाला पाणी भरण्यासाठी मला बांधावर उभं करून जाई. झाशीच्या राणीसारखी माझी कणखर आई परत येईपर्यंत माझ्या काळजाचा ठोका चुकलेला असायचा. तरीही मला भीती वाटू नये म्हणून मधेच आवाज द्यायची. तिच्या या कर्तृत्वाच्या जोरावरच 100-150 टन ऊस पिकवला जात होता. 

इतकंच काय, एकदा तर आम्हा छोट्या भावंडांच्या/ मुलांच्या मदतीनं एक रात्रीत आईनं एक एकर गहू पिकाची कापणी केली आणि सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्काच दिला. माझी छोटी मुलं काय करू शकतात, हेच तिला दाखवायचं होतं. त्या मुलांमध्ये सर्वांत मोठा मी! कधी गावात तर कधी मळ्यात असा माझा मुक्काम ठरलेला. मळाही सुमारे एक-दीड किलोमीटरवर. आजारी पडलो, चालून पाय दुखावले तर या माउलीनं उचलून धोतराच्या झोळीत पाठीशी बांधावं, डॉक्‍टरांकडे न्यावं, देवरूषानं दिलेली ती उदी (राखेची पूड) न चुकता भाळी लावावी, प्रेमानं तोंडावरून हात फिरवावा, "माझ्या लेकराला सुखी ठेव,‘ अशी भाबड्या मनानं परमेश्‍वराकडं प्रार्थना करावी. ते चित्र आजही डोळ्यांसमोरून हलत नाही. शाळेत जाताना खाऊ खिशात घालून द्यावा. खाऊ तो काय असणार- चुलीवरच्या तव्यावर भाजलेली ती शिळ्या बाजरीच्या भाकरीचे तुकडे, तर कधी खळ्यामध्ये (धान्याची मळणी करण्यासाठी बनवलेली टणक जागा) सर्व मळणीचं काम संपल्यावर भाजलेला हरभऱ्याचा मडक्‍यात ठेवलेला हुळा. चुलीतील निखाऱ्यावर भाजलेलं खमंग मक्‍याचं कणीस वा शेतातील लालबुंद गाजर. पण त्याची ती अवीट गोडी असायची म्हणून आम्ही भावंडं आळीपाळीनं मळ्यात राहत असू. आई तशी माळकरी. वारकरी संप्रदायाला मानणारी. कधीही मांसाहार न करणारी. मात्र, आम्हा भावंडांसाठी तिच्या हातचं मटण म्हणजे पर्वणीच असायची. मळ्यातील आईनं पाळलेल्या कोंबड्यांची अंडी तिनं कधी विकली नाहीत. आपली मुलं लवकर मोठी व्हावीत या आशेनं की काय कोण जाणे, मात्र ती अंडीही आम्हा भावंडांना खायला द्यायची. त्यामुळे मळ्यात जाण्यासाठी आम्हीही अतूर असायचो. 

मोठ्या आईचे संस्कार लाभलेली आमची ताई (सख्खी आई) आज आहे; मात्र मोठ्या आईच्या निधनानं आम्ही आईच्या प्रेमाला मुकलो, याची खंत वाटते. अशी देवरूपी आई लाभण्यासही भाग्य लागतं, ते आमच्या नशिबी होतं हेच खरं! 

आम्ही चार मुलगे, तीन बहिणी, दोन आया अन्‌ वडील असं आमचं मोठ्ठं कुटुंब. पण आमच्या मोठ्या आईनंच खस्ता खाऊन मोठ्या जिद्दीनं शेतीवाडी सांभाळून आम्हा मुलांना सांभाळलं. कष्टांची जिद्द अन्‌ संस्कारांची शिदोरी देत लहानाचं मोठं केलं.

No comments:

Post a Comment