या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

10) ‘आई’ विषयी बोलू काही…!

आयुष्यात दोन गोष्टींना कधीच पर्याय नसतो, एक आपली आई अन् दुसरी आपली प्रतिभा… इतर कोणतेही नाते, कोणतीही गोष्ट आपल्यापासून दुरावली तर परत मिळविता येते, मात्र आपली प्रतिभा आणि आपली आई आपल्यापासून दूर गेली तर कधीच परत मिळत नाही… म्हणूनच मित्रांनो या दोन गोष्टी प्रत्येकाने जीवापाड जपल्याच पाहिजेत, असा मौलिक सल्ला डॉ. सलिल कुलकर्णी यांनी आजच्या मातृदिनाच्या पार्श्‍वभूमीवर दिला आहे.
हल्लीच्या नेट सॅव्ही पिढीबद्दल बोलताना ते म्हणतात, पिढ्या बदलतात मात्र आई व मुलाचं नातं कधीच बदलत नाही. कदाचित नात्याप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्यात… हल्लीची मुले व्हॉटस अ‍ॅपवरून आईला विश करतील वा आईला ऑनलाईन गिफ्ट पाठवतील… आईविषयी गाणी, कविता ऐकून ढसाढसा रडतीलही… आईप्रती तेच प्रेम, आपुलकी आणि श्रद्धा असेल यात शंका नाही.
माझ्या मते आई हे नातं नाही तर ती एक संकल्पना आहे… नुसतं आई असणं महत्वाचं नाही, तर आईपण महत्वाचं आणि आईपण नुसत्या नात्याने येत नाही, ते तुमच्या रक्तातच असायला हवं… असं स्पष्ट करतानाच डॉ. सलिल पुढे म्हणतात, आईची मॉम झाली असली तरी तिच्यातलं आईपण हरवलेलं नाही… हेच आईपण मला सिंधूताई सपकाळ, डॉ. अनिल अवचट, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, गिरीश प्रभुणे अशा अनेक आयांमध्ये लख्ख जाणवतं.
आईविषयी संकल्पना स्पष्ट करताना डॉ. सलिल म्हणतात, ‘ कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनी बाबा गेला…’ हे रुपक असलं तरी कल्पवृक्ष लावण्याचे काम करणारी कधी आई, आजी, आजोबा, भाऊ, काका असे कुणीही असू शकतो… इथे व्यक्तीपेक्षाही नात्यात जपली जाणारी आईपणाची भावना मला अधिक संयुक्तिक वाटते. आई होण्याकरिता बाईच असायला हवं, असं नाही. समाजात कितीतरी ‘बाबा’ हे आईपण उत्तम निभावतात… मी स्वत:सुद्धा माझ्या मुलांचे आईपण निभावतो आहे. ज्या महिला नोकरी, व्यवसाय करतात त्या बाबाची जबाबदारी पेलतातच ना? प्रसंगी घर चालविण्याबरोबरच चुकणार्‍या मुलांच्या कानाखाली वाजवणार्‍या आया बाबांचाच धाक दाखवतात. आईपण ही संकल्पना नात्याच्या पलीकडे जाणारी आहे. आपल्या चुका पदरात घेणारी, पंखांना जगण्याचं बळ देणारी, तसेच गुरुस्थानी असणारी व्यक्ती म्हणजेच आई असे आपण मानतो… म्हणून संत ज्ञानेश्‍वरांचा उल्लेख आपण माऊली असा करतो, तर ‘पंढरीच्या विठोबा चरणी आपण धाव गे विठू माऊली’ म्हणत लोंटागण घालतो.
व्यक्तिगत आयुष्यातला आपला संवेदनशील नात्याचा कोपरा उलगडताना डॉ. सलिल म्हणाले, मी वयाच्या तिसर्‍या वर्षापासून हार्मोनियम वाजवतो… त्या हार्मोनियमने माझ्या यशाच्या सगळ्या स्टेजेस पाहिल्या आहेत. मला तो हार्मोनियमही गुरुच्या, आईच्या जागी वाटतो. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले… त्यानंतर माझ्या आईने (रेखाताई कुलकर्णी) मला मोठ्या हिमतीनं वाढवलं… माझ्यातली कला जोपासण्यात तिचा वाटा मोठा आहे… माझ्या आयुष्यात आईचं स्थान अत्यंत वरचं आहे…

No comments:

Post a Comment