या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

47) बायंगी

भरभराटीसाठी आणलेले बायंगी भुत मंदारला भरभरून देऊन गेले पण त्याच्या एका मागणीने मंदारचे सर्वस्व लुटून नेले. यशाचा शॉर्टकट मंदारला कसा महागात पडला याची ही कथा.
एकदा ते बायंगी बघायची मला इच्छा झाली पण त्या बाबाने त्याला लपवून ठेवण्यास सांगितले असल्याने तो विचार मी डोक्यातून काढून टाकला. रजा संपत आल्याने मी पुण्याला परत निघालो पण निघण्याआधी मंदारला थोडे सावध राहण्यास सांगितले आणि...
मी कॉलेजला असतानाची ही गोष्ट आहे. दोन तास रांगेत उभे राहिल्यावर महिन्याच्या बस पासचे ३५० रुपये होतील हे पास देणाऱ्याचे वाक्य ऐकल्यावर माझा चेहरा पडला. अचानक पासची किंमत वाढली होती आणि माझ्याकडे ५० रुपये कमी होते. आता फक्त तेवढ्यासाठी मला दुसऱ्या दिवशी परत रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार होते. हातातल्या ३०० रुपयांकडे पाहत आता काय करायचे असा मी विचार करत असतानाच एक पन्नासची नोट पुढे आली. मी मागे वळून बघितले. ‘तु तुषारचा मित्र ना? हे घे पन्नास रुपये’! माझ्या मागे रांगेत एक मुलगा ती नोट घेऊन उभा होता. मी त्याला म्हणालो, ‘सॉरी, पण मी तुला ओळखले नाही’! तो म्हणाला, मी मंदार. तुषारचा वर्ग मित्र. मी तुला तुषार बरोबर खुप वेळा बघितलय. मी ओळखतो तुला. एवढ्यात तो पास देणारा खेकसला, ‘तुला पास हवाय का नको? पास घे नाही तर बाजुला हो, उगाच माझा आणि इतरांचा वेळ फुकट घालवू नको’. मी थॅंक्स म्हणत मंदारकडुन पैसे घेतले आणि पहिला पास ताब्यात घेतला. केवळ आपल्या मित्राचा मित्र म्हणून, ओळख पाळख नसतानाही न मागताच मदत करणारा, तिही पैशांची असा हा मंदार मला खुप भावला. दुसऱ्या दिवशी ५० रुपये परत करायचे वचन देऊन आणि आभार मानुन मी त्याचा निरोप घेतला.
अशी झाली माझी आणि मंदारची पहिली भेट. पुढे ‘कॉलेज डेज’ मध्ये व्यक्तिमत्व स्पर्धा भरवली होती. मी, तुषार आणि मंदार आम्ही तिघांनीही भाग घेतला होता. तुषार पहिला रनर अप तर मी दुसरा रनर अप ठरलो. मंदारला मात्र दुसऱ्याच फेरीत बाहेर पडावे लागले. बक्षीस वितरण समारंभ झाल्यावर सर्व मुलांनी एकच जल्लोष केला. आपला लंगोटी यार तुषार, पहिला रनर अप झालेला पाहुन मंदार धावतच स्टेजवर आला आणि तुषारला त्याने घट्ट मिठी मारली. आपण स्पर्धा हरल्याच्या दु:खाचा लवलेशही कुठे दिसला नाही पण आपला मित्र जिंकल्याचा आनंद मात्र त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता. वाऽऽऽ रे दोस्ती. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहताना पाहुन माझा मित्र असुनही क्षणभर मला तुषारचा हेवा वाटला. असा मित्र मिळायला खरच भाग्य लागते. केवळ म्हणायला मित्र म्हणुन तर ढिगांनी होते पण प्रत्यक्ष सुख-दु:खात पाठीशी उभा राहील असा माझा एकही जवळचा मित्र नव्हता हे मला त्यावेळी प्रकर्षाने जाणवले. पुढे मंदारशी माझी पण मैत्री झाली. कॉलेजमध्ये भेटणे, गप्पा मारणे, बाईकवरुन फिरायला जाणे सुरु झाले. मस्त दिवस चालले होते. शेवटच्या वर्षाच्या परीक्षा झाल्या आणि कॉलेज मधील आमचे फुलपाखरी आयुष्य संपले आणि इतरांसारखी वास्तव जगातील अस्तित्व टिकवण्यासाठी आमची जीवघेणी धडपड सुरु झाली.
काही दिवसांनी मंदारचे राणी बरोबर प्रेम जुळल्याचे समजले. राणी दिसायला अगदीच सामान्य आणि खुपच बारीक होती, अगदी पाप्याचं पितर म्हणतात ना तशी, तर मंदार खुप देखणा होता. त्यांची जोडीच विजोड वाटायची. सर्वांनी मंदारला खुप समजावले पण ‘दिल आए गधी पे तो परी क्या चीज है’ अशी मंदारची अवस्था झाली होती. मंदार आपल्या मतावर ठाम होता, शेवटी आम्ही त्याला समजवायचा नाद सोडला. राणीचे वडील खुप श्रीमंत होते तर मंदारचे वडील मध्यमवर्गीय पण जमदग्नीचा अवतार. त्यांना मंदारचे प्रेम प्रकरण कळल्यावर त्यांनी खुपच आकांडतांडव केले, तेव्हा मंदार आणि राणीला पळून जाऊन लग्न करण्याव्यतिरिक्त काही उपायाच उरला नव्हता. गणपतीपुळ्याला जाउन त्या दोघांनी लग्न केले. मंदारच्या वडिलांनी त्यांच्यासाठी घराचे दरवाजे बंद केल्यामुळे दोन दिवस त्यांनी एका मित्राकडे काढले. नंतर लगेचच एक घर भाड्याने घेऊन त्यांनी आपला संसार थाटला. सुदैवाने मंदारला एकलव्य या शैक्षणिक संस्थेत नोकरी लागली होती. प्रत्येक एडमिशनसाठी दोन हजार रुपये त्याला मिळायचे. नेटाने ते संसार करू लागले. सुरवातीला सगळे ठीक होते पण दुर्दैवाने पुढे पुढे एडमिशनस् कमी मिळू लागल्या आणि खर्च भागवताना मंदारची ओढाताण होऊ लागली. साठवलेल्या पैशातून त्याने चायनीजची गाडी टाकली. दिवसभर एडमिशन मिळवण्यासाठी फिर फिर फिरायचा आणि संध्याकाळी चायनीजची गाडी चालवायचा. बिच्चारा संसाराचा गाडा ओढताना पुरता पिचुन निघाला होता पण त्याच्या चेहऱ्यावर कधी पश्चात्ताप नाही दिसला, की त्याने कधी आपल्या नाशिबाला दोष नाही दिला. खुप वाईट वाटायचे त्याचे, कष्ट तर खुप करायचा पण त्याला मनासारखे फळ काही मिळत नव्हते.
पुढे रत्नागिरी सोडुन नोकरी निमित्त मी पुण्याला आलो आणि आमचा संपर्क जवळ जवळ तुटला. जवळपास सात आठ महीन्यांनी मी रत्नागिरीला घरी गेलो होतो. संध्याकाळी समुद्रावर भेळ खात बसलो असताना कोणी तरी मला हाक मारली. आवाज ओळखीचा वाटला म्हणुन वळुन बघतो तर गर्दीत ओळखीचे कोणीच दिसेना. परत हाक ऐकू आली. आवाजाच्या दिशेने पाहातो तर मंदार मारुती एस्टीम मधुन हात हलवताना दिसला. मला तर शॉकच बसला. वर्षभरापुर्वी ज्याचे खायचे वांदे झाले होते तो आज नव्याकोऱ्या कार मध्ये बसला होता. गळ्यात सोन्याची चेन बोटात अंगठी आणि झकपक कपडे घातलेला मंदार एकदम देखणा दिसत होता. श्रीमंतीचे तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. आपले ठेवणीतले हास्य ओठांवर आणत तो कार मधुन उतरला आणि मला मिठी मारून म्हणाला, कसा आहेस? आणि कधी आलास पुण्याहून? मी त्याच्याकडे पाहातच बसलो. म्हणाला पाहतोस काय असा? ओळखलेस नाही की काय मला? कारच्या दुसऱ्या दरवाज्यातून गणेशोत्सवातल्या गौरी सारखी दागिने आणि उंची साडी नेसलेली राणी उतरली. श्रीमंती माणसाला सुंदर पण बनवते असे उगाच मला वाटुन गेले. अजुनही मी त्या धक्यातून सावरलो नव्हतो. मी म्हटले, अरे मंदार! काय लॉटरी बीटरी लागली की काय? नवीन गाडी, अंगावर एवढे सोने हा काय प्रकार आहे? ‘सांगतो, सगळे सांगतो. आधी घरी तर चल’ असे म्हणत मंदारने मला कारमध्ये बसवले. एका छानश्या घराच्या गेट समोर गाडी थांबली. गेट मधुन आत जाताना अनिमिष नेत्रांनी मी त्याचे वैभव पाहत होतो. घरासमोर छोटासा पोर्च होता, डाव्या बाजूला हिरवीगार लॉन केली होती, त्यावर स्प्रिंकलर बसवले होते. लॉनच्या कडेला एक कारंजे होते ज्यात मध्यभागी एक जलपरी होती आणि साइडने चार डॉलफिन मासे बसवले होते. त्या माशांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या जलधारांमधे ती जलपरी न्हाऊन निघत होती. मंदारच्या आवाजाने मी भानावर येत घराच्या पायऱ्या चढत दीवाणखान्यात आलो. घर एकदम मस्त सजवले होते. आत तीन पॉश अटॅच्ड बेडरूमस्, एक किचन आणि ऐसपैस हॉल होता. सगळ्या आधुनिक सेवा आणि दिमतीला नोकर-चाकर हजर होते. मला सोफ्यावर बसायला सांगुन राणी चहा नाश्त्याचे बघायला किचन मध्ये गेली. इतका वेळ दाबुन ठेवलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. माझी अधीरता ओळखुन मला फार काळ ताटकाळत न ठेवता मंदार बोलू लागला.
अरे तुला माझी अवस्था तर माहीतच होती. एकीकडे एडमिशनस होत नव्हत्या आणि दुसरीकडे चायनीजचा धंदा पण होत नव्हता. चौकातच ८ चायनीजच्या गाड्या लागल्यावर काय धंदा होणार? असाच एक दिवस गिऱ्हाइकाची वाट पाहत बसलो असताना माझा कॉलेजचा एक मित्र चायनीज खायला आला. सहज गप्पा मारताना मी त्याला माझी परिस्थिती सांगितली तसा तो मला म्हणाला की, १० हजार रुपये खर्च करू शकत असशील तर एक उपाय आहे. तुझे नशीब पालटलेच म्हणुन समज. १० हजार म्हटल्यावर मी गप्पच बसलो. तो म्हणाला की माझ्या बरोबर लांज्याला चल, तिथे एक माणुस आहे जो बायंगी भुत देतो, तु जे मागशील ते भुत तुला देईल. हो-नाही करत मी तयार झालो. म्हटले एकदा जाऊन भेटायला काय हरकत आहे? पुढच्या पौर्णिमेला तो मला लांज्यातील एका माणसाकडे घेऊन गेला. झोपडीवजा त्याचे घर पाहुन मला शंका आली. जर हा लोकांचे एवढे भले करतो तर याची ही अवस्था का? पण काही न बोलता मी मित्रासोबत आत गेलो. आतमध्ये साधारण पन्नाशीचा एक माणुस कॉटवर बसला होता. आम्हाला पाहताच त्याने समोरच्या मोडक्याशा खुर्च्यांवर बसायला सांगितले. काही वेळ माझ्या चेहऱ्याकडे तो एकटक पाहात राहिला जणू काय माझा चेहराच वाचत होता. पाच एक मिनिटांनी तो म्हणाला की तुम्हाला बायंगी धार्जिणे नाही, द्यायला ते तुम्हाला भरपूर काही देईल, पैसा अडका, गाडी, सुख; जे म्हणाल ते देईल पण नंतर तुमच्याकडे ते आपली इच्छा पूर्ण करण्याची विनंती करेल ती पुर्ण करण्यास जर का तुम्ही चुकलात तर मग ते तुम्हाला त्रास देईल आणि तो साधा सुधा नसेल. त्यामुळे तुम्ही बायंगी न नेलेलेच बरे. असे म्हणुन त्या माणसाने आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. पण खुप गयावया केल्यावर तो बायंगी द्यायला तयार झाला. पुढच्या पौर्णिमेला १० हजार घेऊन या आणि सोबत बायंगी घेऊन जा पण लक्षात ठेवा झटपट मिळालेले शाश्वत नसते तर आयुष्यासारखेच क्षणभंगुर असते.
माझ्याजवळ १ महिना होता, त्यात मला १० हजारांचा जुगाड करायचा होता. मग बायकोचे मंगळसुत्र गहाण ठेवले तरी ५ हजार रुपये कमी पडत होते मग चायनीजची गाडी विकून आणि थोडे मित्रांकडून उसने पैसे घेऊन १० हजार रुपये जमवले आणि ठरल्याप्रमाणे पौर्णिमेला त्या माणसाकडे गेलो. त्याने मला एका रिंगणात बसवले अंगावर एक पंचा घ्यायला सांगितले नंतर नजर लागू नये म्हणुन दारावर लिंबू मिरची सोबत काळी बाहुली बांधतात तशीच पण पांढऱ्या कापडाची एका बाहुली त्याने माझ्या बाजूला बसवली त्याने तिच्या पण अंगावर छोटे पंचासारखे वस्त्र ठेवले नंतर माझ्या आणि त्या बाहुलीच्या कपाळाला कसला तरी काळपट लालसर टिळा लावला. नंतर धारीवाले एक लिंबू त्याने हातात धरले आणि डोळे मिटून काही मंत्र वगैरे पुटपुटु लागला. नंतर त्याने ते लिंबू उभे चिरले आणि त्या बाहुलीवर पिळले त्याबरोबर त्या बाहुलीत हालचाल होऊ लागली. ते पाहुन मी चांगलाच टरकलो पण त्याने मला न हलण्यास सांगितले. ती बाहुली आता भारली गेली होती. त्याने तिच्याकडे पाहत परत काहीतरी पुटपुटायला सुरवात केली आणि माझ्याकडे बोट केले तसे त्या बाहुलीने मान वळवून माझ्याकडे पहिले. तो प्रकार पाहुन मला चांगलाच घाम फुटला होता. जसे त्याचे अनुष्ठान संपले तसे ती बाहुली पुन्हा निर्जीव झाली. माझ्या हातात ती बाहुली देऊन त्याने मला ती कोणाला न दाखवता घरात लपवून ठेवण्यास सांगितले. त्याला १० हजार रुपये देवून आम्ही निघणार तोच त्याने मला थांबवले म्हणाला की, ‘त्या बायंगीने सांगितलेली प्रत्येक इच्छा जर का तु पुरी करू शकलास तर मग पुढे तुला कधीच मागे वळून बघायची गरज नाही पण ते शेवटी एक भुत असल्यामुळे त्याची इच्छा अमानवीय असण्याचीच जास्त शक्यता आहे तेव्हा थोडे सांभाळून’. आणि अशा प्रकारे मी त्याला घरी घेऊन आलो आणि आज हे सगळे वैभव आहे. दोन्ही घरात आम्हाला आता यायची-जायची परवानगी आहे. आणि त्या बायंगीच्या मागण्या अगदीच शुल्लक आहेत. दर पौर्णिमेला कधी कोंबड तर कधी नारळ कधी मटन. तर हे सगळे असे आहे बघ.
मी सगळे शांतपणे ऐकले पण माझी सुई त्या बायंगीच्या अमानवीय मागणीवरच अडकली होती. त्याने असे काही मागितले जे मंदार देवू नाही शकला तर पुढे काय? हा प्रश्न मला छळु लागला. मी तसे त्याला बोलुनही दाखवले पण त्याने माझे म्हणणे उडवून लावले तो म्हणाला तु उगाचच काळजी करतोयस, त्याने तसे काहीच मागितले नाही आजपर्यंत. पण याचा अर्थ तो पुढे मागणार नाही असे नाही होत. मी माघार घेत नाही हे पाहुन त्याने बघु रे मागेल तेव्हा, तु चहा तर घे पाहू आधी, म्हणत विषयाला बगल दिली. माझे मन आतुन ओरडून ओरडून सांगत होते की काहीतरी अनिष्ट घडणार आहे. पण त्यावेळी मी गप्प बसणेच उचित समजलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मंदारला समुद्रावर भेटायला बोलवले. थोडा नाखुशीनेच तो आला. “कालचा विषय काढणार असशील तर मी निघतो” आल्या आल्याच तो म्हणाला. मी नाही काढणार म्हटल्यावर तो बसला. थोडा वेळ कोणी काहीच बोलले नाही. मग न राहवुन तो म्हणाला, बोल काय बोलायचे आहे तुला ते. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्याला विचारले, “हे बायंगी काम कसं करतं? म्हणजे ते तुला श्रीमंत कसे बनवते?” तो म्हणाला. ‘ते आपल्या साठी सर्व काही अनुकुल करते. पैश्याची संधी उपलब्ध करुन देते. आधी त्याने माझ्या सासऱ्याला आणि बापाला नरम केला त्यामुळे दोघांचा मला सपोर्ट मिळाला. एक बिझनेस प्रपोझल चालून आले, त्यात गुंतवायला सासऱ्यांनी भांडवल दिले. तिप्पट फायदा झाला. सासऱ्याचे पैसे परत केले. सट्टयामधे पैसे लावले तिथे पाचपट कमावले. असे करत करत शॉर्टकटने आज इथे पोहोचलो. बिघडलेल्या नाशिबाला सुधारायचे काम ते भुत करते’. अरे पण असे शॉर्टकटने कमावलेले टिकत नाही मित्रा त्याची खुप मोठी किंमत चुकवावी लागते, मी म्हणालो. अगदी त्या बाबासारखाच बोलतोस हा तू पण! अरे माझी बायको उपाशी होती घरातच काय चायनिजच्या गाडीवर शिजवून लोकांना खायला घालायला पण अन्न शिल्लक नव्हतं. मग मला जे योग्य वाटले ते मी केले. तु म्हणतोस ते अगदी बरोबर आहे रे, पण पोटच्या भुके पुढे हा विचार माझ्यासाठी क्षुल्लक होता. मंदार भावुक होवून रडु लागला तसा मी अजुन काही बोलण्यात अर्थ नाही हे समजून गप्प बसलो.
एकदा ते बायंगी बघायची मला इच्छा झाली पण त्या बाबाने त्याला लपवून ठेवण्यास सांगितले असल्याने तो विचार मी डोक्यातून काढून टाकला. रजा संपत आल्याने मी पुण्याला परत निघालो पण निघण्याआधी मंदारला थोडे सावध राहण्यास सांगितले आणि अशीच काही आवाक्याबाहेरील मागणी जर भूताने केलीच तर लगेच नाही म्हणू नकोस तर थोडा वेळ मागुन घे असे सांगितले. शक्य असेल तर ते भुत वेळीच परत कर, कमावलेस ते पुष्कळ आहे. आता हा शॉर्टकट बस झाला. ठीक आहे बघु कसे काय ते, म्हणुन माझा त्याने निरोप घेतला. पुढे कामाच्या व्यापात तीन चार महिने रत्नागिरीला जाणे जमले नाही आणि एक दिवस अचानक तुषारचा मला फोन आला आणि ती दु:खद बातमी कळली. मंदारचा शून्यात हरवलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. शेवटी बायंगीने आपला डाव साधला होता. माझ्या मनाने दिलेला कौल दुर्दैवाने खरा ठरला होता.
CL टाकून मी तातडीने रत्नागिरीला आलो. आलो तो तडक मंदारच्या घरी गेलो. मंदारच्या घरावर अवकळा पसरली होती. घरी पांढऱ्या कपड्यात खुपसे लोक जमले होते. सर्वांच्याच चेहऱ्यावर दु:ख दिसत होते. घरात गेलो असता मला समोरील भिंतीवर चंदनपुष्पांची माळ घातलेला राणीचा फोटो दिसला आणि काळजात चरर् झाले. माझे डोळे मंदारला शोधत होते. आतल्या एका बेडरूम मध्ये शून्यात नजर लावून तो एकटाच बसलेला मला दिसला. मी त्याच्याकडे जाणार इतक्यात तुषारने मला अडवले. मी त्याला विचारले की नक्की काय झाले. तो म्हणाला, “बाजुला चल सांगतो. गेल्या पौर्णिमेला मंदारकडे त्या बायंगीने राणीचा बळी मागितला. मंदार ही मागणी ऐकताच एकदम भडकला आणि त्या भुतावर धाऊन गेला. त्याला शिव्या देत इथुन चालता हो वगैरे रागात वाट्टेल ते बोलला. काही न बोलता ते भुत तिथून गायब झाले. मंदारला वाटले की आता काही काळजी नाही बहुतेक ते भुत त्याचे घर सोडुन कायमचे निघुन गेले पण वस्तुस्थिती तशी नव्हती. बरोबर रात्री १२ वाजता राणीच्या पोटात असह्य कळा सुरु झाल्या. वेदनेने ती गडाबडा लोळु लागली. तिची आतडी पिळवटुन निघत होती. नंतर तिचा गळा कोणी तरी प्रचंड ताकदीने दाबत असल्याचे तिला जाणवले. तिला श्वास घेता येईना, एकदम घुसमटल्यासारखे झाले. छातीवर मणामणाचे ओझे ठेवल्यासारखे ती तडफडत होती. मंदार लाचारपणे ते सगळे पाहात होता. राणीची मदत तोच काय पण आता कुणीच करू शकणार नव्हते. डॉक्टर आले, त्यांनी तिला झोप लागावी म्हणुन इंजेक्शन दिले पण काहीच फरक पडला नाही. मंदारने त्या बाबाला फोन केला तेव्हा तो काहीही करण्यास असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. मी आधीच तुम्हाला सावध केले होते पण तुम्ही माझे ऐकले नाहीत. आपली ईच्छा पुर्ण केल्याशिवाय ते भुत स्वस्थ बसणार नाही. पौर्णिमेच्या आधी जर का तुम्ही त्याला मुक्त केले असते तर कदाचित काही करता आले असते पण आता वेळ निघुन गेली आहे. तुम्ही त्याला जायला सांगितले असल्यामुळे त्याची ईच्छा पुरी झाल्यावर ते तिथुन निघुन माझ्याकडे परत येईल. तुमच्या नुकसानाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्या व्यतिरिक्त मी काहीही करू शकत नाही. असे म्हणुन फोन कट झाला. थोड्याच् वेळात राणीची प्राणज्योत मालवली”
मी मंदारच्या बेडरूम मध्ये जड पावलानी गेलो. मला पाहताच मंदार मला घट्ट बिलगला आणि ढसा ढसा रडु लागला. रडता रडता म्हणाला तुझे मी ऐकायला हवे होते रे! जिच्यासाठी मी हे सगळे केले त्या माझ्या लाडक्या राणीचाच त्याने बळी मागितला. तुझे ऐकले असते आणि वेळीच ते परत दिले असते तर आज माझी राणी कदाचीत जिवंत असती. तिच्याबरोबर माझे बाळ पण गेले रे! मी आता जगुन काय करू? कोणासाठी जगु? म्हणुन त्याने हंबरडा फोडला. त्याची ती अवस्था बघुन माझा जीव तीळ तीळ तुटला पण जे घडु नये ते घडले होते. यशासाठी वापरलेल्या शॉर्टकटने मंदारचे सर्वस्व लुटुन नेले होते.

मागील लेख वाचा

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete