या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

45) मानकाप्या

मित्रांनो ही कथा बाबा कोळेकर यांच्या बाबतीत घडलेली आहे.
नाटक सुटल्यावर मध्यरात्री १२.३० वाजता परत येत असताना पर्यातून (पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी बनवलेला मोठा उघडा टनल) कोणाच्या तरी कण्हण्याचा आवाज ऐकून सावध झालेल्या बंड्या पवार आणि त्याच्या मित्रांनी घाबरत पर्यात वाकून बघितले, अंधारात कोणी व्यक्ति उपडी पडून त्यांच्याकडे आपला हात पुढे करत असताना त्यांना दिसली. कंदीलाच्या प्रकाशात डोक्याला मार लागून अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या बाबा कोळेकराला पाहुन बंड्या पवाराच्या पाठीतुन थंड शिरशिरी गेल्याचे त्याला जाणवले. लगेच सगळ्यानी पर्यात उड्या टाकून बाबा कोळेकराला अलगद उचलून त्याच्या घरी आणले. आपल्या पोराची ती अवस्था पाहुन बाबा कोळेकराच्या माऊलीने टाहो फोडला. भीतीने बोबडी वळलेल्या आणि पांढर्‍या फटक पडलेल्या बाबा कोळेकराच्या डोळ्यांकडे पाहताना सर्वांच्या उरात धडकी भरली होती आणि त्याची ही अवस्था कशी झाली या विचाराने सर्वांचेच चेहरे काळवंडले होते. बाबाला सणकून ताप भरला होता. आठवडाभर औषध-पाणी आणि सेवा सुश्रुषा केल्यावर बाबा जरा सावरला. त्याच्या बाबतीत काय घडले हे जाणून घेण्यासाठी पूर्ण आळी जमा झाली होती.
आमराईपाशी कशाला तरी अडकून मी धाडकन खाली पडलो. हातातील कंदील दूर फेकला गेला आणि विझला. झाडाचा आधार घेत कसाबसा उभा राहिलो, सगळे अंग सडकून निघाले होते.
त्या रात्री काय झाले ते बाबांच्या शब्दात
नाटक फारच रटाळ वाटल्यामुळे बंड्याला आणि इतर मित्रांना सांगून मी अर्ध्यावरच नाटक सोडून घरी निघालो. काळोख्या रात्रीत कंदीलाच्या प्रकाशात मी एकटाच घराच्या दिशेने झप झप पावले टाकीत वेगाने चालत होतो. आमराईपाशी कशाला तरी अडकून मी धाडकन खाली पडलो. हातातील कंदील दूर फेकला गेला आणि विझला. झाडाचा आधार घेत कसाबसा उभा राहिलो, सगळे अंग सडकून निघाले होते. अंधारात कंदीलही कुठे दिसेना मग तसाच ठेचकाळत, चाचपडत मी घराच्या दिशेने जाऊ लागलो. रातकिड्यांची किरकीर, घुबडाचे घुत्कार ऐकून भिती वाटू लागली होती. झक्‌ मारली आणि एकटा निघालो असे वाटू लागले. राम नामाचा जप करत कसाबसा पर्यापाशी येवून पोहोचलो आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला. पालापाचोळा गोल घुमत वर जाऊ लागला. मला काहीतरी विचित्र आहे असे जाणवू लागले वार्‍याचा जोर एवढा वाढला की मी त्याच्या बरोबर उडून जातो की काय असे वाटू लागले. इतक्यात ‘तुला आता सोडणार नाही’, असे बोबडे शब्द माझ्या कानात शिरले. माझी भीतीने गाळण उडाली. आता आपण काही वाचत नाही असे वाटून मी स्वतःला पर्यात झोकून दिले. माझ्या मानेला कोणाच्या तरी बोटांचा स्पर्श ओझरताच पण अगदी स्पष्ट जाणवला आणि मी पर्यातील कोरडया पात्रात दाणकन आपटलो आणि बेशुद्ध झालो. शुद्ध हरपताना ते बोबडे शब्द परत ऐकू आले, ‘वाचलास तू’!
सगळे जण श्वास रोखुन बाबाची कहाणी ऐकत होते. एकदम शांतता पसरली होती. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. मग जुन्या जाणकार मंडळींपैकी नानु गुरव बाबाला म्हणाले, ‘पोरा त्या रात्री अमावस्या होती आणि तुझ्या आई वडिलांची पुण्याई व तुझी वेळ चांगली म्हणुन तू वाचलास. तुला ज्याने त्या रात्री धरायचा प्रयत्न केला तो मानकाप्या होता. तुझ्या मानेला जो बोटांचा स्पर्श झाला तो त्या मानकाप्याच्याच् बोटांचा होता. मानकाप्याला मान नसते आणि तो आपले दोन्ही हात वेगाने कात्री सारखे फिरवत जातो आणि त्याच्या हातात ज्याची मान सापडते ती कापली जाते.’
एका क्षणात बाबाच्या डोळ्या समोरून झालेला प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा तरळुन गेला आणि त्याच्या शरीरावर काटा उभा राहिला. एका मोठ्या संकटातुन वाचल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले आणि रात्री अपरात्री पुन्हा एकटे न फिरण्याची शपथ घेतली.


मागील लेख वाचा

No comments:

Post a Comment