या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

44) समंध

कन्याकुमारीचे भाडे संपुन कधी एकदा शहनाजला भेटतो असे सचिनला झाले होते. सचिनची मारुती ओमनी त्याने भाड्याने लावली होती आज १५ दिवसानंतर तो त्याच्या लाडक्या शहनाजला भेटणार होता. होय, सचिन हिंदू होता तर शहनाज मुस्लिम तरीही त्यांच्यामधे प्रेम फुलले होते. शहनाज सचिनच्या मित्राची, सलिमची बहिण होती. सचिन आणि सलिमचे एकमेकांकडे नेहमी जाणे येणे होते. सतत होणाऱ्या भेटीमुळे हळूहळू सचिन आणि शहनाज एकमेकांकडे आकृष्ट झाले. सुदैवाने सलीमचा आणि त्याच्या घरच्यांचा या नात्याला विरोध नव्हता पण सचिनच्या घरून मात्र याला प्रचंड विरोध होता. आपली बहिण आपल्या मित्राची पत्नी होणार याचा सलिमला आनंदच होता कारण सचिन एक चांगला मेहनती आणि सुस्वभावी मुलगा होता आणि तो त्याच्या घरचा सदस्य असल्यासारखाच वागायचा त्यामुळे मोहल्ल्यातही तो सगळ्यांना आवडायचा.
सचिन परत आल्यावर तडक शहनाजला भेटायला गेला. शहनाजच्या घराबाहेर जमलेली गर्दी पाहुन त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सचिनला आलेले पाहुन सलीम घराबाहेर आला आणि त्याला मिठी मारून रडु लागला, त्याने सचिन आणि गोंधळला. सलिमचा आवेग ओसरल्यावर सचिनने त्याला विचारले की, ‘काय झालंय?’, तेव्हा सलिमने त्याला बाजूच्या घरी नेले तिथे शहनाज उदास बसली होती. सचिनला पाहताच तिला भरून आले पण सलीम समोर असल्याने तिने स्वत:ला सावरले.
त्याचे झाले असे की, सलिमची पत्नी सलमा आणि शहनाज एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न झाल्यावर परत येत असताना सलीमच्या पत्नीला खुप जोरात लघुशंका लागली. असह्य झाल्याने एका आडोशाला तिने उरकुन घेतले आणि तिथेच घात झाला. एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली. त्या आवाजाने सलीम जागा झाला आणि तिला काय झाले ते पाहायला त्याने लाइट लावला तर तिला पाहुन त्याची बोबडीच वळली. सलमाचे डोळे पूर्ण फिरले होते, आतील बुब्बूळ गायब होऊन फक्त पांढरे डोळे दिसत होते. हे एवढ्यावरच थांबले नाही तर तिचे हात पाय उलटे फिरले होते आणि ती भिंतीवर उलटी चढत जाउन छताला चिकटली आणि दात दाखवत भयाकारी आवाजात हसत होती.
हा सगळा गोंधळ ऐकून सलिमचे आई - वडील काय झाले ते पाहायला आले आणि समोरचे दृश्य पाहुन दारातच थिजल्यासारखे झाले. त्यांच्या पाठोपाठ शहनाज पण तिथे आली आणि आपल्या वहिनीची अवस्था पाहुन मोठ्याने किंचाळली. शहनाजला आलेले पाहताच सलमाने आपली मान विचित्र पद्धतीने फिरवली जणू काही तिच्या मानेत मणकेच नव्हते आणि फार भयंकर आवाजात विक्राळ हास्य करत पुरुषी आवाजात म्हणाली की, ‘अब तुम्हारी बारी। में तुम्हे भी नहीं छोड़ूंगा सलमा के साथ तुम्हे भी ले जाऊँगा’।
हा सगळा गोंधळ ऐकून आजुबाजूचे शेजारी गोळा झाले. सलमाची अवस्था पाहुन सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. काहीजणांनी धीर करून सलमाला बेड वर दोरीने बांधून टाकले पण ती कोणालाच आवरत नव्हती, तेव्हा शेजारच्या डॉक्टर सय्यदनी तिला झोपेचे स्ट्रॉंग डोस असलेले इंजेक्शन दिले तेव्हा कुठे ती कंट्रोल मध्ये आली. सुरक्षेसाठी शहनाजला शेजारच्या घरात नेऊन ठेवले होते. हे सगळे ऐकून सचिन एकदम सुन्नच झाला. आता पुढे काय असा विचार करत असतानाच बाहेर गलका ऐकू आला म्हणून ते तिघे बाहेर आले. इकडे इंजेक्शनचा परिणाम ओसरल्यावर सलमा शुद्धिवर आली आणि त्या समंधाने तिच्या शरीराचा परत ताबा घेतला. सलमा पुन्हा आवरेनाशी झाली आणि शहनाज कुठाय असे विचारू लागली. शहनाज तिच्या बुवाकडे म्हणजे आत्याकडे गेली आहे असे सांगताच तो समंध सलमाच्या तोंडून आपल्या पुरुषी आवाजात खदखदा हसत म्हणाला, ‘तुम झूठ बोल रहे हो, वो सचिन के साथ बाजुके घर में है। मैं उस सचिनको भी नहीं छोड़ूंगा। शहनाज सिर्फ मेरी है’। हे ऐकल्यावर तिथे आलेल्या हाकिम चाचानी भूत उतरवणाऱ्या इमामाला लवकरात लवकर घेऊन यायला सांगितले.
तासाभरात तो इमाम तेथे आपले साहित्य घेऊन आला. काही मजबूत तरुणांना आणि सलिमला आपल्या बरोबर घेऊन तो सलमाच्या खोलीत गेला त्याला पहाताच सलमा अत्यंत क्रोधित झाली आणि त्याला तिथून निघुन जायला सांगू लागली पण त्या इमामाने तिचे न ऎकता दरवाजा लावून घेतला व सर्व दारे खिड़क्या लावून घेऊन त्या तरुणांना सलमाला धरून ठेवायला सांगितले. सलीमला आपल्या बेगमची अवस्था पाहवत नव्हती पण त्या इमामावर विश्वास ठेवून तो जे सांगेल तसे वागत होता. आता त्या इमामाच्या मंत्रानी आपला प्रभाव दाखवण्यास सुरवात केली, सलमा प्रचंड तडफडु लागली. आपल्या जवळील राख तिच्या कपाळावर लावताच त्या समंधाने सलमाचे शरीर सोडले व आपल्या मूळ रुपात त्या इमामा समोर आला. तो साधारण ६ - ६.५ फुट उंच होता पण त्याला चेहरा असा नव्हताच, डोक्यापासून पायपर्यंत लांबच लांब केसच केस होते. पुढच्याच क्षणाला तो त्या इमामावर झेपावला आणि त्या दोघात तुंबळ युद्धच् सुरु झाले. तो इमाम खुप रक्तबंबाळ झाला होता आणि सगळे डोळे वासुन ती लढाई बघत होते पण शेवटी इमामाने आपल्या शक्तिने त्या समंधावर विजय मिळवला आणि मंत्रानी त्याला सोबत आणलेल्या बाटलीत भरले.
तो समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला पण त्या इमामाने वेळीच बाटलीचे झाकण लावून त्याला बाटलीत बंद करून टाकले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. थोड्या वेळाने सलमा शुद्धिवर आली. ते पाहाताच सलिमने तिला घट्ट मिठीत घेतले आणि सलमाने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. त्या रूम मधुन बाहेर आल्यावर त्याने ती बाटली सर्वांना दाखवली. त्या बाटलीमध्ये त्या समंधाला पाहुन लोक खुप घाबरले पण आता तो समंध काही करु शकणार नाही हे जाणून ते उत्सुकतेने त्याला पाहायला गर्दी करू लागले काही अघटित घडू नये यासाठी ती बाटली त्या इमामाने समुद्रावर नेऊन खोल खड्डा खणुन पुरुन टाकली.
पुढे सचिन आणि शहनाजचे लग्न झाले. सचिनने आपले घर सोडले आणि त्या दोघांनी एक घर भाड्याने घेऊन आपला छोटासा संसार थाटला. पुढे शहनाजला एक गोड मुलगी पण झाली. परत कधी त्या समंधाचा तिला किंवा सलमाला त्रास झाला नाही.

मागील लेख वाचा

No comments:

Post a Comment