या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१५) सत्पुरुष

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आपल्या भारत देशामध्ये एक फार मोठा परोपकारी संत राहात होता. तो सर्व जनतेला, प्राणिमात्राला परमेश्‍वर मानीत होता आणि त्यांची सेवा करीत दीनदुबळय़ांना मदत करीत होता. संकटात सापडलेल्यांना धीर देत होता. चुकीच्या मार्गावरून जाणार्‍या लोकांना योग्य मार्गदर्शन करीत होता. काही लोक त्याची निंदा करीत असत, तरी तो त्यांच्यावर उपकार करीत होता. हा त्याचा जन्मजात स्वभाव होता. आपण काही पुण्यकर्म करीत आहोत, असे त्याला बिलकुल वाटत नव्हते. हे आपले कर्तव्य आहे, असे तो मानीत होता. आभाळातील सूर्य, चंद्र स्वाभाविकपणे जसे प्रकाश देतात तसाच तो संत मानवतेचे दर्शन करीत होता.
स्वर्गातील देवसुध्दा अशा आदर्श महापुरुषाला वंदन करीत होते. अशा महात्म्याला काहीतरी वरदान द्यावे म्हणून प्रत्यक्ष परमेश्‍वर त्याच्याकडे आला.
त्या देवाने त्या संताची मधुरवाणीने प्रशंसा केली आणि तो म्हणाला, 'हे नररत्ना! या कलियुगात तुझं जीवनकार्य पाहून आम्ही सर्व देव मंत्रमुग्ध झालो आहोत. मी प्रत्यक्ष देव आहे. मी तुला कोणतं तरी वरदान देऊ इच्छितो. तू काहीही माग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.'
तो संत हसला आणि म्हणाला, 'मी जी सेवा करीत आहे त्याबद्दल मला कुठलाही पुरस्कार मिळावा, अशी माझी इच्छा नाही. मी दयेचे कर्तव्य करीत आहे आणि त्यामुळे माझा अंतरात्मा तृप्त झाला आहे. मला आपल्यापासून कोणत्याही दैवी शक्तीची अपेक्षा नाही.'
देव म्हणाला, 'मग हे सारं जग तुझी पूजा करेल, अशी मी व्यवस्था करतो.' 
'नको. नको देवा. लोकांनी माझी देवपूजा करावी अशी माझी इच्छा नाही. मी साधा माणूस आहे. लोक माझी पूजा करू लागतील, तर ते तुझ्यासारख्या परमात्म्याला विसरून जातील आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात फार मोठं दु:ख भोगावं लागेल. मला देवाचं पद मुळीच नको.'
'मग तुला काय हवे?'
तो संत म्हणाला, 'आपण मला सर्व काही दिले आहे. आता मला कशाचीही अपेक्षा नाही.'
'पण आम्ही सर्व देवांनी तुला या जगात चमत्कार करणारी शक्ती द्यायची असा निश्‍चय केलेला आहे.'
तो संत काही क्षण गप्प राहिला आणि म्हणाला, 'हे देवा! मी माझ्या आयुष्यात निष्काम सेवेचे व्रत घेतलेले आहे. आणि मला माझ्या कर्माचे कोणतेही फळ नको. मी कुणावर उपकार करीत आहे, असे मला कधीही वाटले नाही. आपण मला विशेष शक्ती दिली, तर कदाचित माझ्या मनात अहंकार निर्माण होईल.'
देव म्हणाला, 'तुझं कार्य सिध्द होईल आणि तुझ्या मनामध्ये कुठलाही विकार निर्माण होणार नाही, असे काहीतरी माग. मी तुला काहीतरी वरदान दिल्याशिवाय येथून सोडणार नाही.'
तो संत म्हणाला, 'ठीक आहे, देवा. माझ्याकडून सर्वांचे कल्याण होईल अशी मला शक्ती द्या. पण त्याबद्दल मला कधीही गर्व वाटता कामा नये.' देव म्हणाला, 'तथास्तु. तुझ्या मनाप्रमाणे होईल.'
एवढे बोलून देव अंतर्धान पावला. त्या साधूला देवाने दिव्य शक्ती दिली, पण त्याबद्दल त्याला किंचितही गर्व झाला नाही. तो नेहमीप्रमाणे जनसेवा करीत राहिला.
त्याला दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे त्या संताचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात दिसू लागला. त्याची सावली जिथे पडत होती तिथल्या प्रत्येक वस्तूमध्ये नवीन प्राण येत होता. सुकलेले झाड आपोआप हिरवेगार होत होते. बिनपाण्याचा तलाव आपोआप भरत होता. दु:खी मानव आनंदी होत होता. त्या संताला या चमत्काराचा पत्तासुध्दा लागत नव्हता. तो अत्यंत विनम्र भावाने सर्वांची सेवा करीत होता. पण जनता त्याच्या चमत्कारामुळे त्याला 'सिद्धमहात्मा' म्हणून मानू लागली. अनेक लोक त्याचे भक्त झाले. सर्व समाज त्याला ईश्‍वराचा अवतार मानू लागला.
दैवी शक्ती मिळाल्यानंतरही आपल्या पूर्वीच्या सेवाव्रतामध्ये त्या संताने काहीही बदल केला नाही. तो खरा सत्पुरुष होता. असे संत, असे साधू या कलियुगात फारच विरळ असतात.