या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२६) विषारी आयुष्याचं झालं अमृत

संगीता चौदा वर्षांची असताना वेश्या व्यवसायात ढकलली गेली. मुलं झाली, दारूचं व्यसन लागलं, पण तिला भेटले देवदूत. त्यांनी तिला त्यातून बाहेर काढलं. आज ती वेश्यांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काम करते आहे. ५५ जणींना या व्यवसायातून बाहेर काढणाऱ्या, दहा जणींची लग्नं लावणाऱ्या, अनेकींना स्वाभिमानाने छोटे-मोठे उद्योग करायला मदत करणाऱ्या, स्वत:च्या विषमय आयुष्यातून बाहेर पडून इतरांच्या जगण्याचं अमृत करणाऱ्या संगीता शेलार यांना आमचा मानाचा मुजरा..
‘‘बाई, तू कशापायी अस्सं काम करतीय? जोवर जवानी आहे, शरीर साथ देतंय तोवर ठीक हाय. पण नंतरच्या आयुष्याचा विचार कर. तू दुसरी किती तरी कामं करू शकते. यातून बाहेर पड. बाई, मानानं जग.’’ संगीताताई वेश्या व्यवसायातल्या अनेकींना हे समजावत असते. तिच्यासारखी वेळ कुणावर येऊ नये म्हणून ती अविरत झगडते आहे. आणि त्याचं फलस्वरूप अनेकींनी हा व्यवसाय सोडलाय. अनेक जणी स्वाभिमानानं उदरनिर्वाह करताहेत, तर काहींची लग्नंही झालीत. हे सगळं करणारी संगीता शेलार. कोपरगाव इथं स्नेहालय संस्थेच्या वेश्यांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या ‘स्नेहज्योत मुक्ता’ प्रकल्पात क्षेत्रीय अधिकारी म्हणून सध्या काम पाहतेय.
वय जेमतेम चौदा. कोपरगाव येथे राहणाऱ्या अल्लड वयातल्या संगीताला घराजवळच्याच गल्लीत रहाणाऱ्या एका मुलीनं फसवून, भुलवून नगरला आणलं. संगीताची स्वप्नं वेगळी होती, पण इथं आल्यावर त्या स्वप्नांचा चुराडाच झाला. कारण तो परिसर होता वेश्यांचा. तिला एका खोलीमध्ये कोंडून ठेवण्यात आलं. मालकिणीचा तिच्यावर सततचा पहारा होता. जवळ जवळ चार महिने ती तिथे होती.
‘स्नेहालय’चे कार्यकर्ते तिथं वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मधून मधून जायचे. त्यांना संगीताची कहाणी समजली. डॉ. गिरीश कुलकर्णी व यशवंत कुरापट्टी यांनी तिची तिथून सुटका केली. संगीता परत आपल्या घरी आली. पण आता ते घर तिच्यासाठी परकं झालं होतं. घराचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद झाले होते. आसरा द्यायलाही कोणी तयार नव्हतं, ना काम द्यायला. ती कोपरगावच्या सुभाषनगर झोपडपट्टीत राहायला गेली. पण पैसे नसल्यानं तिथंही रस्त्यावरच राहावं लागलं. रात्रीच्या वेळी गुंड येऊन त्रास द्यायचे, मारहाण करायचे. राहायला घर, पुरेसे कपडे नाहीत, उदरनिर्वाहासाठी काम नाही, तारुण्याच्या उंबरठय़ावरचं वय, एकटी मुलगी जाणार कुठं, करणार काय? त्या नैराश्याच्या वातावरणात तिनं जवळ केलं दारूला. सगळं दु:खं विसरून जाण्यासाठी तिला तिची सोबत हवीहवीशी वाटू लागली. पण ते आयुष्य म्हणजे फक्त शरीर जिवंत ठेवणं एवढंच होतं. अशातच पुन्हा तिची भेट यशवंत सरांशी झाली. त्यांनी खूप समजावलं. नशेतल्या संगीताच्या ते कानापर्यंत पोहोचत होतं, पण मनापर्यंत उतरत नव्हतं. ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नसायचीच त्या काळात. असेच दिवस जात होते. जवळ जवळ पाच वर्ष. दरम्यान, तिला दोन मुलंही झाली.
आता जगणं जास्तीत जास्त अवघड होत चाललं होतं. मुलांची जबाबदारी आणि त्यात दारूचं व्यसन यात आयुष्य म्हणजे ‘जीवन है अगर जहर तो पिनाही पडेगा’ अशी अवस्था. नशिबाला दोष देणं आणि रडत बसणं एवढंच तिचं आयुष्य झालं. पण त्याचवेळी (२००६ मध्ये) तिची गाठ पडली वेश्यांसाठी व त्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या प्रवीण मुत्याल यांच्याशी. तिचं भरकटलेलं आयुष्य त्यांनाही माहीत होतं आणि त्यात तिची होत असलेली ससेहोलपटही. त्यांनी मग हळूहळू तिचं समुपदेशन करायला सुरुवात केली. व्यसनाचे दुष्परिणाम आणि मुलांच्या दिशाहीन भवितव्याची भीती घातली. हळूहळू तिच्याही ते लक्षात यायला लागलं आणि त्यांनी तिला तिच्यासारख्याच परिस्थितीला बळी पडलेल्या मुलींसाठी काम करायला तयार केलं.

‘तुझं आयुष्य रडण्यासाठी नाही, लढण्यासाठी आहे,’ या वाक्याची मोहिनी तिच्यावर पडली आणि ती ‘स्नेहालय’मध्ये दाखल झाली. तिथलं वातावरण पाहून, तिथल्या महिलांशी बोलल्यावर आपण वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काम करू शकतो हा विश्वास तिच्यात निर्माण झाला. आणि ती म्हणता म्हणता बदलली..
संगीताताई २००८ मध्ये मेक्सिकोला वेश्या व्यवसायासंदर्भात झालेल्या जागतिक परिषदेला गेल्या होत्या. तिथं त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम वापर तसेच एड्सला प्रतिबंध घालण्यासाठी काय करता येईल याविषयी व्याख्यान दिलं. कोणताही पेपर पुढय़ात न घेता आपले  मुद्दे ठामपणे मांडले. त्यांनी वेगवेगळी उदाहरणं 

दिलंी. संगीताताईंना याविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘मी नाही. माझं काम बोलतं, मी जे काही करते तेच लोकांपुढं सांगते. वेगळं काही करीत नाही.’
संगीताने तिथल्या, परिसरातील महिलांना विश्वासात घेत त्यांचे बचत गट तयार केले. एड्सग्रस्त महिलांचं आयुष्य फार थोडं असतं. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांचं काय, हा प्रश्न भेडसावणारा. संगीताताई या मुलांना चंगलं शिक्षण मिळावं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं, त्यांचं पुनर्वसन व्हावं याकरिता धडपड करते. परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायातून बाहेर न पडू शकणाऱ्या महिलांना गुप्तरोगाविषयी, कंडोमविषयी माहिती देते. दर तीन महिन्यांनी या महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. तर दर सहा महिन्यांनी त्यांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात येते. या महिलांशी संगीताताई खूप छान संवाद साधते. त्यांनी या व्यवसायातून बाहेर यावं हे सतत त्यांच्या मनावर बिंबवते. ‘इतर बायांप्रमाणे तुलाही ऑफिसात बसून काम करावंसं वाटतं ना? मानानं जग, मानानं पैसे कमव, तू ठरवलंस तर तू यातून बाहेर येऊ शकतेस.’ असं संगीताताईचं त्यांना सांगणं असतं. तिच्या सातत्यानं केलेल्या प्रयत्नामुळेच आज ५५ महिलांनी हा व्यवसाय कायमचा सोडला आहे. इतकंच नाही तर वेश्या व्यवसाय सोडलेल्या दहा महिलांची लग्नंही संगीताताईनं लावली आहेत. त्यांच्या विवाहाची तसेच खर्चाची जबाबदारीही संगीताताईच घेते. आज या सगळ्या जणी आनंदाने संसार करताहेत.
वेश्या व्यवसाय करणारी स्त्री समाजासाठी तिरस्करणीय! समाज आपल्याकडे तुच्छतेनं पाहतो, हेच त्यांनी अनुभवलेलं. पण त्याही स्त्रियांना मन आहे, भावना आहेत, त्याही माणूस आहेत. हे जाणून संगीताताईनं त्यांच्यासाठी हळदी-कुंकू समारंभ सुरू केला. इतकंच नाही तर श्रावणात आणि संक्रांतीला त्यांना वाण देणंही सुरू केलं.
त्यांच्यासाठी सर्वतोपरी काम करणाऱ्या संगीताताईला आता समाजालाही तोंड द्यायचं होतं. ती वेश्यांसाठी काम करतेय हेच अनेकांना खपत नव्हतं. त्यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांनाच नव्हे तर त्यांच्या घरच्या लोकांना शिवीगाळ करणं, वापरलेले कंडोम त्यांच्या दारात आणून टाकणं, रस्त्यातून जाता-येता टोमणे मारणं याचा तिला सतत सामना करायला लागायचा. गावातल्या कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण अर्थातच नसायचं. पण संगीताताई घाबरली नाही. ‘वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या उद्धाराचा हाती घेतलेला वसा मी टाकणार नाही.’ या निर्धारानं ती आजही लढते आहे. सुरुवातीच्या काळात पोलीस आणि पत्रकारांचं सहकार्य मिळत नव्हतं. मग तिनं बैठक घेऊन त्यांच्यासमोर या महिलांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली आणि परिणामस्वरूप प्रसंगी त्यांची मदतही संगीताताईला मिळायला लागली.
त्यातच एक घटना घडली. येसगाव पाट येथे या महिलांनी हप्ते दिले नाहीत म्हणून गुंडांनी लूटमार केली. जाळपोळ केली. घरे उद्ध्वस्त केली. त्या वेळी संगीताताई या महिलांच्या बाजूनं उभी राहिली. पोलिसांचं सहकार्य मिळेना तर तिने वरिष्ठांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली आणि पोलिसांना गुन्हे नोंदवण्यास भाग पाडलं. या महिलांपाठी संगीताताई खंबीरपणे उभी राहिली. त्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली. काही महिला फसवून, काही मजबुरीनं, तर काही आर्थिक परिस्थिती नसल्यानं या व्यवसायात येतात. यातील बहुतेक जणींना यातून बाहेर पडण्याची इच्छा असते. पण मार्ग माहीत नसतो आणि त्यानंतर समाज स्वीकारेल का, याची भीतीही असते. त्यामुळे इच्छा नसूनही अनेक जणी त्याच व्यवसायात मरेपर्यंत राहतात. म्हणूनच त्यांची काळजी घेणं, त्यांना शारीरिक त्रास होऊ नये यासाठी संगीताताई प्रयत्नशील असते.
तरीही संगीताताईचा मुख्य प्रयत्न असतो तो त्यांना या व्यवसायातून बाहेर काढण्याचा. त्यांच्या प्रयत्नांमुळे आजपर्यंत ५५ महिलांनी वेश्या व्यवसाय पूर्णपणे सोडला आहे. आज कोणी भाजीपाला विक्रीचं, कोणी फुलं विक्रीचं, कोणी हॉटेलमध्ये, तर कोणी केटर्सचंही काम करतं आहे. आज या महिला सन्मानानं स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. या महिलांना पिवळं रेशनकार्ड मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या वयाचे दाखले काढणं, त्यांना पॅनकार्ड मिळवून देणं इतकंच नव्हे, तर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी संगीताताईंचे प्रयत्न सुरू आहेत. बचतीची सवय या महिलांना लागावी, यासाठी संगीताताईंनी त्यांची विविध बँकांमध्ये बचत खातीही काढून दिली आहेत. एवढंच नव्हे, तर त्या बचत करतात का, किती बचत करतात, याकडेही त्यांचं लक्ष असतं.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जनसागर येतो, पण तिथं अनाथ मुलं सापडतात. अनैतिक संबंधांतून जन्मलेली, आई-वडिलांनी सोडून दिलेली, नकोशी असलेली मुलं-मुली तिथं सापडतात. संगीताताईने त्या मुलांना आणण्याची जबाबदारी काही जणींवर सोपवलेली आहे. कुमारीमातांचा प्रश्नही गंभीर आहेच. अशा कुमारीमाता व मुलं यांना आपल्याकडे आणून संगीताताई मायेचं छत्र देते. वेश्या वस्तीतील महिला, मग ती कुठलीही असू दे, संगीताताईला तिच्याबद्दल कळायचा अवकाश की लगेच संगीताताई त्यांच्या मदतीला धावून जाते. बिहारला सीतामढी लालबत्ती विभागातील महिलांना लोकांनी त्रास दिला. तिथं जाळपोळ झाली. ज्यांच्यावर अन्याय झाला. अशा वस्तीतल्या महिलांनाच तुरुंगात टाकण्यात आलं. संगीताताईंना याविषयी कळल्यावर त्या तडक तिथं गेल्या. तिथं जाऊन तेथील जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटल्या.
प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. प्रत्येकाला आणि प्रत्येक पातळीवर त्या या महिलांवर कसा अन्याय झालाय हे सांगत राहिल्या. या महिलांसाठी त्यांनी तिथं उपोषणही केलं. सगळ्याच बाजूंनी संगीताताईंनी या आंदोलनाला बळ दिलं. अखेर या महिलांची तुरुंगातून सुटका झाली. कोपरगावला परतल्यावर संगीताताईंनी सर्वाना बिहारमधील वस्तीतील परिस्थिती सांगितली. हैदराबादला झालेल्या अनैतिक मानवी वाहतूक कायदा परिषदेलाही संगीताताई उपस्थित होती. तिथं तिने अल्पवयीन मुलींच्या अनैतिक वाहतुकीबद्दल बिनधास्त भाषण दिलं. आज संगीताताई ‘स्नेहज्योत’ प्रकल्पाबरोबरच ‘स्नेहालय’ची जबाबदारीही स्वतंत्रपणे सांभाळते. या प्रकल्पात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबरोबर कुमारीमाता तसेच तृतीयपंथीही राहतात. तृतीयपंथीयांचा प्रश्न तर आणखीनच निराळा. त्यांनाही समाज स्वीकारत नाही, नोकरी-व्यवसाय देत नाही. या पाश्र्वभूमीवर संगीताताई त्यांना कंडोमविषयी माहिती देते. त्यांचीही एचआयव्ही टेस्ट करवून घेते. प्रकल्पातील तृतीयपंथीयांपैकी दोघे जण इंजिनीअर तर एक जण आय.टी. इंजिनीअर आहे. काही जण तर उत्तम इंग्रजी बोलतात, पण त्यांना रोजगार मिळत नाही. ही खंतही संगीताताई बोलून दाखवते.
वेश्यांबरोबरच कुमारीमाता, तृतीयपंथी या सगळ्यांसाठी काम करणारी संगीताताई आपल्या कामाने एक आदर्श निर्माण करते आहे. त्याचं श्रेय मात्र ती डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रवीण मुत्याल व यशवंत कुरापट्टी यांना देऊ इच्छिते.

आज संगीताताईसारख्या ठाम व्यक्तींची गरज आहे. मनाविरुद्ध एखादा व्यवसाय करायला लागू नये यासाठी त्या महिलेनेच भूमिका घेणं गरजेचं असतं. मग एकच नव्हे तर अनेक संगीता तयार होतील.. त्याचं श्रेय मात्र एखाद्या संगीतालाच..

                                                                                                                                  मागील लेख वाचा

No comments:

Post a Comment