या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३०) सत्याचा साक्षात्कार?

       सत्य नेहमीच बहुरुपी, बहुरंगी व बहुढंगी असते. बघणार्‍याच्या नजरेनुसार त्याचे स्वरूप बदलते. अर्धा भरलेला पाण्याचा पेला एखाद्याला अर्धा भरलेला दिसतो तर दुसर्‍या कुणाला तो अर्धा रिकामा दिसतो. दोघांपैकी कुणालाही चूक किंवा बरोबर ठरवता येत नाही. सहस्त्रबाहू संघ परिवाराबद्दल जनमानस कायम संभ्रमित राहावे, अशी काळजी थेट सरसंघचालकांपासून ते स्वयंसेवकांपर्यंत कटाक्षाने घेतली जाते. दसरा मेळाव्याआधी सरसंघचालकांनी कार्यकर्त्यांना नवा हितोपदेश केला आहे. ‘सरकार कोणत्याही संप्रदायाचे अथवा पंथाचे नसते. ‘संविधान’ हाच सरकारचा धर्म असतो. त्याचेच पालन करावे’ असे सरसंघचालकांनी ठासून सांगितले आहे. अलीकडेच आरक्षणाच्या फेरविचाराचा सल्ला देताना त्यांना घटनेचा फेरविचारही आवश्यक वाटला होता. महिनाभरात पूर्वेचा सूर्य पश्‍चिमेला उगवावा असे देशात काय घडले? संघाचा शंखध्वनी म्हणजे ‘पांचजन्य’! पण ‘पांचजन्य’ हे संघाचे मुखपत्र नव्हे, असा सत्याचा वेगळा साक्षात्कार संघाच्या वैद्यराजांना नुकताच घडला. तो जाहीर करताना त्यांनी सरसंघचालकांचा अधिक्षेप का केला असावा? पण तोही संघाच्या सत्याचे नवे रूप दाखवतो. भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आणखी वेगळे प्रबोधन केले आहे. ‘आपली मते ठासून मांडण्यासाठी काहीजण विध्वंसक कृतीचा अवलंब करतात. ही अतिशय अस्वस्थ करणारी बाब आहे. मतभेद व्यक्त करण्याची भारताची सुसंस्कृत परंपरा आहे. अशा प्रश्‍नांवर सुसंस्कृतपणे चर्चा केली पाहिजे’ असे ते म्हणाले. संघ परिवारातील दोन्ही नेत्यांनी घटनेवर व लोकशाहीवर एकाच वेळी इतका गाढा विश्‍वास का व्यक्त केला असावा? जेटलींचा सल्ला मर्द मावळ्यांना उद्देशून असला तरी तो संघ परिवारालाही लागू होतो. पंतप्रधानांनी आरक्षणाच्या मुद्यावर घटनानिष्ठ भूमिका जाहीर केली व सरसंघचालकांना घटनानिष्ठेचा साक्षात्कार झाला.केंद्रसत्तेत भाजप आल्यापासून साधू-साध्वींनी ताळतंत्रच सोडला आहे. काही नेते व खासदार कडव्या हिंदुत्ववादाचा पुरस्कार करू लागले आहेत. मात्र त्यांना लगाम घालण्याचे काम संघ परिवारातील धुरिणांनी केलेच नाही. ‘दादरी’ प्रकरण गाजत असतानाच परवा हरयाणातील एका दलित कुटुंबाचे घर पेटवण्यात आले. त्यात दोन मुलांचा बळी गेला. ‘दादरी’प्रकरणी पंतप्रधानांनी धरलेली गुळणी थेट बिहारच्या प्रचार सभेत टाकली. ‘पांचजन्य’ने मात्र ‘दादरी’कांडातील हत्या वेदाज्ञेप्रमाणे योग्य असल्याचा निर्वाळा दिला. लगोलग ‘पांचजन्या’चे पितृत्वच संघ परिवाराच्या वतीने वैद्यराजांनी जाहीरपणे ठोकरले. सहस्त्रबाहू संघाच्या सत्याची ही नानाविध रुपे बघता भाजप व संघ परिवारामध्ये वैचारिक दरी रुंदावत असल्याचा परिणाम असावा की सोयीनुसार सत्याला नवे-नवे पैलू पाडण्याची कारागिरी असावी?

No comments:

Post a Comment