या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२०)आई, तुझ्यासाठी....

  वाळु इथे खूप तापलीय
थरथरणारी मी अजुन उभीय
अंग तापलंय, मनही तापलंय
एवढ्या सार्‍या अश्रुंनी तरी नाही विझलंय...
कपाळावरुन पाठीवरुन
घाम निथळुन रक्त गेलं पाणी बनुन.
आठवण आली तुझी
वार्‍याची मंद झुळुक जशी.
जन्मा आले तेव्हापासुन तुझाच एक भाग
म्हणुन जपलंस तु मला,
केसांनाही कधी चुकुनही
त्या तप्त उन्हाचा स्पर्श होउ दिला नाहीस.
मोत्याचे दाणे भरवताना
एकेक दाणा पारखुन भरवायचीस.
घरट्यांत पिसं पसरवताना
मखमली पिसं मला
बोचरी पिसं स्वतःला ठेवायचीस.
पंखांवर तुझ्या वादळी पाउस
तुझ्या पंखाखाली मी मात्र सुरक्षित.
तुझा हात पाठीवरुन,
अवघा स्वर्गाचा वारा देहभर....
तुझ्या शरिराचा वास,
गं आई,
अजुन इथं दरवळतोय सुवास्...
पंख फुटले चिमण्या पाखराला
तुझं चिमण गेलं दूर तुझ्यापासुन,
म्हणुन का गं तुही पिलाला सोडुन गेलीस?
आता नाहीत माझ्याजवळ
ते हिरवं झाड, मखमली पिसं आणि
तुझे मऊ हात....
आहेत मोत्याचे दाणे पण नाही त्यात तो गोडवा...
माझ्याजवळ तुझ्या आठवणींची हळुवार प्रेमळ झुळुक
पण भोवती,
तप्त वाळु, तप्त आसवं आणि.......
सोन्याचा पिंजरा!