या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१९)दुष्ट राणी

फार वर्षांपूर्वीची जुनी गोष्ट आहे. एका खेड्यात देवा नावाचा मुलगा आणि बेला नावाची मुलगी राहात होते. ते अगदी गरीब होते. लहानपणापासूनच ते एकामेकांचे खेळगडी होते व शेजारी शेजारी राहायचे. बेलाच्या आईने एखाद्वेळी छानशी भाजी केली, तर ती देवाला आठवणीनं पाठवी व देवाच्या आईनं काही गोडधोड केले तर बेला तिथे आली की, जेवायलाच ती तिला ठेवून घ्यायची. पैसे नव्हते, गरिबी होती, पण प्रेमभाव अगदी छान होता त्या दोन घरांत.

काही वर्षे अशीच गेली. देवा आता मोठा झाला होता. बेलाही मोठी झाली होती. अगदी छान, सुंदर दिसू लागली होती. त्यांच्या आयांनी त्यांचा विवाह ठरवला. फार छान प्रेमळ जोडपं होतं, पण काय दैवगती पहा? लग्न ठरले अन् कसलासा ताप येऊन दोघांच्याही आया त्यात एकाएकी मरण पावल्या! जे काय घरात चार पैसे होते, ते त्या दोघींच्या अंतिम कार्यासाठी लागले. फिरून देवाजवळ धड कपडा नाही की, बेलाला पायांतल्या चपला घ्यायला पैसे नाहीत, अशी दारिद्रय़ावस्था! मग दोघांनीही एकाच माणसाकडे नोकरी धरली.

नोकरी करणे काही सुखाचे असते काय? देवाला रोज शेतात भयंकर राबणूक होत होती व पगार तो इतकासा. देवा म्हणे, 'बेला, एखादी गाय घेता येईल तर मी दुधाचा धंदा करीन यापेक्षा. चार पैसे जास्त मिळवीन व लग्न करू मग.'

'अन् मलासुद्धा इतका अपुरा पगार की, साधी सलवारसुद्धा खरेदी करता येत नाहीए. मला वाटतं आपल्या लग्नाला पैसे जमेपर्यंत माझे केस सर्व पांढरे होणार..' ती म्हणाली.

'म्हणूनच मी ठरवलं आहे, मी नशीब काढायला कुठे तरी दूरदेशी जातो व पैसे मिळवून येतो. तू मात्र थांबशील ना?' 

'मी तुझी वाट पाहात राहीन देवा. शपथ तुझी. आणि थांब, माझ्या वडिलांनी मला तीन वस्तू दिल्या आहेत. या बघ त्या. ही एक घंटा. माणूस संकटात असेल तरच ही घंटा वाजते. ही काठीही तशी एका परीनं दिलेली आहे, जादूचीच. ही माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकते. अन् हा चाकू घे तुला.'

'मजजवळ आहे ना एक चाकू, आणखी कशाला?'

'असू हे. हा वेगळ्या शक्तीचा आहे. याचा स्पर्श झाला की, शापाने भलभलती रूपं मिळालेल्यांचा शाप मोडतो व त्यांना पूर्वरूप मिळतं. तू दूर जाणार, जादूगार तिकडे फार, तेव्हा याचा उपयोग होईल तुला. ही घंटा नि ही काठी मी ठेवते मला. तू संकटात असलास की, ही घंटा वाजू लागेल व मला ऐकू येईल की, लगेच मी काठीवर बसून तिकडे तुला सोडवायला धाव घेईन.'

मग त्या दोघांनी डोळे पुसत निरोप घेतला एकमेकांचा.

खूप दिवस तो चालत होता. गावे, नद्या, टेकड्या, शहरे मागे पडत होती, पण त्याला भरपूर पगार देणारा कुणी धनवान माणूस भेटेना. अखेर एका खानावळीत चाललेले बोलणे त्याच्या कानावर आले व त्यातून 'निळ्या तलावाची श्रीमंत राणी' हे नाव वरचेवर त्यांच्या बोलण्यातून त्याला ऐकू येत होते. तसे त्याने त्यांना 'ही कोण?' म्हणून विचारले.

'काय? तुम्हाला तिचं नावही माहीत नाही? फारच दुरून आलात वाटतं? इकडचं पाळण्यातलं पोरसुद्धा हसेल तुम्हाला, कारण त्यालाही ठाऊक आहे राणी निळ्या तलावाची..'

'असेल, पण मला नाही ठाऊक. सांगा ना, ही कोण आहे?'

'ती एक परी आहे. तरुण, देखणी तर आहेच, पण मुख्य म्हणजे अलोट द्रव्याची, संपत्तीची मालकीण पण आहे ती. जंगलातल्या सार्‍या राजा-महाराजांहून श्रीमंत. तिच्याजवळचा हा प्रचंड खजिना मिळवायला खूप लोक तिकडे जातात, पण तुम्ही नका जाऊ. कारण ते जाणारे परत येत नाहीत. गेले की, गेलेच. त्यांचं काय होतं, कोण जाणे.'

'ठीक, ठीक. मी जाऊन पाहून येणार, त्या लोकांचं काय झालं ते,' तो म्हणाला व त्याच्या मूर्खपणाला हसत का होईना, पण लोकांनी त्याला निळ्या तलावाचा रस्ता दाखवला.

प्रथम रानावनातून रस्ता व अखेर शेवटी समुद्रातून वाट होती ती. त्याला जलमार्गाने बरेच दूर जावे लागले. मग समोर एक हिरवेगार व प्रचंड बेट दिसले. तोच निळ्या तलावाचा प्रांत.

तो तेथे उतरला. झाडाझुडपांनी झाकलेले ते मोठे बेट व त्या पलीकडे एक निळेशार पाणी असलेला मोठा तलाव. फार सुंदर देखावा होता. जरा तलावात फिरून जावे का? पण कसे? तेथे एखादे होडगे पण नव्हते. तोवर एक हंस काठाशी झोपलेला त्याला दिसला. खरे तर तो हंस नसून ती एक माणूस बसेल एवढी फळीची होडी होती - हंसाच्या आकाराची. त्याने आत पाऊल ठेवताच होडी आपोआप तलावातून फिरून येऊन एका अतिसुंदर राजवाड्यासारख्या घरासमोर थांबली. आहा! काय सुंदर घर! देवा बघतच राहिला. शिंपल्याच्या आतल्या बाजूला जसे अनेक रंग झळकतात तसे सप्तरंगी घर व खरेच त्याला शिंपले, मोती, प्रवाळ इत्यादींच्या भिंती होत्या. समोरच जिना होता. त्याने तो चढायला सुरुवात करताच दरेक पायरीतून सुरेल आवाजही उठू लागले. बोलून चालून परीचे घर ते. तेथे सुंदरपणा होता, तशी अद्भुत जादू पण दिसणारच!

तो वर गेला व समोरच त्याने राणीला पाहिले. किती सुंदर होती ती! स्वर्गातली अप्सराच जणू एखादी.

राणी उठून बसली व म्हणाली, 'तू कोण? हा रस्ता तुला कसा सापडला? आणि तू कशासाठी आला आहेस?'

'मी एक गरीब मनुष्य. आपली कीर्ती ऐकून आलो. पोटापाण्याचा उद्योग करावा, चार पैसे मिळवावे म्हणून आलो. खूप लोकांनी वाट सांगितली.'

'पोटापाण्याचा उद्योग? चल तर, न्याहारी तयार आहे. ती आधी घे पोटभर. छान दिसतोस, मी देईन तुला नोकरी, चल.'

न्याहारी झकासच होती. उंची सरबते व तर्‍हतर्‍हेच्या मिठाया.. तो अगदी तृप्त झाला. राणी कुणी देवता तर नाही ना?

राणीने त्याला विचारले, 'तुला पैसे मिळवायचेत, ते कशाला?'

'मला लग्न करायचं आहे. एक पैसाही जवळ नाही..' तो खेडवळ तरुण साधेपणाने म्हणाला. राणी हसली अन् म्हणाली, 'हात्तेच्या, लग्न तर इथेही होऊ शकेल तुझं. तिकडे परत कशाला जायला हवं?'

'म्हणजे? मी नाही समजलो राणी..'

'ठीक. स्पष्टच सांगते. माझा नवरा मरून गेला आहे व मला परत लग्न करायचं आहे. तू एकदम पसंत आहेस मला. माझ्याशी तू लग्न कर. माझ्या अध्र्या संपत्तीचा तू मालक होशील.'

क्षणभर त्याला समजेचना. आपण हे खरं ऐकतो की, स्वप्नात? 

मी अध्र्या जगाच्या इस्टेटीचा मालक? केवळ या सुंदरीशी लग्न केल्याने एवढे पैसे मिळणार. काय हरकत आहे? अन् मी तरी एवढा हिला पसंत कसा पडलो प्रथम पाहताच? हेच नवल म्हणायचं. एकदम त्याला आठवले. गावातले लोक म्हणायचे, 'अगदी राजबिंडे रूप आहे देवा तुझे. कुणीही राजकन्या खुषीनं माळ घालील तुझ्या गळ्यात.' अन् बेला म्हणे, 'तुमची दृष्ट काढायला हवी असे छान दिसता.'

अरे, बेला! त्याला एकदम सारे आठवले. बेलाशी लग्न करायचे आहे ना आपल्याला? मग इथे लग्न? या दुसर्‍या बाईशी? छे, छे! भलतेच! पैशाच्या मागे लागून वाहात जाणार होतो मी. चुकलंच माझं. माणसानं आपलं ध्येय विसरून नाही चालत. 

तो म्हणाला, 'मी एक गरीब मजूर आहे राणी. मला असं श्रीमंतीत राहायला नि शिकायलाही वेळ द्या. आधी नोकरी द्या. विचार करायलाही दोन-चार महिने हवेत. लगेच नको बाबा लग्न.'

'ठीक. दोन महिन्यांनी सांग, तोवर माझा पाहुणा म्हणून राहा व पुढे सगळे तुझेच होणारे राज्य पाहून घे, माझ्याबरोबर हिंडून. चल आता माझं मत्स्यालय बघायला. मजा वाटेल तुला. मी माशांना किती कसरती शिकवल्या आहेत त्या बघ.'

तिने माशांना तर्‍हेतर्‍हेची नावे दिली होती, असे दिसले. एका लहानशा कुंडात तर्‍हेतर्‍हेचे मासे होते. हातात एक लोखंडी तारांचे छोटे जाळे घेऊन ती तिकडे गेली. देवा बरोबर होताच. तिने हाका मारायला सुरुवात केली.

'या सावकार.. राजे सरकार, मारा उंच उडी जाळ्यात पाहू? अरे मधु, तिकडे नाही, इकडे, जाळ्यात ये, जाळ्यात.. पुजारीबुवा, चला पोटपुजेला आमच्या.. दादा लवकर उडी घ्या बघू..'

टपाटप् एकेक मासा जाळ्यात उंच उडी मारून आला. घरी जाऊन तिने काही मासे पाण्यात सोडले व काही तळायला पाठवले. इतक्यात देवाला तेथून काही तरी कुजबूज ऐकू येऊ लागली. कुणी हळू बोलावे तशी.

'कसला आवाज?' त्याने प्रश्न विचारला.

'काही नाही, लाकडं पेटताहेत, त्यांचा येतो असा आवाज. बरं, हे बघ मी स्नान करून येते. तू बैस येथेच आरामात, बरं का.'

ती गेली तसे पाण्यात मासे सोडले होते त्यांतून परत मधमाशी गुणगुणावी तसे शब्द उमटू लागले. शब्द नव्हतेच ते, नुसती गुणगुण. मासे व गुणगुणण्याचा आवाज? बापरे! 

माशांना तर आवाजच देवाने दिलेला नाही, मग ही गुणगुण कशी करतात हे मासे? शापित तर नाहीत?

एकदम त्याला बेलाने दिलेल्या चाकूची आठवण आली. 'शापिताला याचा स्पर्श झाला की, बस्स. त्याला पूर्वरूप प्राप्त होतं म्हणाली होती बेला. नाही का? त्याने त्या चाकूने हलकेच त्या माशांना स्पर्श केला व काय नवल? दोन देखणे तरुण त्याच्यासमोर उभे!

एक म्हणाला, 'देवा, आम्हाला वाचव या राक्षसी राणीच्या हातून. दया कर.'

दुसरा म्हणाला, 'देवा तू कसा हिच्या तावडीत सापडलास, जीव घेऊन पळ इथून.'

'कोण राक्षसी? ही परी - सुंदरी?' देवाने विचारले.

'अरे कसली परी? तिनं सोंग घेतलंय सुंदर परीचं. ती महादुष्ट आहे. रोज मजेनं आमची शिकार करते.'

'पण तुम्ही कसे इथे?'

'तुझ्यासारखेच. श्रीमंत बेटात श्रीमंती मिळेल म्हणून आलो आम्ही. पैशाचा मोह भारी वाईट. आम्ही तर तिच्या गोड बोलण्याला फसून लग्न केले तिच्याशी. अन् मग आठच दिवसांत आम्हाला तिने मासे करून फेकले या कुंडात. तुझीही हीच अवस्था होईल देवा.'

ते निघून जाऊ लागले, पण परीने दाराआड उभे राहून त्याचे सगळे बोलणे ऐकले होते. तिने त्या दोघांवर लोखंडी जाळे फेकले व म्हटले, 'कुठे पळता? व्हा सरडे अन् जा धावत बागेत.' मग दोन सरडे सुरूसुरू पळत कुठे तरी नाहीसे झाले.

                                                                                                            मागील लेख वाचा