या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

११) गोष्ट एका राजूची

(भाग - १)
एका गावात एक विधवा बाई आपल्या दोन मुलांसह राहात होती. गरिबीत कसेबसे दिवस काढत होती. ती एकटीच काबाड कष्ट करायची अन् तिघांच्या पोटापुरती कमाई जेमतेम करायची.
दोघेही मुलगे थोडे मोठे झाले, तरी काही कामधंदा करायचं मनावर घेईनात. आई तर म्हातारी होत चालली होती. एके दिवशी ती मुलांना म्हणाली, 'हे बघा मुलांनो, माझ्यानं काही आता कष्ट जमत नाहीत. तेव्हा काही कामधंदा केला नाही, तर काही दिवसांनी अर्धपोटी जगायचीसुद्धा मारामार होईल. माझं म्हातारीचं एक सोडा. माझे या जगात आता थोडेच दिवस उरलेत, पण तुमचं सारं आयुष्य जायचं आहे. तेव्हा काही कामधंदा केलात, तरच निभाव लागेल तुमचा. अरे, आपापलं पोट भरण्यापुरती तरी कमाई करायला हवी तुम्ही. आपले शेजारचे दादा बघा. केवढा धंदा करतायत. कशाला काही कमी नाही त्यांना. नोकरचाकर, गाडी ठेवून आहेत, पण ते का एकदम श्रीमंत झाले होय? तरुणपणापासून त्यांनी खूप कष्ट केले. त्याची फळं चाखतायत आता ते. म्हणून म्हणते, तुम्हीसुद्धा आतापासूनच काही तरी कामधंद्याचं बघायला हवं.'
'तू म्हणतेस ते खरं आहे आई,' थोरला मुलगा म्हणाला, 'पण धंदा सुरू करायचा तर थोडं तरी भांडवल लागतंच. कोंबड्या चोरायच्या झाल्या, तरीसुद्धा त्यांच्यापुढे टाकायला ज्वारीचे थोडे तरी दाणे लागतातच.'
तरी पण थोरला थोडा विचार करून आईला म्हणाला, 'हे बघ आई, मी एक बेत योजलाय. बाहेरगावी एखाद्या नगरीत जाऊन कामधंद्याला लागायचं, पण त्यासाठी थोडे पैसे हवेत. तू असं करशील का? शेजारच्या दादाकडे जा नि हजार रुपये आण. त्यांनी मनात आणलं, तर एवढे पैसे देणं काही त्यांना जड नाही, शिवाय तू त्यांच्याकडे कामसुद्धा करतेस. तेवढे पैसे मिळाले, म्हणजे त्यांतले १00 रुपये तुला खर्चाला ठेवू अन् उरलेले नऊशे घेऊन आम्ही दोघेही पत्नीकडल्या नगरीत नशीब काढायला जाऊ. एवढय़ा भांडवलावर तिथं काही तरी कमाई करता येईल.'
म्हातारीला त्याचं म्हणणं पटलं. ती दादांकडे गेली अन् एवढी नड भागवण्याची विनवणी तिनं त्यांना केली. दादा सज्जन गृहस्थ होते. म्हातारीची पोरं कामधंद्याला लागतायत तर एवढय़ासाठी त्यांचं अडून नको राहायला, असा विचार त्यांनी केला. कारण आपले पूर्वीचे दिवसही त्यांना आठवले आणि त्यांनी उदार मनानं हजार रुपये काढून म्हातारीला दिले.
मग ठरल्याप्रमाणं थोरल्या राजूने शंभर रुपये घरखर्चासाठी आईला दिले आणि गरजेपुरत्या काही वस्तू घेऊन धाकट्या मनूसह दोघे प्रवासाला निघाले. पैशांचं गाठोडं राजूने स्वत:च्या खांद्यावर घेतलं.
वाटेत राजूच्या खांद्यावरील पैशांच्या गाठोड्याकडे मनू पुन: पुन्हा हावरेपणानं पाहात होता. ते सारे पैसे कसे बळकावता येतील, याचा कावा तो मनातल्या मनात रचत होता. थोडी वाट चालून गेल्यावर कावेबाज मनू थोरल्या भावाला साळसूदपणे म्हणाला, 'त्या गाठोड्याचं ओझं जड जात असेल तुला. त्यापेक्षा ते माझ्याकडे दे अन् माझ्याकडचं हे कमी वजनाचं गाठोडं तू घे.'
'काही नको,' थोरला राजू हसतच म्हणाला, 'तसं फारसं जड नाही हे. मी खंबीर आहे हे न्यायला, शिवाय जास्त जड ओझं थोरल्या भावानं घेणंच योग्य.'
यावर मनूला काही बोलता येईना. तात्पुरता दम खाण्याचा विचार त्यानं केला. एवढंच नव्हे, तर थोरल्या भावाच्या मनाच्या मोठेपणाबद्दल वरपांगी त्यानं प्रशंसा केली.
पण आणखी थोडं अंतर चालून गेल्यावर मनू राजूला पुन्हा म्हणाला, 'दादा, काही म्हटलंस तरी तूच एकट्यानं एवढं जड ओझं सबंध प्रवासात वाहून नेलेलं पाहणं कसंसंच वाटतं मला. त्यापेक्षा आपण असं करू या, आपण दोघं आलटून-पालटून ते गाठोडं घेत जाऊ म्हणजे झालं.'
तरीसुद्धा थोरल्यानं त्याची सूचना नाकारली. तो म्हणाला, 'मला हे ओझं एवढं काही जड झालेलं नाही. उगाच त्याचा बाऊ करू नको.'
मनूला पुन्हा गप्प राहणं भाग पडलं.
पण थोड्या वेळानं मनूनं चिकाटीनं त्याच गोष्टीचा पिच्छा पुरवला. तेव्हा अखेर कंटाळून राजूनं ते पैशाचं गाठोडं मनूच्या स्वाधीन केलं अन् स्वत: दुसरं गाठोडं घेतलं.
आपल्या चिकाटीला शेवटी यश आलेलं पाहून मनू आता पुढील मनसुबे रचू लागला आणि एका शेतवाडीच्या वाटेवरून ते चालले असताना आपल्या पोटात दुखत असल्याची बतावणी मनूनं केली. पोट दाबून धरत तो मुळी जमिनीवरच बसला. दुखणं सहन होत नसल्याची बतावणी करीत तो रडत-भेकत उद्गारला, 'दादा, नाही रे सहन होत आता हे. कुठून तरी थोडं गरम पाणी प्यायला आणून देशील तर बरं होईल बघं. त्याशिवाय ही पोटदुखी थांबेलशी दिसत नाही.'
भल्या स्वभावाच्या राजूला धाकट्याचे हे सारे ढोंग असेल, अशी शंकासुद्धा आली नाही. म्हणून त्याच्यासाठी जवळपास कुठं गरम पाणी मिळतंय का, याचा शोध तो घेऊ लागला, पण दूरवर कुणी माणसंच दिसेनात. पाणी मिळण्याची आशा सोडून तो माघारी परतण्याच्या बेतात होता, तेवढय़ात झाडीपलीकडं त्याला एक झोपडी दिसली, म्हणून तो तिकडं वळला. झोपडीजवळच्या शेतात एक म्हातारी खुरपणी करीत होती. भावाचं दुखणं सांगून थोडं गरम पाणी देण्याची विनंती त्यानं तिला केली. म्हातारी लगबगीनं झोपडीत गेली अन् तिनं चुलीवर पाणी गरम करीत ठेवलं. थोड्याच वेळानं तिनं ते पाणी आणून त्याला दिलं.
गरम पाण्याचं भांडं घेऊन राजू शक्य तेवढय़ा लगबगीनं धाकटा भाऊ बसला होता, तिथं येऊन पोहोचला, पण मनूचा तिथं पत्ताच नव्हता. पोटदुखी असह्य होऊन तो धडपडत जवळपास कुठं गेला तर नसेल, या शंकेनं राजूनं आजूबाजूला हिंडून शोध घेतला, पण त्याचा कुठंच ठावठिकाणा नव्हता. मग भोळ्या राजूच्या डोक्यात विचार आला. 'हां, हां, असं झालं असेल की, मनूची पोटदुखी बरी झाली असेल, म्हणून तो मला शोधत गेला असेल अन् त्यानं कदाचित वेगळी वाट धरल्यानं त्याची-माझी चुकामुक झाली असेल.'
मग गरम पाण्याचा प्याला म्हातारीला परत देऊन राजूने तिचे आभार मानले आणि सामानाचं गाठोडं घेऊन तो मनू ज्या वाटेनं जाण्याचा संभव होता, त्या वाटेनं वाटचाल करू लागला. मनूला शक्य तितक्या लवकर गाठावं या हेतूनं तो झपाझप पावलं टाकत होता, पण त्याच्या घाई-गडबडीचा काहीएक उपयोग झाला नाही. मनूचा पत्ता लागेल तर शपथ. तोवर दिवसही मावळला. रात्र पडली. काळोख दाटून आला. आता रात्री मुक्काम कुठं करावा? असा प्रश्न त्याला पडला. कारण जवळपास कुठलीही वस्ती दिसत नव्हती.
तेवढय़ात चंद्र उगवला अन् सगळीकडे रुपेरी उजेड फाकला. त्या उजेडात थोड्या अंतरावर त्याला एक देऊळ दिसलं. चांदण्यांच्या उजेडात तो त्या देवळापाशी गेला. देवळाला लागून एखादी दुसरी खोली असते, तीत झोपून रात्र काढता येईल, असा विचार त्याच्या मनात होता. देवळाच्या जवळ जातो, तर ते देऊळ एका टेकडावर असून, पडक्या अवस्थेत असलेलं त्याला आढळलं, पण पडकं का असेना, त्यावर एक मजला होता अन् त्यावर एकाला एक लागून अशा दोन खोल्या होत्या. बाहेरची खोली जरा मोठी होती, तर तिच्या लगतची, कोपर्‍यातली खोली लहानशी, चिंचोळी होती. या दोन्ही खोल्या मात्र अजून पडझडीपासून वाचल्या होत्या. रात्रीच्या गार हवेपासून बचाव होण्याच्या दृष्टीनं ती चिंचोळी खोली झोपायला बरी वाटली. त्या खोलीला हवेपुरता झरोका असल्यानं दार आड करून नि जमीन जरा साफसुफ करून तो जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पडला. दिवसभर बरीच पायपीट झाल्यानं तो थकून गेला होता. त्यामुळं त्याचा लगेच डोळा लागला.

बाहेरची मोठी खोली हे काही गंधर्वांच विरंगुळ्याचं ठिकाण बनलं होतं. अधूनमधून कुणी ना कुणी गंधर्व रात्रीचे तिथे येऊन गप्पा मारीत बसत, तर या दिवशीही मध्यरात्रीच्या सुमारास काही गंधर्व तिथे आले. खुच्र्यांसारखी आसनं मांडल्याचा आवाज झाला. कुणी कुणी आपापसांत बोलतही होते. राजू अजून काही गाढ झोपी गेला नसल्यानं त्या आवाजानं तो जागा झाला. उठून बसला. कोण मंडळी आहेत, काय करताहेत याचा तो बसल्या जागी अंदाज घेऊ लागला. कदाचित हे देऊळ पडकं, निर्जन जागी असल्यानं दरोडेखोरही आलेले असतील, अशी धास्तीही त्याला वाटू लागली, म्हणून बिलकूल हालचाल न करता तो अंग चोरून एका कोपर्‍यात गुपचूप बसून कानोसा घेत राहिला, पण बाहेरच्या खोलीत येऊन बसलेल्या लोकांचं बोलणं कानावर पडताच त्याची पहिली धास्ती दूर झाली. कारण ते लोक गंधर्व असल्याचं त्याला लवकरच कळून चुकलं.
एक गंधर्व बोलत होता, 'इथं आपण आलोत खरे, पण इथं काही सोयी नाहीत. खायचं म्हटलं, तर अन्न कुठं मिळणार?'
त्यावर दुसरा एक जण चटकन म्हणाला, 'तसंच काही नाही. मुळीच चिंता करू नका. माझ्या हातातली ही छोटी नागमोडी छडी पाहिलीत? ही छडी जमिनीवर ठक-ठक आपटली की, क्षणात रुचकर अन्न पुढय़ात येईल.'
त्यानंतर 'ठक ठक ' आवाज होतो अन् तत्क्षणी अनेकांचे एकदम उद्गार ऐकू येतात- 'व्वा! ही तर पक्वान्नांची मेजवानी झाली.'
राजू अजूनही दबकतच ऐकत होता सारे. आता त्याला खाण्या-पिण्याचे आवाजही ऐकू येऊ लागले. खाणं-पिणं आटोपल्यावर त्या गंधर्वांपैकी एकजण म्हणाला, 'या ठिकाणाच्या थोडंसं पूर्वेला पाण्याचा एक मोठा झरा वाहतो, पण त्याचं पाणी एवढं कडवट आहे की, कुणीही ते पिऊ शकत नाही. हे असं का व्हावं काही कळत नाही.'
त्यावर दुसरा एकजण लगेच म्हणाला, 'मी सांगतो, त्याचं कारण साधं-सरळ आहे. त्या झर्‍यापाशी पिंपळाचं एक झाड आहे. हे झाड तोडून उपटून टाकावं, म्हणजे त्याच्या मुळाखाली असलेला हिरवा साप बाहेर पडेल. त्याला ठार मारलं, म्हणजे त्या झर्‍याचं पाणी गोड बनेल.'

त्यानंतर तिसरा एक जण म्हणाला, 'असंच तिथून पश्‍चिमेकडं जाणार्‍या रस्त्यावर एक पूल बांधला जात आहे. आज बाराएक वर्षं हे बांधकाम चालू आहे, पण तो पूल अजून काही बांधून पुरा होत नाही. बांधकाम पुरं होता होता तो कोसळतो अन् पुन्हा नव्यानं त्याचं बांधकाम सुरू करावं लागतं. आहे काय हा प्रकार?'

यावर एक गंधर्व उद्गारला, 'मी सांगतो असं का होतं ते. त्या पुलाच्या पायाखाली सोन्याचे चार, तसेच चांदीचे चार हंडे पुरलेले आहेत. हे आठही हंडे आधी उकरून काढायला हवेत. मग पुलाचं काम सुरळीतपणं पार पडेल.'

एवढय़ात बाहेर झुंजूमुंजू झाल्याची चाहुल लागली आणि सारे गंधर्व अंतर्धान पावले. त्यानंतर राजूला कधी झोप लागली हे कळलेच नाही. तो जागा झाला तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. झरोक्यातून सूर्यप्रकाश त्याच्या खोलीत शिरला होता. त्यानं दार उघडून पाहिलं, तर बाहेरच्या खोलीत सगळं सामसूम होतं. दिवस उजाडायच्या आत ते सारे गंधर्व निघून गेले असावेत असा त्याने विचार केला.
उठल्याबरोबर राजूला कडकडून भूक लागली. बाहेरच्या खोलीत रात्री त्या मंडळींचं जेवण झालेलं त्याला आठवलं. तिथं जेवणाचे काही जिन्नस कदाचित पडलेले असतील, या आशेने तो लगबगीनं तिकडे गेला, पण तिथं काहीसुद्धा नव्हतं. जेवणाची पंगत झाल्याचं दाखवून देणारी कसलीच खूण नव्हती तिथं. फक्त एक तिवई होती आणि तिच्यावर एक छोटीशी नागमोडी छडी पडलेली होती.
रात्री गंधर्वांपैकी एकानं जी छडी आपटून जेवण उत्पन्न केलं, तीच तर ही नसेल? असा विचार करीत राजूने ती उचलली. प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? त्यानं काय बिघडणार आहे? असं मनाशी योजून त्यानं ती छडी त्या तिवईवर ठक-ठक आपटली. आणि नवल असं की, त्याच्यापुढं सुग्रास जेवणाने भरलेली मोठाली थाळी प्रकट झाली. सोबत पाण्याची एक सुरईही होती. अजब व्यक्त करीत भुकेल्या राजूनं त्या जेवणावर ताव मारला, मात्र या सुग्रास जेवणाची लज्जत लुटायला आपला भाऊ मनू यावेळी आपल्याबरोबर नाही, याचं त्याला वाईट वाटलं. कुठं बरं असेल मनू यावेळी? कसा असेल तो? असा विचार करत राजू त्या मंदिराच्या खोलीतून बाहेर पडला आणि पुढील प्रवासाकरिता निघाला. थोडे चालल्यावर वाटेत त्याला एक झरा दिसला. राजूला रात्रीचं गंधर्वांचं बोलणं आठवलं आणि त्याबरोबर त्यानं झर्‍याच्या आसपास पाहिलं, तर झर्‍यालगत पिंपळाचं एक मोठं झाडही त्याला दिसलं. तेव्हा तो तेथील लोकांना म्हणाला, 'हे बघा, हे पिंपळाचं झाड तोडून मुळासकट उपटून काढा. मग मुळाशी एक हिरवा साप आढळेल. त्याला मारून टाका म्हणजे या झर्‍याचं पाणी पिण्यालायक गोड होईल.'
त्याचे असे बोलणे ऐकून लोक चकित झाले. हा कोणी तरी दैवी शक्ती असलेला माणूस असला पाहिजे, असं त्यांना वाटलं. त्यांनी लगेचच राजूने सांगितल्याप्रमाणे केले, तर खरोखरच त्या पिंपळाच्या मुळांखाली एक हिरवा साप होता. लोकांनी त्याला ठार मारले. त्यानंतर खरोखरच त्या झर्‍याचे पाणी गोड झाले. लोकांनी त्याला नमस्कार करून त्याचे आभार मानले. त्याचं नाव-गावही विचारून घेतलं. तिथून राजू पुढच्या प्रवासाला निघाला.
तिथून पुढे एक वाट पश्‍चिमेकडे वळलेली होती. त्या रस्त्यानं तो झपाझप चालत राहिला. बरंच पुढं गेल्यावर वाटेत एका ठिकाणी एका पुलाचं बांधकाम चालू असलेलं त्याला दिसलं. त्याचं अर्धंअधिक काम झालेलं होतं. बरेच मजूर कामाला लागले होते. त्यातल्या एकाला राजूनं कुतूहलानं विचारलं, 'किती दिवस चाललंय हे तुमचं बांधकाम?'

(क्रमश:)