या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१६) मूर्ख नवरा (भाग-१)

श्रीरामपुरात एक व्यापारी राहात होता. तो खूप श्रीमंत होता. त्याला एकुलता एक मुलगा होता, पण तो अगदी मूर्ख, ठोंब्या होता. त्याला शिकवायला किती तरी उत्तम शिक्षक ठेवले, पण तो अवाक्षरही शिकला नाही. त्याचे बोलणे बावळटपणाचे असायचे. आपला मुलगा मठ्ठ राहू नये म्हणून वसडलांनी खूप प्रय▪केले, पण त्याचे मूर्ख चाळे काही कमी झाले नाहीत. उलट वाढतच गेले. शेवटी बापाला त्या मुलाचा तिटकाराच आला.
मुलाची आई मात्र सारखी मुलाची बाजू घ्यायची. तो काही चुकीचे बोलला, तरी कौतुक करायची. पुढे मुलाचे लग्नाचे वय झाले तेव्हा तिच्याने राहवेना. तिने नवर्‍यामागे सतत टुमणे लावले, 'अहो, बाळाचं लगीन केलं पाहिजे. चांगली मुलगी पाहा ना!'

'या ठोंब्याचं लगीन करून काय करायचं?'

'का बरं? अहो, कुळाचा धर्म चालवायला सून नको? नातू नको? ते काही नाही. तो काही वेडा नाही. चांगला शहाणा आहे बरं! कालच कसं चुणचुणीत बोलत होता, ते ऐकायचं होतं तुम्ही. माझी मेलीची फार दिवसांची हौस आहे की, बाळाचं लगीन थाटामाटानं झालं पाहिजे. सून घरी आलीच पाहिजे.'

'हे बघ, आपल्या मुलाच्या शहाणपणाचा टेंभा काही तू मिरवू नकोस. तो शहाणा आहे यावर माझा कधी विश्‍वास बसायचा नाही, पण तुम्ही आया अशाच असता. तरी पण अजून बाळय़ाला एक संधी मी देतो. त्याला बोलाव आणि हे शंभर रुपये दे नि त्याला सांग की, 'हे पैसे घेऊन बाजारात जा. पैशाचं तुझ्यासाठी काही तरी घे. दहा रुपये नदीत टाक नि उरलेल्या वीस रुपयांत किमान पाच वस्तू आण. काही तरी खायला आण. काही तरी प्यायला आण. काही तरी घरात करायला आण, काही तरी बागेत पेरायला आण आणि गाईसाठी चारा आण.'

आई 'ठीक आहे' असे म्हणाली. ते रुपये तिने मुलाला दिले आणि वडिलांचा निरोप सांगितला. मुलगा निघाला.

तो बाजारात गेला. दहा रुपयांचे त्याने काही विकत घेतले नि खाल्ले. दुसरे दहा रुपये नदीत टाकायच्या वेळी असा पैसा फेकून देणे बरे नाही, असे त्याच्या ध्यानी आले. तो म्हणाला, 'पैसा उगीच नदीत फेकण्यात काय हशील आहे? माझ्याजवळ ८0 रुपये राहिले. या एवढय़ा पैशांत खायचं, प्यायचं, पेरायचं नि गाईचा चारा आईने घ्यायला सांगितले आहे, तो कसा घेऊ? पण जर दहा रुपये मी नदीत टाकले नाहीत, तर आईची अवज्ञा केल्यासारखे होईल.'

तो हे मोठमोठय़ाने बोलत होता. त्यावेळी एका मजुराची मुलगी तिथे आली. त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून ती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, 'तुम्हाला कसली काळजी लागली आहे का?'

त्याने घडलेली सारी हकीगत तिला सांगितली. इतक्या जिनसा या रुपायत यायच्या कशा नि दहा रुपये नदीत टाकले नाहीत, तर आईचा शब्द मोडला असे व्हायचे. हा पेच त्याने तिला सांगितला.

ती म्हणाली, 'मी सांगते तुम्हाला काय करायचं ते. एक दहा रुपयाचं कलिंगड घ्या. बाकीचे पैसे खिशात ठेवा. नदीत टाकू नका. कलिंगडात तुमच्या आईनं सांगितलेल्या पाचही वस्तू आहेत. ते नेऊन तिला द्या. मग बघा ती खूष होते की नाही ते.'

त्या मुलाने त्याप्रमाणे केले. व्यापार्‍याच्या बायकोला आपल्या मुलाचे शहाणपण पाहून फार आनंद झाला. ती नवर्‍याला म्हणाली, 'बघा हो, बघा! आपल्या मुलाचं काम तरी बघा.'

ते कलिंगड पाहून व्यापारी म्हणाला, ' हे काही बाळय़ाचं डोकं दिसत नाही.' पण त्याला आश्‍चर्य मात्र खरेच वाटले होते. मग तो मुलाला म्हणाला, 'काय रे, तुला हे करायचं कसं ते कुणी सांगितलं?'

'त्या मजुराच्या मुलीने.'

'बघितलंस?' तो व्यापारी बायकोला म्हणाला, 'मी सांगितलं नव्हतं तुला की, ही काही बाळय़ाची बुध्दी नाही. आता करू दे त्याला लग्न, पण तुझी नि त्याची हरकत नसली, तर त्या मजुराच्या मुलीशीच त्याचं लग्न झालेलं बरं. कारण त्याच्यात तिच्याइतकं लक्ष कुणी घातलं होतं कधी? ती पोरगी खरंच फार हुशार असली पाहिजे.'

'खरंच हो! तिच्याहून शहाणी मुलगी याला कोण मिळणार?'

काही दिवसांनी व्यापारी त्या मजुराच्या घरी गेला. त्याने त्याची मुलगी पाहिली.

'तू एकटी आहेस का गं मुली?' त्याने विचारले.

'हो.'

'तुझे आई-वडील कुठं आहेत?'

'माझे बाबा कवडीचं माणिक घ्यायला गेले आहेत नि आई काही शब्द विकत घ्यायला गेली आहे, पण ती दोघं लवकरच येतील. ते येईपर्यंत जरा थांबावं आपण.'

तिच्या बोलण्याने व्यापारी गोंधळात पडला आणि म्हणाला, 'ठीक आहे, बसतो, पण तुझे आई-वडील कुठं गेले आहेत असं म्हणालीस तू?'

'माझे बाबा कवडीच्या किमतीचं माणिक खरेदी करायला गेले आहेत, म्हणजे दिव्याकरिता तेल आणायला गेले आहेत नि माझी आई काही शब्द विकायला म्हणजे कुणाचं तरी लग्न ठरवायला गेली आहे.'

'व्यापार्‍याला त्या मुलीची बुध्दिमत्ता पाहून फार कौतुक वाटले, पण तो काही बोलला नाही.

तेवढय़ात मजूर नि त्याची बायको घरी आले. हा धनाढय़ व्यापारी आपल्या घरी येऊन आपली वाट बघतो आहे हे पाहून त्यांना फार नवल वाटले. त्यांनी त्याला वाकून नमस्कार केला आणि विचारले, 'आपण आमच्या घरी पायधूळ झाडायची कृपा का केली बरं?'

'तुमची मुलगी माझी सून व्हावी असं मला वाटतं. माझ्या मुलासाठी मागणी घालायला आलो आहे.'

त्यांनी मागणी लगेच मान्य केली. लग्नाचा दिवस ठरला आणि व्यापारी आपल्या घरी गेला. बायको म्हणाली, 'ठीक झालं बाई त्यांनी रुकार दिला म्हणून. मुहूर्तसुध्दा ठरला ते बरंच झालं.'

लग्नाची वार्ता लगेच सर्वत्र पसरली. एवढय़ा धनाढय़ व्यापार्‍याने आपल्या मुलाचे लग्न मजुरासारख्या हलक्या माणसाच्या मुलीशी ठरवले आहे, अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. मजुराच्या कानी ही गोष्ट गेली की, तो घाबरेल आणि लग्न मोडेल अशी त्यांना आशा होती.

काही जण नवर्‍या मुलाकडे गेले आणि त्याला म्हणाले, 'तू जर या लग्नाला संमती दिलीस नि हे लग्न पार पडलंच तर त्या मुलीला तू सात जोडे मार, पण बघ हे त्या मजुराला कळलं तर तोच हे लग्न मोडेल, पण लग्न झालंच तर तू मात्र मुलीला मार. असं केलं तरच बायका नवर्‍याच्या आ™ोत वागतात.'

आणि व्यापार्‍याच्या त्या मूर्ख मुलाने आपण बायकोला कसे वागवणार ते सांगून टाकले. ते ऐकून मजूराला हे लग्न होण्यापेक्षा मोडलेलेच बरे असे वाटले. तो मुलीला म्हणाला, 'पोरी, हे लग्न मोडावंसं मला वाटतं. एखाद्या चोरा-कुत्र्यासारखं त्यानं तुला बडवावं हे काही बरं नाही.'

'बाबा, काळजी करू नका. त्यांचे कान कुणी तरी फुंकले आहेत. माणूस बोलतो एक नि करतो दुसरंच. ते काही मला मारायचे नाहीत. तुम्ही घाबरू नका.'

ठरलेल्या दिवशी लग्न लागले. मध्यरात्री नवरदेव हातात जोडा घेऊन बायकोला मारायला उठला. त्याला वाटले की, ती झोपलेली असेल, पण तिने डोळे उघडले आणि ती म्हणाली, 'असं करू नका. लग्नाच्या रात्री नवरा-बायकोने भांडण करणं अशुभ असते. उद्या रात्री हवं तर मला मारा. आज आपल्यात भांडण नको.'

त्याने ते ऐकले आणि जोडा फेकून दिला.

दुसर्‍या रात्री त्याने जोडा उचलला तेव्हा ती त्याला म्हणाली, 'पहिल्या आठवड्यात नवरा-बायकोचं भांडण होणं अपशकुनाचं आहे. शहाणे असाल तर माझं ऐका. आठ दिवस दम धरा. मग मला हवं तितकं मारा.' याही वेळी नवर्‍याने तिचे ऐकले.

(क्रमश:)