या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२५)विस्तारलेला मातृत्वाचा परीघ

दारू-विक्री बंद करून गावात शांतता निर्माण करणाऱ्या पार्वतीं राजगुडे यांना आमचा मानाचा मुजरा!

ती गावातली साधीसुधी गरीब बाई. हातावर पोट असणारी. मुलींच्या लग्नाला पैसे उभे करता येत नव्हते, हीच घटना निराश पार्वतीच्या आयुष्यातला फार मोठं वळण देऊन गेली. बचत गटाच्या माध्यमांतून त्यांनी गावातल्या बायांना एकत्र केलं. आणि आज ही संघटित शक्ती अनेक विधायक कामं करीत आहेत. विधवांना अनुदान, मागासवर्गीयांना घरकुलांचं वाटप, इतकंच नव्हे तर गेली पाच वर्ष दारू-विक्री बंद करून गावात शांतता निर्माण करणाऱ्या पार्वतीं राजगुडे यांना आमचा मानाचा मुजरा!

ती अक्षरशत्रू. गरीब. अडाणी. सर्वसामान्य शेतमजूर. कालपर्यंत श्रीमंत शेजारीण तिला पाहून मान फिरवायची. गावातली ‘बडे लोग’ तिला दारी उभं राहू देत नसत. ग्रामसभेत पाय टाकायला तिला मज्जाव होता. सरकारी दरबारी तिला कुणी उभं करत नव्हतं. जन्माला आल्यापासून संसारात पडून, चार लेकरांची आई झाली तरी परिस्थिती जैसे थे!
आयुष्याच्या एका वळणावर तिनं हे जगणं नाकारलं, स्वत:लाच प्रश्न केला. किती र्वष आपण हे लाचारीचं जिणं जगायचं? आणि का? आपल्या जगण्याला काहीच किंमत नाही? केवळ गरीब घरात जन्माला आलो म्हणून आपण, आपल्या मुलांनी असंच कण्हत, कुंथत जगायचं? नाही. यापुढे स्वत:चा प्रपंच तर सावरायचा.. पण जोडीनं आपल्यासारख्या इतर गोरगरिबांचाही प्रपंच सावरायचा.. या निश्चयाप्रत येण्यासाठी प्रसंग घडला तो अगदीच साधा! पार्वती राजगुडे हिच्याच नव्हे.. तिच्यासारख्या अनेक जणींच्या आयुष्यात नेहमीच घडतो तसा..
पार्वतीच्या तिन्ही मुली लग्नाला आल्या तशी सावकाराकडे त्यांच्या लग्नासाठी कर्ज काढायला गेली. सावकार म्हणाला, ‘तू रोजावर काम करणारी बाई, तुझ्याकडे डाग नाही. शेतीवाडी नाही. तुला कशाच्या आधारावर पैसे देऊ?’ तिला रडू आलं. तिच्याजवळ तारण होता फक्त तिचा शब्द! पण गरिबांच्या शब्दाला किंमत शून्य असते! ती सावकाराच्या दाराशी तीन दिवस बसून होती. एकाच चिंतेचं गाठोडं उराशी बाळगत! पैसा कसा उभा करायचा? सासूबाई धुणीभांडी करायची. दीर व नवरा मजुरीला शेतावर जायचे. त्या तिघांनी दिवसभर शेतात मजुरी केली की सांजच्याला शेरभर ज्वारी मिळायची. त्यांत खाणारी तोंडं दहा!
‘‘मला सरपंच नाय व्हायचं. सरपंच झाले तर मी माझाच प्रपंच मोठा करेन. गाव हेच माझं घर. मला गावाला मोठं करायचंय. मला पद नको. माझ्या संघटनेला चालना द्या. पदापेक्षा चार लोकांसाठी जगणं महत्त्वाचं! आज चार लोकांचं चांगलं केलं तर चार पोरं माझ्या शब्दासाठी धावून येतील! अशी चार तरुण मुलं, त्यांची कुटुंब चांगल्या मार्गाला लागतील तरच समाजाचं भलं होईल! मला माणूस म्हणून जगायचंय. माझ्या जगण्याला किंमत हवी आहे.’’
रोज अर्धपोटी झोपायचं. आयुष्यभर अन्नासाठी अमाप कष्ट केले. बारा दिवसांची मुलगी घेऊन विहीर खोदाईचं काम केलं. ऑपरेशन झालं त्याच दिवशी कामावर हजर झाली. लोक म्हणाले, ‘अशी कशी आलीस?’ ती शांतपणे उद्गारली, ‘कामावर आले नाय तर संध्याकाळी चार लेकरांच्या पोटांत काय घालू?’ स्वत:ची थोडीफार शेतीवाडी होती. पण शिक्षण नाही. त्याचा फायदा घेऊन शहाण्यांनी ती लुबाडली आणि पार्वतीच्या कुटुंबाला देशोधडीला लावलं. खायला अन्न नाही. ल्यायला वस्त्र नाही. रोजचं जगणं हाच मोठा संघर्ष! पार्वती सावकाराच्या दारातून तिसऱ्या दिवशी रिकाम्या हाती परतली. पण ऊर भरून एक निश्चय झाला होता. जिंदगीत झगडायचं आहेच, पण आता झगडायचं ते स्वत:ला उभं करायला आणि स्वत:बरोबर इतरांनाही आधार द्यायला!
पार्वती त्याच दिवशी वाडीवस्तीत फिरली. आयाबायांना गोळा केलं. त्यांना समजवलं, ‘आपण बचत गट काढू. आज बचत गटात पैसे ठेवा. म्होरल्या बारीला तुमची गरज भागवू.’ पण बायांना ते पटेना. त्या म्हणायच्या, ‘पार्वती बाई तू जा. आम्ही नाही येत. आमचा नवरा दारूडा. सासू लय कडक. आम्ही कधी दाराबाहेर पडलो नाय. हातांत रुपया कधी बघितला नाय. बचत गटासाटी दहा रुपये कुठून आणू?’ पण पार्वतीबाई हरली नाही. ती रोज वाडय़ा वस्त्या पालथ्या घालायची. त्यांच्या घरी गप्पा मारण्याच्या निमित्तानं बचतीचं महत्त्वं पटवायची. त्यांना कळवळून सांगायची, ‘तुमचं जिणं बरबाद झालं. पण तुमच्या सुना-लेकींसाठी तरी विचार करा. बचट गटात या!’ हळूहळू दहा जणी जमा झाल्या. सुरुवातीला असा बचत गट काढायला ग्रामपंचायतीची सही लागते. कुणी तरी आरडाओरडा केला गावभर, ही गट काढून बायकांचा पैसा खाईल? बायका तिच्याकडे संशयाने पाहू लागल्या. तिनं ग्रामपंचायतीच्या सभेत हिशेबाच्या वह्य़ा टाकल्या आणि सगळ्यांची बोलती बंद केली. बचत गटाचा व्यवहार फिरायला लागला तशी बायकांची छान प्रगती झाली. कुणाला शेतीची अवजारं मिळाली तर कुणाला शिवणयंत्र! हळूहळू बचत गट मोठा होऊ लागला. एकदा ‘माविम’चे (महिला आर्थिक विकास महामंडळ) लोक आले. त्यांनी या संस्थेशी संलग्न व्हायला सांगितलं. पार्वती राजगुडेच्या छोटय़ा कामाला आता ‘माविम’सारख्या संस्थेचा मोठा
आधार लाभला.

एकदा पार्वतीकडे एक गरीब विधुर आला. म्हणाला, ‘तू विधवांना मदत करतेस. माझी बायको चाळिशीत गेलेय. मी तीन मुलांचा हा संसार कसा रेटू?’ पार्वतीनं त्याला समजवलं. ‘मला बाई, पुरुष दोघं बी सारखे. मला समाजासाठी काम करायचंय. मी तुला अनुदान मिळवून देईन.’ सांगणं सोपं होतं. पण अनुदान मिळवणं फार कठीण होतं. त्यासाठी खूप कागदपत्रं तयार करावी लागत होती. पार्वती अडाणी. लिहिता-वाचता येत नाही. मग तिनं मुलाकडून फॉर्म भरून घेतला. ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून माहिती घेऊन ती थेट थडकली तहसीलदार कार्यालयात. तिथे पत्र दिलं. पण ते लोक ताकास तूर लागू देईनात. एक दिवस खेटे घालून कंटाळली आणि सकाळपासून तिथं धरणं धरून बसली. तिचा हट्ट एकच. ‘मला गावातल्या गरीब, गरजू पुरुषांना अनुदान मिळवून द्यायचंय. सरकार मदत देतंय तर ती तुम्ही का अडवता? मला लेखी द्या!’ त्यावर मात्र तहसीलदार कार्यालयातून कागद हलला आणि त्या विधुराला अनुदान मिळालं.
या घटनेचा पार्वतीला खूप त्रास झाला. शारीरिक, मानसिक सर्व तऱ्हेने! लोकं तिला रस्त्यात गाठून विचारायचे, ‘त्या माणसासाठी हे तू कशाला करतेस? कोण लागतो तो तुझा? तुला काय पुढारी बनायचंय का सरपंच बनायचंय?’ पण ती गाववाल्यांना स्पष्टपणे बजावे, ‘मला कोणतंही पद नको की कोणाचा रुपयापण नको. मला लोकांचं भलं करायचंय. आज माझं चांगलं वागणं बघून माझ्या मुलाला चांगले संस्कार मिळतील!’
पार्वती लोकांच्या भल्यासाठी झटत असली तरी तिचा तिला प्रपंच होताच. पहाटेच तिचा दिवस सुरू व्हायचा. नऊ वाजता ती मजुरीला जायची. त्याआधी सगळ्यांचा स्वयंपाक करायची. गुरं बघायची. एव्हाना तिने एक गाय, एक शेळी घेतली होती. दिवसभर मोलमजुरी करून संध्याकाळी बैठकांना जायची. माविमच्या लोकांशी चर्चा करायची. त्यांच्याकडून वेगवेगळ्या सरकारी योजना समजवून घ्यायची. तिच्या या कार्यात तिच्या कुटुंबाने खूप साथ दिली. नवरा देवमाणूस! कधी तिला घरी यायला उशीर झाला तर भाजी कर. कालवण-भात घाल अशी मदत करतो. म्हणतो, ‘आम्ही अडाणी ऱ्हायलो. तू तरी पुढे जा.’ मुलगा सुरुवातीला कुरकुरायचा. आपण गरीब माणसं! कशाला थोरामोठय़ांना नडतेस? तिनं मुलाला ठणकवलं, ‘किती दिवस घाबरून दिवस काढायचं? घासलेलं भांड फळीला लागतं ते उजळलेलं असतं म्हणून! तेच भांड साइडला लागलं तर त्यावर किटाण धरतंच ना? जे भांडय़ाचं तेच जिंदगीचं!’ तिच्या मुलानं जयरामनं ते मानलं. आज तो आईचा भक्कम आधार झालाय.

पार्वतीची कळकळ आणि इमानदारी आयाबायांना पटायला लागती तशा त्या आपल्या अडचणी घेऊन तिच्याकडे येऊ लागल्या. पार्वतीनं त्यांना हिंमत दिली. ‘आपण खंबीरपणे उभं ऱ्हायलं नाय तर समाज चांगलं काम करणाऱ्याचे पाय ओढणारच. मग आपली जिंदगी अशीच जाणार कण्हत कुंथत.’ तिनं सगळ्या विधवा, परित्यक्ता स्त्रियांना एकत्र केलं आणि मोर्चा घेऊन तहसीलदार कार्यालयावर धडकली. सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली. या गावातले दारूअड्डे बंद करा. दारूपायी तरणीताठी पोरं मरतात. बायका विधवा होतात. संसाराची धुळधाण होते. पार्वती पन्नास जणींना घेऊन दारूअड्डय़ांवर गेली. ते पोलिसांना, कायद्याला जुमानत नव्हते. एकानं एका बाईला चापट मारली तसं चपला, काठय़ा, दगड जे हाताला लागलं, त्यांनी त्या अड्डेवाल्यांना बायकांनी सडकून मारलं आणि दारूचे अड्डे बंद पाडले. पार्वती अभिमानाने सांगते, गेली पाच र्वष आम्ही गावात कोणाला दारू विकू देत नाही का आकडा खेळू देत नाही.’
एकदा पार्वतीला खबर लागली. सरकारकडून विधवांना अनुदान मिळतं. पार्वतीनं अशा विधवांची यादी केली, ज्यांच्याकडे कसायला जमीन नाही, ज्या वृद्ध आहेत किंवा ज्यांच्याकडे लेकरं लहान आहेत. अशा गावातल्या साठ गरजू व निराधार विधवांना तिनं अनुदान मिळवून दिलं. त्यांना कागदपत्राचा खर्च आला अवघा पन्नास रुपये! आज त्या सगळ्या जणी तिला मनापासून दुवा देत आहेत. असंच एकदा गावातल्या ६० गरीब दलित, मागासवर्गीयांसाठी घरकुलांची मंजुरी आली. ही सरकारी मंजुरी काही लोकांनी माघारी धाडली, असं पार्वतीच्या कानावर आलं. तिनं मुख्य अधिकाऱ्याकडे चौकशी केली. त्यानं कानावर हात ठेवले. त्यावर उत्तर मिळालं, ते लोक आमच्या ‘पार्टी’चे नाहीत. झालं! पार्वतीबाई चवताळली. गरिबाला सराकारी योजनेचा लाभ दिलाच पाहिजे. यादीप्रमाणे घरकुलांचं वाटप झालंच पाहिजे, तिने आवाज दिला. आणि ते घडलंही. घरकुलांचं वाटप झालं. ती म्हणते, ‘मी अडाणी बाई. पण असं काम करता करता कामकाजाचं लय ज्ञान झालं. मी राजकारण जाणत नाही. जे करायचं ते अख्ख्या समाजासाठी करायचं. मला पद नको. मी कोणाकडून रुपया घेत नाही कुणाला खाऊ देत नाय. कुणी उगा विरोध केला तर त्याला सोडत नाय. म्हणून आज पोलीस स्टेशन, तहसीलदार, कार्यालय, सरपंच हापीस कुठं बी ग्येले तरी मानानं खुर्ची देतात. मॅडमचं काय काम आहे ते पहिलं बघा म्हनत्यात!’
सामाजिक कार्यातून पार्वतीची हिंमत आता चांगलीच वाढलेय. ग्रामसभेत दोन गटांत मारामारी झाली तरी तिने गर्दीत शिरून असा आवाज दिला की सगळ्यांनी पळ काढला. ती म्हणते, ‘खाणारा खातोच. भांडता कशापायी? पन जे ऱ्हाईल ते तरी गरिबाला पोचवा. गरिबाच्या टाळूवरचं लोणी कशापायी खाता?’ भांडणं ग्रामसभेतलं असो की घरातलं? पार्वती ते समजुतीनं मिटवण्याचा प्रयत्न करते. पुढाऱ्यांना ती रोखठोक विचारते, ‘फालतू कारणावरून काठय़ा कुऱ्हाडी कशापायी? साधा गाव सांभाळता येत नाही तर तुम्ही जिल्हा कसा सांभाळणार?’ गावकरी तिला पोक्त सल्ला देतात. ‘या मोठय़ा लोकांच्या तू कशाला वाटेला जाते? तुला जिती ठेवतील का ते?’ पार्वतीचं उत्तर सोप्पं आहे, ‘जवान देशासाठी मरतो. मी, समाजासाठी मरेन. अशीपण आजाराने मरणार आहे. तर लोकांचं भलं करताना मरेन!’
पार्वतीची मृत्यूकडे पाहण्याची तटस्थ दृष्टी दर्शवणारा हा एक प्रसंग! एक ऊसतोडणी कामगार बाई दवाखान्यात जाताना विहिरीजवळ मरण पावली. दिवसभर मृतदेह तिथेच पडून होता. तिचं बाळ उशाला रडत बसलेलं! पार्वतीनं संध्याकाळी हे पाहिलं. तिने गटातल्या दहा महिलांना गोळा केलं. पैसे गोळा केले. सरपण, रॉकेल आणलं. पुरुष तिला खांदा देईनात. तिचं क्रियाकर्म करेना. उलट ते पार्वतीला म्हणायला लागले, तिचं प्रेत उचलशील तर तू अडकशील! पार्वती घाबरली नाही. एक बाप्या पुढे येईना बघून पार्वतीसह चार बायांनी कासोटा घालून तिचं प्रेत उचललं. मूठमाती दिली. पोराला आसरा दिला. तिचे दिवससुद्धा केले. पार्वतीला आता समाजकार्याचा सूर सापडला आहे. स्त्रिया, तरुण मुलांना हाताशी घेऊन ती हा गोवर्धन उचलू पाहत आहे. तिच्यातला मातृत्वाचा परीघ विस्तारला आहे.
माधुरी ताम्हणे

                                                                                                                                मागील लेख वाचा

No comments:

Post a Comment