या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१३) तीन आंधळ्यांची गोष्ट

एक गरीब मजूर शहराच्या बाजारातून भीक मागत हिंडत होता. एक वेळ पुरेल इतके तरी अन्न मिळेल की नाही, याचीच त्याला खात्री नव्हती. तो कळवळून म्हणाला, 'नारायणा, तू जर मला शंभर रुपये दिलेस, तर त्यातले दहा मी कुणा गरीबाला दान देईन नि नव्वद रुपये स्वत:कडे ठेवीन.' आणि काय नवल, नारायणानेही ती प्रार्थना ऐकली. त्याने हजारो रुपयांची थैली मजुराला दिली. मजूर आनंदला. मग त्या थैलीतले शंभर रुपये त्याने दुसर्‍या हातात काढून घेतले आणि एका अंध भिकार्‍याला दिले.


शंभर रुपये मिळालेले पाहून भिकार्‍याला आश्‍चर्य वाटले. 'मला तू एवढे पैसे का बरं दिलेस? देव तुझं भलं करो,' असे तो म्हणाला.
मजूर म्हणाला, 'नारायणाने हजारो रुपये मला दिले. तेव्हा 'त्यातले शंभर रुपये मी गरीबाला दान देईन असे कबूल केलं होतं.'
'अरे व्वा! मला जरा बघू दे तरी बाकीचे पैसे. एवढे कुठे भेटतात कुणाला?'
भोळ्या मजुराला त्याचा संशय आला नाही. त्याने ती थैली त्याच्या हातात ठेवली. त्याबरोबर तो धूर्त भिकारी पलटला आणि म्हणाला, 'हे सारे रुपये माझेच आहेत.'
मजुराने हिसकाहिसकी करून थैली काढून घेतली. त्याबरोबर 'धावा, धावा! अंधाचे पैसे घेऊन चोर पळतो आहे. पकडा याला, पकडा,' असे भिकारी ओरडत सुटला.
लोकांनी मजुराला पकडले. मजुराने परोपरीने सांगितले, पण कुणी ऐकेचना. उलट भिकारी म्हणाला, 'अहो, पाहा ही माझी थैली, हिच्यात नऊशे रुपये आहेत.'
लोकांनी पैसे मोजले, तर नवशे रुपयेच निघाले. लोकांना भिकार्‍याचे म्हणणे खरे वाटले. त्याच्या हवाली त्यांनी ती थैली केली. मजुराचे कुणीच ऐकेना. शेवटी मजूर त्रासून भुकेलेला असा घरी परतला.
त्याने बायकोला झालेली हकीकत सांगितली, तेव्हा ती म्हणाली, 'किती वेडे तुम्ही तरी! अहो, काही भिकारी हे महाठक असतात. तुम्हाला त्याचा जरासुध्दा संशय आला नाही? आता जा नि पहा तरी की, ते पैसे तो कुठं ठेवतोय ते.'
'खरंच गं, छान सुचवलंस,' असे म्हणून मजूर घराबाहेर पडला. लवकरच त्याला तो भिकारी दिसला. तो एका प्रार्थनास्थळाकडे चालला होता. तो आत गेला आणि जमिनीवर खाली बसला. 'इथं कुणीसुध्दा नाही,' असे म्हणून त्याने आपली काठी सभोवार तीन-चार वेळा फिरवली. आणि मग तिथे खरेच कुणी नसल्याची त्याची खात्री पटल्यावर तो म्हणाला, 'चला आता कुणाचं भय नाही.' मग तो एका टोकाला गेला आणि त्याने एका कोपर्‍यात खणले. त्या खड्डय़ात त्याने एक मडके पुरून ठेवले होते. त्याने ते बाहेर काढले त्यात ते नवशे रुपये टाकले आणि लगेच ते परत पुरून टाकले. मग तो म्हणाला, 'देवा, तुझी कृपा. आज सकाळीच मला एकदम नऊशे रुपये मिळाले.' 
हे शब्द ऐकून मजुराला फार आनंद झाला. भिकारी तिथून बाहेर पडल्यावर मजूर त्या ठिकाणी गेला. ते मडके त्याने उकरले. सारे रुपये गोळा केले. मडके परत होते तसे पुरून ठेवले आणि तो आपल्या घरी परतला. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, 'छान, पण आता तो भिकारी काय करतो याच्यावर नजर ठेवा. फार जपून राहा. सावध राहा.
दुसर्‍या दिवशी तो मजूर पुन्हा त्या भिकार्‍याच्या मागावर लागला. नेहमीप्रमाणे आपल्याला मिळालेले पैसे खड्डय़ातल्या मडक्यात ठेवण्यासाठी भिकारी गेला. आपल्या मडक्यातले सारे धन नाहीसे झालेले पाहून भिकार्‍याला दु:ख अनावर झाले. तो छाती बडवून रडू लागला. दोन्ही हातांनी तोंड फोडून घेऊ लागला. त्या प्रार्थनास्थळात एक अंध माणूस होता. त्याने भिकार्‍याचा आक्रोश ऐकला. तो तिथे आला आणि म्हणाला, 'का रे, रडतोस का? आरडाओरडा करून तू सार्‍यांना उगीच सतावतो आहेस. तुझ्या ओरडण्यामुळे आम्हाला त्रास होतोय. इथून तू बाहेर पड, नाही तर मी लोकांना बोलावेन. मग तुला ते बाहेर काढतील.'
'माझं सर्वस्व लुटलं गेलं म्हणून मी रडतोय हो. इथं मी सारं धन पुरून ठेवलं होतं. ते चोरानं पळवून नेलंय. पैसासुध्दा ठेवला नाही त्यानं. आता मी काय करू?'
'तू अगदीच मूर्ख आहेस. आता रडणं बंद कर नि थोडा शहाणपणा शिक. मी बघ, माझे सारे पैसे या पोकळ काठीत ठेवतो नि ती सारखी जवळ बाळगतो. प्रार्थनास्थळासारख्या सारखी वर्दळ असलेल्या जागेत रुपये पुरून ठेवल्याचं कुणी ऐकलंय तरी! तर आता माझ्यासारखी पोकळ काठी तू करून घे. मग तुला कसली भीती नाही.
मजुराने हे सारे लक्षपूर्वक ऐकले. त्याने त्या अंध माणसावर पाळत ठेवली. त्याची काठी हस्तगत करायचीच असे त्याने ठरवले. त्याने त्याच्या काठीसारखीच पोकळ काठी करून घेतली. अंध माणसाची काठी नि या काठीची अदलाबदल कशी करता येईल याची वाटच तो बघत होता. संधी मिळाली तेव्हा त्याने अंध माणसाची काठी लांबवली नि आपली काठी तिच्या जागी ठेवली. अंध माणूस प्रार्थना करताना काठी बाजूला ठेवत असे. तीच संधी मजुराने साधली.
मजुराने काठी आणली आणि तिच्यातले रुपये खाली ओतले. ते पाहून मजुराची बायको खूश झाली. ती म्हणाली, 'छान, छान. आता परत जा नि तो अंध काय करतो ते बघा. कदाचित तुम्हाला अजून मोठी दौलत मिळेल.'
मजूर बाहेर पडला. तो अंध माणूस दुसर्‍या एका अंध माणसाजवळ बसलेला होता. आपले धन गेले म्हणून तो ढसाढसा रडत होता.
'रडलास तर खबरदार! तुझाच मूर्खपणा तुला नडला. काठीत कुणी पैसे ठेवतो? मी बघ माझ्या कपड्यात माझे पैसे शिवून ठेवतो. ते कुणाला काढून घेता येतील तरी? तूही तसेच कर.'
मजुराने हे ऐकले आणि त्याने एक युक्ती केली. एक मडके घेतले. वर मध ओतला आणि ते मडके त्याने त्या दुसर्‍या अंध माणसाला दिले आणि तो तिथून गेला, पण जरा गेल्यासारखे करून तो परत फिरला आणि तो अंध माणून काय करतो ते बघू लागला.
मजुराने यावेळी वेश बदलला होता. तो गेल्यावर त्या माणसाने त्या मडक्यातला मध लहान भांड्यात ओतायला सुरुवात केली. दोन-तीन भांडी तर आधीच भरली. अधिक मध मिळावा म्हणून त्याने एक काठी त्या मोहोळात खुपसली. त्याबरोबर मोहोळातल्या मधमाशा उधळल्या. त्यांनी दुसर्‍या अंध माणसाला चावायला प्रारंभ केला. ओरडत तो पळू लागला, पण मधमाशा त्याचा पिच्छा सोडीनात. त्यांनी त्याला ठिकठिकाणी चावून बेजार केले. त्याच्या अंगरख्यात त्या शिरल्या, तेव्हा त्याने तो अंगरखा काढून फेकला आणि उघडा नाचू लागला. सगळे कपडे त्याने काढले, पण माशा चावतच राहिल्या. इतक्यात त्याची बायको तिथे आली आणि तुतीच्या झाडाच्या फांदीने तिने त्या सार्‍या माशा हाकलल्या, नाही तर बिचारा दुसरा अंध खरोखरच मेला असता.
तेवढय़ात मजुराने त्याचा अंगरखा पळवला. त्यातला पैसा पाहून मजुराची बायको खूष झाली. 'आता आपण 
खरंच श्रीमंत झालो,' ती म्हणाली.
काही दिवसांनी अंध भिकारी, पहिला अंध माणूस आणि दुसरा अंध माणूस असे तिघे जण चोरीची तक्रार घेऊन राजाकडे गेले. तेव्हा राजाने दवंडी पिटवली की, 'ज्या कुणी हे कृत्य केले असेल त्याने स्वत: येऊन कबुली दिली तर आम्ही त्याला माफी देऊ आणि वर खूप मोठं इनाम पण देऊ.'
त्याप्रमाणे मजूर तिथे गेला. त्याने सर्व हकीगत राजाला सांगितली, तेव्हा राजा म्हणाला, 'शाब्बास, पण तू हे सारं एकट्याने केलेस की, तुला कुणाची शिकवण होती?'
'महाराज, माझ्या बायकोनं मला वारंवार सूचना दिल्या.'

'ठीक आहे,' असे म्हणून राजाने त्याला मोठी रक्कम दिली. आणि त्याची पाठवणी केली.