या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१४) लग्न जुळवणारा

लग्न जुळवणाराजर्मनीच्या उत्तर विभागातील 'युटिन' गावची ही आगळी-वेगळी वैचित्र्यपूर्ण अशी गोष्ट आहे. या युटिन गावाजवळच 'दोदाऊ' या नावाचा जंगली प्रदेश आहे. या जंगलात सुमारे ६१८ वर्षांपूर्वीचा एक पुरातन प्रचंड ओक वृक्ष आहे. त्या वृक्षामुळे लग्न जमतात, अशी चर्चा आहे. या वृक्षावर एक ढोली आहे.
ही ढोली म्हणजे अनेक तरुण-तरुणींचे आशास्थान ठरले आहे. ही ढोली ज्या वृक्षावर आहे, त्या वृक्षाच्या पत्त्यावर जगातील अनेक देशातील लोक आजही पत्रे पाठवितात. पोस्टमन ही सारी पत्रे या ढोलीत आणून टाकतो आणि ज्यांना मित्र-मैत्रिणी हव्या आहेत किंवा जे अविवाहित असून लग्न करू इच्छितात अशा व्यक्ती येथे येतात आणि या पत्रांच्या सहाय्याने आपापली लग्ने जमवतात व मित्र- मैत्रिणीही मिळवितात. पत्रामध्ये काय मजकूर असतो, त्याच्यावर पत्ता काय लिहितात, या पुरातन वृक्षाला एवढे महत्त्व कशामुळे आले इत्यादी विविध प्रश्नांची उत्तरांची तुम्हाला उत्कंठा असेल. ही उत्कंठा अधिक न ताणता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील माहितीत मिळतील.
या गोष्टीची सुरुवात होते १८९१ सालापासून. म्हणजे तशी ही फार जुनी गोष्ट. परंतु ती मोठी वैचित्र्यपूर्ण असून आपणाला ती परिचित नसणार. आपणाला माहीतच आहे की, जंगल संपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक देशाचे सरकार वन संरक्षक अधिकार्‍याची नेमणूक करते. जंगलातील वनसंपदा म्हणजे वृक्ष, झाडेझुडपे व वन्य पशुपक्ष्यांचे संरक्षण करणे, झाडांची बेकायदा तोड करणार्‍यांना प्रतिबंध करणे आदी कामे या अधिकार्‍याला करावी लागतात.

र्जमनीतील वर नमूद केलेल्या दोदाऊ या जंगल प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी तेथील सरकारनेही त्याकामी अशाच एका अधिकार्‍याची नेमणूक केली होती. त्या अधिकार्‍याला एक मुलगी होती. तिचे नाव होते वॉल्ट्रॉट ओर्थ. लिपझिग या गावातील कार्ल शूटे फेल्शे या नावाच्या एका तरुणावर या मुलीचे प्रेम होते.

या तरुणाचा चॉकलेटस् बनविणयाचा कारखाना होता. या मुलीने एक गंमत केली. या मुलीने त्या तरुणाला प्रेमपत्र लिहून ते त्याला मिळण्यासाठी तिने ते पत्र एका वृक्षाच्या ढोलीत ठेवले आणि प्रियकराला तेथून घेऊन जाण्यास सांगितले. आपल्या घरातील माणसांना कळू नये म्हणून तिने ही युक्ती केली होती.

परंतु वॉल्ट्रॉटच्या कडक शिस्तीच्या वडिलांना पुढे ही गोष्ट समजली. तथापि मुलीवरील प्रेमामुळे त्यांनी आपला राग बाजूला ठेवून मुलीला तिच्या प्रियकराशी लग्न करण्यास परवानगी दिली. तत्पूर्वी या दोघा प्रेमिकांनी परस्परांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमपत्र लिहून या वृक्षाच्या ढोलीचा उपयोग केला. हे प्रेमी युगुल या वृक्षापाशी येऊन परस्परांना लिहिलेली गुलाबी पत्रे घेऊन जात असे. शेवटी या वृक्षाच्या साक्षीनेच दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि या दोघांचे लग्न २ जून १८९१ रोजी या वृक्षाच्या छायेत थाटात पार पडले. या अपूर्व लग्नसोहळवाच्या वेळी वधू आणि वराकडील सर्व नातेवाईक मंडळी हजर होती. अशा तर्‍हेने हा लग्नसोहळा मोठय़ा थाटात पार पडला आणि मग काय, या वृक्षांचे महत्त्व भलतेच वाढले. त्यानंतर अनेक प्रेमिकांचे आणि विवाहेच्छुक तरुण-तरुणींचे हे एक आशास्थान व श्रध्दास्थानही ठरले. या वृक्षाच्या साक्षीने झालेला हा पहिलाच विवाह सोहळा असला तरी त्यानंतरच्या काळात असे अनेक लग्नसोहळे या वृक्षाच्या साक्षीतच पार पडले!

आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हापासून सार्‍या जगभरच्या देशातून अचूक पत्ता लिहिलेली, पोस्टाची तिकिटे लावलेली व पत्र पाठविणार्‍याचा ठावठिकाणा लिहिलेली शेकडो पत्रे या वृक्षापाशी ढोलीमध्ये येऊन पडतात. त्यासाठी रोज पोस्टमन या वृक्षावर शिडीने चढून या वृक्षाच्या मध्यभागी असलेल्या गोल ढोलीत आपल्याजवळील पत्रांच्या थैलीची गाठ सोडून त्यात पत्रे टाकतो. या वृक्षांच्या फांद्यांची एक मजबूत शिडी तयार करण्यात आली आहे. त्या शिडीचाच सारेजण वापर करतात.

देशोदेशीहून येणार्‍या पत्रांवर पुढीलप्रमाणे पत्ता असतो. 'नवरदेवांचा ओक वृक्ष. दोदाऊ जंगल, डी-२४२0 युटिन (र्जमनी) इंग्रजीमध्ये 'ब्राईड-ग्रुप्स, ओक, दोदाऊ फॉरेस्ट, डी २४२0 युटिन (र्जमनी).

आणि 'नवरदेवतांचा ओक वृक्ष बटवडा ठिकाण' असे खास व अधिकृत नाव पोस्ट विभागातर्फे या वृक्षाच्या ठिकाणाला देण्यात आले आहे. ज्यांना जोडीदार मित्र-मैत्रिणींची गरज आहे आणि जे अविवाहित आहेत अशांचे हा वृक्ष म्हणजे एक आशास्थान बनले आहे! दरवर्षी वरील पत्त्यावर सुमारे १000 पत्रे येतात!

अशा या वृक्षाच्या ढोलीतील पत्रे कोणीही घेऊन ती उघडू शकतो व गरजू व्यक्तीशी पत्रव्यवहार करू शकतो किंवा समक्ष भेटू शकतो. परंतु पत्रे उघडून पाहणार्‍याच्या अपेक्षेप्रमाणे त्यात काही नसेल तर मात्र त्या व्यक्ती ती पत्रे पुन्हा त्या ढोलीमध्येच टाकून देतात, अशी ही प्रथा १८९१ सालापासून आजपर्यंत अखंडपणे चालू आहे.


या पुरातन वृक्षासंबंधीची एक आख्यायिका अशी की, एकेकाळी एका राजाच्या मुलाला म्हणजे राजपुत्राला शत्रूने पकडले आणि त्याच्या मुसक्या बांधून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जंगलात सोडून दिले. अर्थात जंगलात उपासमारीमुळे राजपुत्राचा मृत्यू अटळ होता; परंतु योगायोगाने एका अविवाहित तरुण मुलीने त्या राजपुत्राला पाहिले आणि त्याची सुटका केली. तेव्हा राजपुत्राने त्या तरुणीचे आभार मानून तिच्याशी लग्न केले. राजपुत्राला जंगलात ज्या ठिकाणी शत्रूने टाकले होते त्या ठिकाणी त्या दोघांनी ओक वृक्षाचे एक रोपटे लावले होते. ते रोपटे म्हणजेच हा ६१८ वर्षांपूर्वीचा पुरातन वृक्ष असे समजले जाते, असे या वृक्षाचे विलक्षण महत्त्व व इतिहास आहे. या वृक्षाच्या ढोलीतील प्रेमपत्रामुळे आज अनेकांचे विवाह जमून त्याचा अनेकांना लाभ झाल्याची उदाहरणे सांगितली जातात. म्हणूनच या वृक्षाचा लग्न जमविणारा अद्भुत वृक्ष म्हणून उल्लेख केला जातो.