या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१२) गोष्ट एका राजूची

(भाग - २)
'दहा-बारा वर्षं तरी झाली असतीलच,' तो मजूर खेदाच्या स्वरात म्हणाला.
दहा-बारा वर्षं? आणि अजून पुलाचे काम पुरे नाही झाले?' राजू आश्‍चर्याने उद्गारला.
'तुम्हाला नवल वाटणं साहजिक आहे,' तो मजूर पुलाच्या बांधलेल्या कट्टय़ावर हातानं थाप मारत म्हणाला, 'पण कितीही खबरदारीनं बांधकाम केलं, तरी दर खेपेला काम पुरं होता होता पूलच ढासळून पडतो. अशा स्थितीत करणार काय बोला?'
तेव्हा मुकादमाला बोलावून घेऊन राजू त्याला म्हणाला, 'हे बघा, या पुलाच्या पायाखाली सोन्याचे चार नि चांदीचे चार असे एकूण आठ हंडे पुरलेले आहेत. ते उकरून काढायला हवेत आधी. मग या पुलाचं बांधकाम सुरळीतपणे पुरं होईल.'
हे ऐकून मुकादम अन् मजूर चकित झाले. त्यांनी राजूने सांगितल्याबरहुकुम केले. आणि खरोखरच त्यांना पुलाच्या पायाशी चार सोन्याचे आणि चार चांदीचे असे आठ हंडे पुरलेले आढळले. त्यांनी ते बाहेर काढले आणि पुलाच्या कामाला सुरुवात केली. नवलाची गोष्ट म्हणजे यावेळी पुलाचे काम न ढासळता सुरू झाले. हे पाहून मुकादम आणि मजुरांना वाटलं की, हा कुणी दैवी शक्ती लाभलेला तरुण आहे, म्हणून त्यांनी त्याचं नाव-गाव विचारून घेतलं. त्याचे आभार मानले. त्यानंतर राजूने आपला पुढचा प्रवास सुरू केला, पण लवकरच त्याच्या मनात विचार आला की, पुढं कुठं म्हणून जाणार नि मनूला शोधणार? आपल्याला आता मंतरलेली छडी मिळाली आहे. जेवणाख-ाण्याची काहीच ददात पडणार नाही. तेव्हा घरी परत जावं, हेच उत्तम. म्हणून तो थेट घरी परतला. प्रथम त्यानं आपल्या आईला आपला आश्‍चर्यजनक अनुभव सांगितला. त्या गंधर्वांनी सांगितलेले झरा नि पुलाबद्दलचे तोडगे आपण त्या त्या माणसांना कसे सांगितले, याचेही वर्णन त्याने आईला सांगितले. छडीचा दैवी गुण आपण कसा अनुभवला हेही कथन केले.
पण त्याच्या आईचा त्याच्या हकिकतीवर विश्‍वास बसेना. साशंक होऊन ती त्याच्याकडं विचित्र नजरेनं पाहू लागली. तेव्हा त्यानं लगेच त्या छडीचा प्रयोग केला आणि छडी जमिनीवर आपटल्याबरोबर मोठाली थाळी भरून पक्वान्नांचे जेवण पुढय़ात प्रकट झाले. आता मात्र आई थक्क झाली नि अवाक् होऊन एकदा त्या छडीकडं अन् एकदा त्या जेवणाच्या थाळीकडं बघत राहिली. आयुष्याची ददात मिटवणारी अद्भुत कामगिरी बजावल्याबद्दल तिनं त्याला प्रेमानं जवळ घेतलं.
थाळीतलं ते मिष्टान्न जेवताना राजूला अन् त्याच्या आईला मनूची मात्र तीव्रतेनं आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. तो बेपत्ता झाल्यानं तेवढीच चिंता आता त्यांना उरली होती.
पण धाकट्या मनूचं काय झालं याचा शोध घेताना मधल्या काळात त्यानं काय काय दिवे लावले हे पाहावं लागेल. थोरल्या भावाला फसवून बळकावलेले नऊशे रुपये त्यानं खुशाल बेदरकारपणे उधळून टाकले आणि ही उधळपट्टी करताना आपण ढोंगबाजी करून आपल्या थोरल्या भावाला लुबाडलं अन् बेशरमपणे त्याला वाटेतच सोडून पळालो, याबद्दल त्याला जरासुध्दा खंत वाटली नाही.
राजू अन् त्याची म्हातारी आई त्या मंतरलेल्या छडीच्या बळावर चांगल्यापैकी खाऊनपिऊन दिवस घालवीत होते. दरम्यान, राजूच्या सांगण्याप्रमाणे गोड बनलेला कडवट झरा अन् तो दुर्दैवी पूल अखेर एकदाचा पुरा झाल्याची अजब वार्ता त्या प्रदेशाच्या राजाच्या कानावर गेली. गुणी जनांचा गौरव करण्याबद्दल तो राजा विख्यात होता. साहजिकच त्यानं मानाची पालखी पाठवून राजूला सन्मानाने बोलावून घेतलं आणि भरदरबारात त्याचा गौरव करून त्याला भरपूर धनाची बिदागी दिली. याशिवाय पुलाच्या पायात सापडलेल्या सोन्या-चांदीच्या आठ हंड्यांतील काही सोने आणि चांदीही त्याला बहाल करण्यात आली. अशा रीतीनं धन नि मान मिळालेल्या राजूनं मग राजधानीतच मोठा वाडा बांधला अन् लग्न करून तो आई नि बायको यांच्यासह सुखासमाधानात राहू लागला.
राजूचा आता विश्‍वासराव झाला असला, तरी आपल्या पूर्वीच्या दरिद्री अवस्थेची जाणीव त्याने ठेवली होती आणि म्हणून गोरगरीबांना अन्न नि वस्त्र दान करण्याची प्रथा त्यानं आपल्या वाड्यावर सुरू केली होती. असाच एके दिवशी वाड्यावर आलेल्या गरीबांना अन्न-वस्त्र दान करीत असताना त्या गर्दीत त्याला आपला धाकटा भाऊ मनू अचानक दृष्टीस पडला. ओढलेला चेहरा नि मळकट फाटके-तुटके कपडे अंगावर अशा दरिद्री अवतारात मनू होता. तरीसुध्दा राजूनं त्याला ओळखलंच.
बेपत्ता झालेला मनू असा अचानक सापडल्यानं राजूला वारेमाप हर्ष झाला. लगेच त्याला वाड्यात बोलावून घेऊन राजूनं प्रेमभरानं त्याचं स्वागत केलं. आईलाही कमालीचा आनंद झाला. मग मनूला आंघोळ करायला लावून उंची कपडे देण्यात आले. जेवणाची तर चंगळच होती. 
जेवण वगैरे उरकल्यावर राजूनं आपल्या भोळय़ा स्वभावानुसार धाकट्याला विचारलं, 'इतके दिवस होतास कुठं अन् करत होतास काय? तुझी-माझी चुकामूक झाली, त्यामुळे पैशांअभावी माझी काय अवस्था झाली असेल, या कल्पनेनं तुला भारी दु:ख झालं असेल ना?'
'नाही तर काय?' कावेबाज मनू थोरल्या भावाच्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेत दडपून म्हणाला, 'मी अतिशय भांबावून गेलो. नऊशे रुपयांच्या भांडवलावर दुप्पट-तिप्पट कमाई करीत ती अधिक वाढवीत जाताना मनात उडणारी खळबळ अनुभवायला माझ्याबरोबर तू नसणार या कल्पनेनंच माझं काळीज गलबललं! त्यामुळे मला कबूल करणं भाग आहे की, धंदा करण्याचा माझा उत्साहच मावळला आणि त्याचा परिणाम अगदी उलटा झाला. त्या नऊशे रुपयांचे आठशे, आठशेचे सातशे, सातशेचे सहाशे अशी उतरती भाजणी होत गेली. शेवटी माझ्यापाशी अवघा एक रुपया उरला अन् तोसुध्दा चुटकीसरशी खचरून गेला.' ही गोष्ट मनूने अशा काही वेड्यावाकड्या नि हास्यास्पद पध्दतीनं सांगितली की, राजूला मुळी हसूच फुटलं आणि त्यानंतर तो मनूला जास्त काही प्रश्न विचारण्याच्या भानगडीतच पडला नाही.
राजूच्या टुमदार वाड्यातली ती जेवणाची ऐसपैस खोली पाहून मनूला थोरल्या भावाच्या भाग्याचा भारी हेवा वाटला. त्यानं ही सारी धनदौलत कशी काय कमावली, हे जाणून घेण्याची उत्कंठा मनूला स्वस्थ बसू देईना अन् त्यानं राजूला प्रश्न केलाच, 'पण दादा, तू मात्र तुझ्या धंद्यात भलतंच बस्तान बसवलेलं दिसतंय! हे कसं काय जमवलंस म्हणतो मी?'

'छट्!' राजू प्रांजलपणे म्हणाला, 'धंदा करून ही कमाई नाही केलेली मी.'

'असं?' खुर्चीत बसल्या जागी पुढं वाकून मनू नवलानं उद्गारला. 

राजूनं मग त्याला आपल्या साहसी प्रवासाची अजब कथा सांगितली. थोरल्या भावाची ती अद्भुत हकीकत ऐकून मनू चकित झाला. त्याच वेळी त्याचे कावेबाज डोके चमकले. गंधर्वांच्या त्या देवळात जाऊन आपणही आपलं भाग्य उजळणारं काही तरी गुपचूप मिळवावं, असा निश्‍चय त्यानं त्याच वेळी मनाशी केला.
आणि एके दिवशी संध्याकाळी संधी साधून तो थोरल्या भावाच्या घरातून कसल्या तरी सबबीवर निसटला आणि मग शक्य तेवढय़ा झपाट्यानं त्यानं गंधर्वांचं विसाव्याचं ठिकाण असलेलं ते देऊळ गाठलं. तिथं पोहोचताच तो तडक वरच्या मजल्यावर गेला आणि काळोख पडल्यावर त्यानं ती चिंचोळी खोली गाठली. तिथं तो गुपचूप लपून राहिला. कानोसा घेत बसला.
मध्यरात्रीच्या सुमारास काही मंडळी बाहेरच्या खोलीत येऊन बसल्याची चाहुल मनूला लागली. त्यांच्यापैकी एकजण उद्गारला, 'माझी ती मंतरलेली नागमोडी छडी इथं हरवल्यापासून आपल्याला जेवणाचे पदार्थ इथं आणायची तसदी घ्यावी लागते आहे. माझी ती छडी कोणी पळवली कोणास ठाऊक! तो पुन्हा या बाजूला फिरकायचा नाही बहुधा. तरीपण आणखी काही आमिषाने एखादे वेळी यायचासुध्दा तो इक.डे तेव्हा परत एकदा शोध घेऊन तर पाहू या कुठं लपलाय का ते.' अर्थात, तो छडीचा मालक असला पाहिजे हे मनूने जाणलं.
आणि खुच्र्या-आसनं सरकवल्याचा आवाज मनूच्या कानी पडला. दोघे-तिघे जण इकडे-तिकडे फिरत असल्याचेही त्यांच्या पावलांच्या चाहुलीवरून त्याच्या लक्षात आलं. तो सावध होऊन, अंग चोरून दाराजवळच्या कोपर्‍यात कसलीही हालचाल न करता मुकाट उभा राहिला. अर्थात आपण सापडले जाऊ या धास्तीनं त्याचं ऊर धपापत होतं, अंग थरथरत होतं आणि त्याची भीती खरी ठरली. त्या खोलीचं दार ढकलून तो छडीचा मालक थेट आत शिरला अन् त्यानं मनूला बेमालूम पकडलं. त्यानं मुळी मनूचं नाकच चिमटीत घट्ट धरलं अन् तसंच त्याला ओढत बाहेरच्या खोलीत आणलं. मग तो ठणकावून गरजला, 'हं. अस्सं! म्हणजे माझी छडी चोरून नेणारा बदमाष हाच म्हणायचा!' आणि असं म्हणत त्यानं मनूचं नाक अधिक जोरानं खेचलं. मग आणखी आणखी खेलत राहिला तो.
गंमत अशी की, खेचण्याच्या प्रत्येक झटक्याबरोबर मनूच्या नाकाची लांबी वाढत वाढत जाऊन शेवटी ते तब्बल चार हात लांब झालं. 'एवढी शिक्षा त्याला पुरे झाली,' असं दुसरा एक जण म्हणाला, तेव्हा त्यानं मनूचं नाक सोडून दिलं आणि त्याला तिथंच सोडून ती मंडळी तिथून निघून गेली.
मध्येच कुठं अडमडू नये म्हणून मनूने आपलं ते लांबलचक नाक चेहरा नि मानेभोवती गुंडाळलं. तशा केविलवाण्या अवस्थेत, खेदानं मनू घरी परतलेला पाहून राजूला अतिशय वाईट वाटलं.
मनूने सांगितलेली करुणाजनक हकीकत ऐकताच छडीच्या मालकाला त्याची छडी लगेच परत नेऊन द्यायचं राजूने ठरवलं. छडी परत मिळताच मनूला तो क्षमा करील नि त्याचं नाक पुन्हा होतं तसं बेताचं कसं होऊ शकेल, ते सांगेल, अशी आशा राजूला वाटली. घाई-गडबडीनं त्या दिवशीच रात्री तो त्या देवळात जाऊन दाखल झाला, पण त्या गंधर्वांच्या आधीच जाऊन कुठं तरी आडबाजूला उभं राहायचा त्याचा बेत फिसकटला. कारण राजू तिथं जाऊन पोहोचण्याच्या आधीच ती गंधर्व मंडळी आपल्या नेहमीच्या जागी येऊन बसलीही होती. वरच्या मजल्याचा जिना चढता चढताच त्यांचं बोलणं कानी पडल्यानं त्याला हे कळून चुकलं. थट्टा-मस्करीचं काही तरी बोलणं चाललं होतं त्यांचं.
'काल रात्री भली गंमत झाली एकूण. त्या बदमाषाचं नाक ओढताना खूप मजा आली. एखाद्याचं नाक एवढं लांब होण्याएवढं नाजूक असेल याची कल्पना नव्हती मला. मात्र लेकाला चांगली अद्दल घडली यात शंका नाही.' हा आवाज त्या छडीवाल्याचा असला पाहिजे, हे राजूनं ओळखलं अन् तो जिन्यातच उभा राहून त्यांचं पुढचं बोलणं कान टवकारून ऐकू लागला.
'पण काय हो..' दुसर्‍यानं कुतूहलानं विचारलं, 'त्याचं ते नाक पुन्हा नीट होण्यासाठी काही तरी उपाय असेलच ना?'
'आहे ना!' छडीचा मालक म्हणाला, 'माझी ती नागमोडी छडी आहे ना, ती एक जणानं जमिनीवर आपटायची, त्याच वेळी त्या लांबनाक्यानं स्वत:चं नाव उच्चारायचं. अशी बारा वेळा ती छडी जमिनीवर आपटली अन् त्याचबरोबर बारा वेळा त्या लांबनाक्यानं आपलं नाव उच्चारलं म्हणजे त्याचं ते लांबुडकं नाक पूर्वीसारखं योग्य आकाराचं बनेल.'
भावाच्या लांबुडक्या नाकावरचा तोडगा अनायसे कळल्याबरोबर राजू मग तिथं कशाला थांबतोय? त्यानं मागल्या पावली तडक घराची वाट धरली. घरी परतताच त्यानं लगेच मनूला गाठलं, तर तो केविलवाणा होऊन आपलं लांबुडकं नाक गोंजारत एकाकी बसला होता. नाक पुन्हा नीट होण्यासाठी कसं कसं करायचं ते त्याला राजूने समजावून सांगितलं. मग राजूनं ती मंतरलेली नागमोडी छडी जमिनीवर आपटली. त्याबरोबर मनू उद्गारला, 'मनू!'
छडीचा पुन्हा जमिनीवर आवाज झाला. 'मनू,' मनू उद्गारला. बाराव्यांदा छडी आपटल्यावर राजूनं आपटणं थांबवलं, पण आयुष्यभर प्रत्येक गोष्टीत अधाशीपणा करणार्‍या मनूचं यावेळीही पुरतं समाधान झालं नाही. त्यानं विनवलं, 'दादा, आणखी एकदा!' होऊ द्या मनूच्या मनासारखं म्हणून राजूनं पुन्हा एकदा छडी आपटली. मनू लगेच उद्गारला, 'मनू'. पण मनूचा हा हावरटपणा त्याला भलताच नडला. पूर्वीसारखं योग्य आकाराचं बनलेलं त्याचं नाक आता कमालीचं चपटं, पार सपाट झालं!
मनूला त्याची चूक कळून चुकली, पण वेळ निघून गेली होती. आता यापुढे आधाशासारखे करायचे नाही, हे ठरवून दोघे भाऊ प्रेमाने एकत्र राहू लागले. 

(समाप्त )