या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१८) नशिबातल्या मोहरा..

एका गावात एक रामभाऊ नावाचा गृहस्थ राहात होता. तो सुंदर सुंदर कापड विणत असे. तो राजाला, सरदारांना वस्त्रे पुरवी. त्याच्या कापडाला खूप मागणी असे. तो खूप कष्ट करी व त्याचे फळ त्याला योग्य प्रमाणात मिळे.
हळूहळू त्याने बरीच संपत्ती जमा केली.

एकदा तो आपल्या बायकोला म्हणाला, 'आता मी इथे राहात नाही. परदेशी जातो आणि खूप संपत्ती मिळवतो.'

त्याची बायको म्हणाली, 'परदेशी गेल्यावरच धन मिळते आणि इथे मिळत नाही, असे मुळीच नाही. जे दैवात असते ते कुठेही मिळणारच. तुम्ही इथेच रहा. आहे त्यात समाधानी वृत्ती ठेवा.'
तो म्हणाला, 'तुझे बोलणे मला बिलकूल पटत नाही. जो कष्ट करतो, त्याला लक्ष्मी मिळते. या गावी एवढे काम नाही. परदेशात खूप काम मिळेल. केवळ भाग्यावर माझा विश्‍वास नाही.' त्याने आपला निर्धार पक्का केला. तो वर्धमान नावाच्या एका शहरात गेला. तिथे तो तीन वर्षे राहिला. आणि त्याने तिथे तीनशे सोन्याच्या मोहरा कमावल्या व तो आपल्या गावी येण्यासाठी निघाला.
त्याला वाटेत एक जंगल लागले. त्याला जंगली जनावरांचे भय वाटू लागले, म्हणून तो झाडावर चढला आणि एका मोठय़ा फांदीवर पहुडला. थोड्याच वेळात त्याला झोप लागली. त्यावेळी त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात दोन माणसे एकमेकांत संभाषण करीत होता. 
एक जण म्हणाला, 'अरे विधात्या, या रामभाऊच्या नशिबात फक्त गरजेपुरते धन असताना, तू त्याला तीनशे सोन्याच्या मोहरा कशाला दिल्यास?'
दुसरा म्हणाला, 'अरे कर्मा, जो मेहनत करतो, त्याचे त्याला पुरेपूर फळ मिळते, पण त्यापुढे त्याचे काही बरे-वाईट करणे हे तुझ्या हातात आहे. माझ्या हातात नाही.'
अशा स्वप्नामुळे रामभाऊ खडबडून जागा झाला. त्याने आपल्याजवळचे गाठोडे पाहिले, पण त्या गाठोड्यात सोन्याच्या मोहरा नव्हत्या. तो दु:खी झाला.
त्याने विचार केला, अरेरे! हे काय झाले? मी इतक्या कष्टाने मिळविलेले माझे धन नष्ट कसे झाले? माझे कष्ट वाया गेले. आता मी रिकाम्या हाताने परत घरी कसा जाऊ? बायकोला आपले तोंड कसे दाखवू? आपले मित्र आपली निंदा करतील, ती कशी मी ऐकू?'
हा विचार करून तो पुन्हा शहरात आला व कष्ट करू लागला. एक वर्षात त्याने पाचशे सोन्याच्या मोहरा मिळवल्या व तो घराकडे येण्यास निघाला.
माझ्या नशिबात फक्त अन्न-वस्त्र असेल आणि मी श्रीमंत होऊ नये असे जर निश्‍चित असेल तर हे धन माझे पुन्हा नष्ट होईल, असा त्याने विचार केला, मात्र यावेळी तो झोपला नाही. रात्रभर तो जंगलात झाडावर बसून राहिला. सकाळ होताच तो गावाकडे निघाला.
त्याने मिळविलेल्या पाचशे सुवर्ण मोहरा आपल्या पत्नीला दिल्या व घडलेली हकिकत सांगितली. ती म्हणाली, 'माझेच बोलणे खरे झाले. पहिल्या तीनशे मोहरा आपल्या भाग्यात नव्हत्या, म्हणून त्या नष्ट झाल्या. आताच्या पाचशे मोहरा आपल्या नशिबात आहेत. त्यांचा आपण सदुपभोग करू. आता इथेच राहून कष्ट करा.'
रामभाऊला तिचे बोलणे पुरेपूर पटले.

                                                                       मागील लेख वाचा