या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२२)आई चिडते तेव्हा..

महीन्यातुन एकदा तरी आई जाम चिडते..
आई चिडते तेव्हा मग बरेच काही घडते..

आई चिडायला तेव्हा साधं कारणही पुरतं..
चहा आहे का नुसते उकळलेले पाणी? कधी एवढचं बाबांनी म्हणलेलं असतं
(आईचं पित्त तेवढ्यावरुनच मग जाम खवळतं..)

तिला चिडलेली पाहुन मग बाबा भीगी बिल्ली होतात..
कपभर चहा एका दमात घशाखाली ढोसतात...(आईचा शब्द.)

सगळं मला माहीती असते..आता पुढे काय होणार!
बाबा आता गार पाण्यानेच बुडुबुडु करणार..

आई किचनमध्ये आता आदळआपट करेल..
जास्तच चिडली असेल तर मला नक्की एक धपाटा घालेल..
(ह्याची तयारी व त्यानंतर पसराव्या लागणार्या भोकाडाची तयारी मी आधीच केलेली असते.)

बाबांची एव्हाना आता नक्कीच वाट लागलेली असणार..
त्यांना डब्यात शिर्याऐवजी,आता कार्ल्याची भाजी मिळणार..

नेहेमीसारखा रुमाल ही बाबा आज नाहीत विसरणार..
विसरले तरी द्यायला मात्र, आज आई नाही जाणार...

घरामधला फोन मग थोड्या वेळाने वाजेल..
बराच वेळ तो वाजत राहील..मग थांबेल..पुन्हा वाजेल..पुन्हा थांबेल..

मी शाळेतुन यायच्या आधीच बाबा लवकर घरी येणार..
माझ्यासाठी काही खाऊ,आईसाठी नवी साडी आणणार..

आईच्या चेहर्यावरही आता सकाळचा राग नसणार..
माझं गुणाचं सोनं म्हणुन उगाचचा पापा घेणार..(माझा)

पायात घोळणार्या मांजरासारखे बाबा आता सारखे तिच्या मागे मागे करणार..
फुसके फुसके जोक करुन तिला उगीच हसवणार...

संध्याकाळी मग आता आम्ही बागेत जाणार..
मला खेळायला सोडुन दोघेही झाडामागे बसणार..

हॉटेलमध्ये मग आम्ही मस्तपैकी जेवणार..
जेवणानंतर बाबा आईसक्रिम ही घेणार...

घरी येताना बाबा एक गजरा घेणार..
आई हसत हसत तो केसात माळणार..
(त्यावेळी मला ती दोघेही फार फार आवडणार..)

दमलेला मी लवकर रात्री बाबांच्या कुशीत झोपणार..
गाढ झोपेत कधीतरी मला फुलांचा मस्त वास येणार..

मध्येच कधीतरी आई मला तिच्या कुशीत घेणार..
तिला बिलगुन मग मी अगदी गाढ गाढ झोपणार..

दुसर्या दिवशीचा चहा आता बाबांनी केलेला असणार....
अन आई दुसर्या दिवशी फार फार आनंदी असणार.....

आई जेव्हा कधी चिडते तेव्हा हे अगदी न चुकता असेच होणार...
अन बाबाही त्यासाठी एखादी चुक करणार म्हणजे करणार!