या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२२)यश संघर्षांच्या वाटेवरचं..

कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या छोटय़ा खेडय़ातील रेखानं आत्मनिर्भर होत गावातील महिलांच्या प्रगतीची द्वारे खुली केली आहेत. लाखभर रुपयांची उलाढाल असलेला आठवडी बाजार सुरू करणं असो की गावात महिलांचं लेझीम पथक काढणं असो, दारूबंदी करून गावात शांतता आणणं असो की, रोजगाराच्या नवनवीन संधी मिळवून देणं असो, गावच्या महिलांच्या मदतीनं रेखानं गावात मोठा बदल घडवून आणला आहे. संघर्षांची आणि विधायक कामाची मशाल पेटवून अनेक महिलांना प्रकाशाची पाऊलवाट दाखवणाऱ्या रेखा दावणे यांना आमचा मानाचा मुजरा!
तिची कथा आहे संघर्षांची. वैयक्तिक जीवनात एकाकी जीवन जगावं लागत असलं तरी मनातील उमेदीची ज्योत प्रज्वलित ठेवून ती धर्यानं लढते आहे.. सामाजिक प्रश्नांसाठी-बदलांसाठी अंगीकारलेल्या तिच्या या लढाऊ बाण्यातूनच तिच्या छोटेखानी गावात विधायक कार्याची मालिका आकाराला आली आहे. आठवडी बाजाराचा पाया रोवत तिनं स्त्रियांच्या अर्थकारण-स्वावलंबनाला दिशा दिली. गावातील अवैध दारू विक्रीविरोधात पदर खोचून उभे राहात त्याचा पुरता नायनाट केला. खेडय़ातील बायांना जमवून पारंपरिक लेझीम खेळाला पुनरुज्जीवन देत शरीरिक सक्षमतेची सुरुवात केली. बँक मित्रा बनत छोटय़ा व्यापार-व्यवसायासाठी अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामीण अर्थकारणाला नवा आयाम मिळवून दिला.. असे बरेच काही घडले आहे ते नेज-शिवपुरी या कोल्हापूर जिल्ह्य़ातील एका छोटेखानी गावात. आणि हे सारे घडविण्यात पुढाकार होता तो रेखा दावणे या पस्तिशीतील तरुणीचा! व्यसनी नवऱ्याच्या मारझोडीला कंटाळून तिने माहेर गाठले आणि या माहेरगावी तिच्या सामाजिक कार्याचा मळा फुलत-बहरत राहिला.
कोल्हापूर-सांगली या राज्य मार्गावर असणारे हातकणंगले हे तालुक्याचे गाव. याच गावच्या उत्तरेला सुमारे दहा कि.मी. अंतरावर बाहुबली हे जैन तीर्थस्थळ आहे. तिथलेच नेज हे गाव. गावाचा विस्तारित भाग शिवपुरी नावाने ओळखला जातो. गावाला नेज-शिवपुरी असंच संबोधलं जातं. येथे दादू आण्णाप्पा घाटगे यांचे छोटेखानी घर आहे. दलित समाजाचे घाटगे मूळचे कागल गावचे. नोकरीच्या निमित्ताने ते या गावात येऊन राहिले. पत्नी, मुलगा, तीन मुली असा त्यांचा परिवार. रेखा त्यांची कनिष्ठ कन्या. १९९६ मध्ये रेखाने दहावीची परीक्षा दिली आणि रमेश देवणे यांच्याबरोबर तिच्या लग्नाचा बार उडवला गेला. खेडय़ात वावरलेली रेखा सासरी पुण्याला राहण्यास गेली. मात्र नवऱ्याची अनियमित नोकरी, त्यातच लागलेलं दारूचं व्यसन आणि त्यातून भांडणं आणि मारझोड हे रोजचं होऊ लागलं तेव्हा रेखाचं जगणे असह्य़ बनलं. अखेर विदिर्ण झालेल्या रेखानं माहेर गाठलं. चार-सहा महिने झाले नाही तोच वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यात निधन झालं. तिचा भविष्यमार्ग अधिक धुसर बनला..
एके दिवशी, घरापासून काही अंतरावर सुरू असलेल्या महिलांच्या बैठकीनं तिचं कुतूहल जागृत केले. महिला आíथक विकास महामंडळाच्यावतीनं (माविम) तिथं बठक घेतली जात होती. खेडय़ापाडय़ातील वंचित, दुर्बल, मागास महिलांना स्वावलंबी करणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती ऐकून निराश रेखाच्या मनात आशेची पालवी फुटू लागली. तिनं पुढाकार घेत आपल्या गल्लीतल्या महिलांसाठी बैठक आयोजित केली. माविमच्या सहयोगीनीनं दिलेला सल्ला त्यांच्या मनात खोलवर रुजला आणि २ जुल २००९ला पूर्वा बचत गटाची स्थापना झालीही. अनेकांना रोजगाराचा नवीन मार्ग उपलब्ध झाला. कुणी भाजी विक्री तर कुणी किराणा दुकान टाकायचा निर्णय घेतला. रेखा बचत गटाची सदस्य बनली. तेच तिच्या सामाजिक कार्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल!
आता पुढचं पाऊल होतं ते गावविकास समिती सुरू करण्याचं. रेखानं पुढाकार घेत गावातील वेगवेगळ्या बचत गटांना एकत्रित केलं. तोवर गावात १२ बचतगट स्थापन झाले होते. या प्रत्येक गटातील दोन सदस्या व आणखी एक सदस्य असे मिळून २५ महिला सदस्यांची ‘वैष्णवी महिला गाव विकास समिती’ स्थापन झाली. या निमित्ताने गावातील महिला प्रथमच एका जाजमावर जमल्या. बठकांचे सत्र सुरू झाले. त्यातूनच विधायक कामांचा पाया घातला गेला. वैयक्तिक, कौटुंबिक, गावपातळीवरील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला गेला. परिणामस्वरूप महिला समस्या घेऊन येऊ लागल्या. एकेक प्रश्न सुटू लागले. कोणाची तक्रार असायची नवरा दारू पिऊन भांडतो, कोणी म्हणायचे सासूने छळवाद मांडलाय. मग महिला गाव समिती तेथे धावून जायची. तक्रार करणारी बाई आणि नवरा वा सासू यांना समजावून सांगायची. थेट समुपदेशन नसलं तरी त्याला साजेसा असा ग्रामीण ढंगातील समजावणीचा बाज असायचा. गावची समितीच घरी आली, प्रमुख बायका उंबरठय़ाजवळ आल्या म्हटल्यावर नवरा-सासूही नांगी टाकायचे. समितीनं दिलेला सल्ला शिरोधार्य मानत मग गोडीगुलाबीचा संसार सुरू व्हायचा. अशा कामातून महिला गाव समितीचं महत्त्व लोकांच्याही लक्षात येऊ लागलं आणि शब्दाला वजन आलं. समितीच्या माध्यमातून आणखी एक पाऊल पडलं ते आठवडी बाजार सुरू करण्याचं.
शेती, दुग्ध व्यवसाय असा जोडधंदा असणाऱ्या गावातील महिलांना बाजाराची उणीव जाणवत होती. एक तर त्यांना कुंभोज वा तालुक्याच्या हातकणंगले गावाला जावं लागे. गावात बाजार सुरू केला की प्रवासाचे पसे वाचतील शिवाय परसदारात- गुंठाभर जागेत पिकवलेला भाजीपाला गावातच विकून चार पसे मिळविण्याची संधी मिळणार होती. म्हणून मग त्यासाठी प्रयत्न करण्याचं रेखा व इतर सदस्यांनी ठरविलं. तथापि, संकल्प आणि पूर्ती याच्यात किती महद्अंतर असते याचा प्रत्यय आला.
सुरुवातीला नकारघंटा वाजवली ती गावच्या ग्रामपंचायतीनं. तिथे अर्ज दिला पण नकार आला. रेखा सदस्यांसह अथक पाठपुरावा करत राहिली. त्यांची चिकाटी आणि जिद्द पाहून अखेर ग्रामपंचायतीनं ठराव मंजूर केला. पण खरी लढाई पुढेच होती. बाजार नेजमध्ये सुरू व्हावा की शिवपुरीच्या हद्दीत, असा वाद झडू लागला. मूळच्या एकाच गावच्या दोन भागांचा हा जणू सवती मत्सर! अखेर १३ मे २०१०ला पहिला आठवडा बाजार शिवपुरी येथे सुरू झाला. जागेच्या प्रश्नावरून एकानं तक्रार केली आणि पोलिसांनी महिला गाव समिती सदस्यांना पोलीस ठाण्यात येण्याचा आदेश दिला. दिवेलागणीनंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या बायांची हा संदेश मिळताच त्रेधातिरपिट उडाली. रेखानं धीर देत रात्री अकरा वाजता पोलीस ठाणे गाठले. पाठोपाठ गच्च भरलेल्या दोन ट्रकमधून गावच्या महिला बेरात्री पोलीस ठाण्यात लढाऊ बाण्यानं हजर राहिल्या.

रेखा दावणे अध्यक्ष असलेल्या हातकणंगलेतील लोक संचालित केंद्राने आजवर पावणेआठ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. १२२ बचतगटांना त्याचा लाभ झाला असून या महिला पशुपालन, कुक्कुटपालन, शिलाई मशीन, ब्युटीपार्लर, चप्पल विक्री, झाडू विक्री असे विविध प्रकारचे व्यवसाय करीत पसे मिळवत संसारात सुखाचे क्षण पेरीत आहेत.
रेखानं बाजार सुरू करण्याची निकड, त्यांच्या प्रयत्नांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी वस्तुस्थिती समजून घेतली. आणि आठवडी बाजार सुरू राहिला.. त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळायला लागला की नेजमध्ये दुसरा बाजार भरू लागला. आता दोन्ही बाजारात दरमहा अडीच लाख रुपयांची उलाढाल होते. भाजीपाला पिकविणाऱ्या महिलांच्या हाती पसे येऊ लागले. वडापावसह आणखी काही खाद्यपदार्थाच्या गाडय़ा सुरू करणाऱ्या गरिबांच्या घरी बरकत आली आहे. घराजवळच बाजार सुरू झाल्याने वेळ-पशाची बचत झाल्याचे समाधान गृहलक्ष्मींना मिळत आहे.
एक संघर्ष जिंकल्यानंतर महिला गाव समितीने आणखी एका सामाजिक विषयाला वाचा फोडण्याचे ठरविले. गावात हायस्कूल नसल्याने मुली दुसऱ्या गावात शिकण्यासाठी जात. गरीब मुलींना चालत जाणे भाग पडे. अशा एकाकी मुलींना गाठून टवाळकी करणारे तरुण, दारुडे त्यांची छेडछाड करीत. तसेच गावात एकटय़ा बाईला गाठून दारुडे शेरेबाजी करीत. हा उच्छाद पाहून महिला गाव समितीनं दारूबंदी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अवैध दारू विक्री करणाऱ्यांची भेट घेऊन गावाच्या भल्यासाठी दारू विक्री बंद करण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्याने होकार दिला, पण आठवडय़ाभरात जागा बदलून पुन्हा दुकान थाटलं. दारू दुकान कोठे सुरू आहे, दारुडे तिकडे कधी जातात ही माहिती काढण्यासाठी रेखानं एक शक्कल लढविली. तिनं शेजारची वानरसेना गोळा गेली. मुलांना दारुडय़ांच्या पाळतीवर राहण्यास सांगितलं. पक्की खबर मिळाल्यानंतर एके दिवशी गावाबाहेर असणाऱ्या दारूच्या ठेल्यावर धाड टाकून तो उद्ध्वस्त केला. दारू विक्रेत्यानं गयावया करीत सुटका करून घेतली. थोडय़ाच दिवसांत तो मूळ पदावर आला. तेव्हा रेखा व सहकाऱ्यांनी त्याला धडा शिकविण्याचा निर्धार करीत त्याचं घर गाठलं. त्याच्या परसदारात प्लास्टिकच्या बादल्यांमधली दारू त्यांच्या नजरेस पडली आणि सगळ्या महिलांनी मिळून अड्डेवाला व पुरवठादार यांची धोबीपछाड सुरू केली. त्यांना पळताभुई थोडी झाली. दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देत पुन्हा त्याच्याकडून दारू विक्री झाली तर सोडणार नाही, असा दमही भरला. तेव्हापासून गावातील अवैध दारू विक्री बंद झाली. गावातील लोकांचे दारूचे व्यसन बऱ्याच अंशी बंद झाले. तरुण पिढी व्यसनापासून दूर राहिली. दारुडय़ा नवऱ्यांकडून होणारी मारहाण थांबली. दारूमध्ये वाया जाणारा घामाचा पसा संसाराला लागल्यानं सुखाचे घास पोटात पडू लागले.
ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी-सक्षम व्हाव्या यासाठी रेखानं मदतीचा हात देऊ केला आहे. माविमच्या माध्यमातून लोकसंचलित साधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. हातकणंगले या तालुक्याच्या ठिकाणच्या केंद्राचे अध्यक्षपद रेखाकडे आहे. बचत गटासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी बँक मित्रा ही संकल्पना राबविली जात आहे. रेखा बँक मित्रा प्रभावी काम करीत आहे. एखाद्या बचत गटासाठी अर्थसाहाय्य दिले जावे अशी शिफारस रेखाने केली की, बँका बिनदिक्कतपणे अर्थसाहाय्य करतात, एवढा विश्वास रेखानं निर्माण केला आहे. रेखा अध्यक्ष असलेल्या हातकणंगलेतील लोक संचलित केंद्राने आजवर पावणेआठ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. १२२ बचतगटांना अर्थसाहाय्य झाले असून माविमचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब िझगार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील या महिला पशुपालन, कुक्कुटपालन, शिलाई मशीन, ब्युटीपार्लर, चप्पल विक्री, झाडू विक्री असे विविध प्रकारचे व्यवसाय करीत पसे मिळवत संसारात सुखाचे क्षण पेरीत आहेत.
सामाजिक संघर्षांचे लढे आणि धडे देणाऱ्या रेखाने सांस्कृतिक, क्रीडा उपक्रमांमध्येही योगदान दिले आहे. तिच्या बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे लेझीम पथक सुरू केलं आहे. गावातील कांबळेसरांच्या मार्गदर्शनाखाली अठरा महिला लेझीम खेळण्यात पारंगत झाल्या आहेत. यामध्ये पंचावन्न वर्षांच्या यशोदा साठे यांचाही समावेश आहे. मिळालेल्या मानधनातून स्वत:चे लेझीम, हालगी, घुमके असे साहित्य घेत त्या स्वावलंबी बनल्या आहेत. जवळपास सात-आठ वर्षांच्या सकारात्मक, संघर्षमय जगण्यातून रेखाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे.
नवऱ्यापासून फारकत घेतलेली एक दलित तरुणी आत्मनिर्भर झाली आहे. तालुक्यात कोठेही महिलांवरील अन्यायाची माहिती मिळाली की, ती तात्काळ मदतीसाठी धावते. रेशनवरील धान्य मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत राहते. त्यातून अंत्योदय योजनेचे स्वस्त किमतीतील धान्य गरिबांच्या मुखापर्यंत पोहोचवते. रॉकेल विक्रेत्याला जत्रेच्या दिवशी गावात येऊन विक्री करण्यास भाग पाडते. अशी किती तरी प्रकरणे तिच्या संघर्षमय गाथेत समाविष्ट आहेत. कधी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकांची गाऱ्हाणी मांडते तर कधी जिल्हा पोलीसप्रमुखांना महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यांची माहिती कथन करते. तिच्या बेडर मांडणीतून प्रश्नही सुटत राहतात.
खेडय़ात राहणाऱ्या आणि कौटुंबिक िहसाचाराची बळी पडलेल्या रेखा दानवे हिने आत्मनिर्भर होत केवळ दलितच नव्हे तर गावातील अन्य महिलांनाही प्रगतीची द्वारे खुली केली आहेत. तिच्या संघर्षांची आणि विधायक कामाची मशाल अनेक महिलांना प्रकाशाची पाऊल वाट दाखवत आहे.

दयानंद लिपारे
                                                                                                                   मागील लेख वाचा

No comments:

Post a Comment