या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३१) नवदुर्गांच्या हाती नवी आयुधे

      जगाला महिलांचे कनवाळू रूप परिचित आहे त्याचबरोबर रणरागिणी म्हणूनही ती सुपरिचित आहे. पौराणिक काळातील युद्धांमध्ये, ऐतिहासिक काळातील संग्रामामध्ये स्त्रीशक्तीने गाजवलेला इतिहास आपण ऐकतो. आता काळ बदलला आहे. युद्धसज्ज होण्यासाठी आता ढाली-तलवारी नव्हे तर ङ्गायटर प्लेनची गरज आहे. आकाशाला कवेत घेणारी, अचाट वेग आणि अङ्गाट सामर्थ्याने शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी, क्षेपणास्त्रांनी सज्ज ङ्गायटर प्लेन आजपर्यंत महिलांच्या कक्षेबाहेर होती. मात्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महिलांना लढाऊ विमाने चालवण्याची तसेच प्रत्यक्ष युद्धभूमीवर शौर्य गाजवण्याची संधी जाहीर झाली आणि या तळपत्या तेजासाठी नवे अवकाश मोकळे झाले. या संधीमुळे स्त्रीला एक नवे क्षितिज मिळाले आहे, असेच म्हणावे लागेल. महिलांना संधी मिळाली की त्या त्याचे सोने करतात. वैद्यकशास्त्र, अंतराळ, विज्ञान, संरक्षण, राजकारण आदी क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. संधी आणि विश्‍वास हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत. जगातील अनेक देशांनी महिलांना युद्ध आघाड्यांवर सामावून घेतले आहे. भारतातही लष्करातील काही महत्त्वाच्या पदांवर महिला आहेत, परंतु त्यांना युद्ध आघाडीवर पाठवले जात नव्हते. महिलांना युद्ध आघाडीवर पाठवले तर त्यांना युद्धबंदी करण्याची तसेच त्यांच्या शारीरिक दुर्बलतेचा गैरङ्गायदा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. असे असले आणि शारीरिक मर्यादा असल्या तरी महिलांनी त्यावर मात केल्याची अनेक उदाहरणे जगात आहेत. कठोर परिश्रम आणि सरावाच्या जोरावर महिला सक्षम होऊ शकतात. युद्धतंत्र शिकवले तर त्या पुरुषांवरही मात करू शकतात, असा विश्‍वास जगात वाटायला लागला आहे. विमान उड्डाण, हेलिकॉप्टर उड्डाणात महिलांनी त्यांचे कसब दाखवले आहे. हजारो प्रवाशांचा जीव त्यांच्या हातात असतो. आता प्रवासीही त्यांच्यावर विश्‍वास टाकायला लागले आहेत. असे असले तरी त्यांच्यावर अजून ङ्गायटर विमाने चालवण्याची जबाबदारी भारतीय वायुदलाने टाकली नव्हती, परंतु हवाई दलप्रमुख अरुप राहा यांनीच आता महिलांना ङ्गायटर विमान चालवायची संधी द्यायचे जाहीर केले आहे. त्यांचे हे वक्तव्य येऊन आठ दिवस होत नाहीत तोच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी महिलांना भूदल, नौदल आणि वायुदल अशा तीनही क्षेत्रात संधी देऊन प्रसंगी त्यांना युद्ध आघाडीवर पाठवण्याचे जाहीर केले आहे. युद्ध आघाडीवर जाणे इतके सोपे नाही. मोठे आव्हानात्मक क्षेत्र आहे, परंतु हे आव्हानही महिला लिलया पेलतील, यात कोणतीही शंका नाही. गेल्या पन्नास वर्षांमध्ये भारतासह जगातील अनेक देशांमधील महिलांनी राष्ट्रप्रमुख, परराष्ट्रमंत्री आदी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. असे असले तरी दक्षिण आङ्ग्रिकेतील एका देशात महिलेला राष्ट्रप्रमुख होण्याची संधी जगात सर्वात आधी मिळाली. राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान ही पदे नागरी सर्वोच्च पदे असली तरी त्यांच्याकडे सेनादलाचे प्रमुखपदही असते. इंदिरा गांधी यांनी १९७२ मध्ये बांगलादेशाची निर्मिती करून आपल्या कणखरपणाचा प्रत्यय दिला होता. प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्यापेक्षाही युद्धभूमीवर विजय कसा मिळवायचा, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. अमेरिकेला आपले आरमार परत न्यायला त्यांनी भाग पाडले. मार्गारेट थॅचर, सिरीमाओ भंडारनायके, बेनझीर भुट्टो आदींनी जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवला. जर्मनीच्या अध्यक्ष अंजेला मर्केल, हिलरी क्लिटंन या सध्या जागतिक व्यासपीठं गाजवत आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र सभेत पाकिस्तानी प्रतिनिधीला निरुत्तर केले होते. भारतात भूदल, नौदल, वायुदलात महिलांना कर्नलपदापर्यंतची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यांना अजूनही जबाबदारीची मोठी संधी देण्यात आलेली नाही. युद्धनौका किंवा पाणबुड्यात महिलांना पाठवले जात नाही. भूदलातही युद्धभूमीवर महिलांना पाठवले जात नाही. मालवाहू तसेच प्रवासी वाहतुकीची विमाने घेऊन जगभर संचार करत असताना महिलांना सुपरसॉनिक विमानासारख्या विमानाचे सारथ्य करू दिले जात नाही. भारत स्वतःला पुरोगामी समजतो. महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये संधी दिल्याचे कौतुक करून घेतो, परंतु तरीही प्रतिगामी समजल्या जाणार्‍या पाकिस्तानने लष्करात महिलांना संधी देण्याबाबत भारतावर आघाडी घेतली आहे. भारत, कॅनडा, नॉर्वे, डेन्मार्क, पोर्तुगाल आदी देश लष्करात महिलांना संधी देण्याबाबत स्थितीवादी आहेत. त्या तुलनेत पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड, रशिया, तुर्कस्थान आदी देशांनी महिलांकडे अगोदरच लढाऊ विमानाचे प्रमुखपद सोपवले आहे. बांगलादेशमध्ये तर युद्धनौकांचे प्रमुखपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. भारतीय संरक्षण दलात महिलांना संधी देण्याबाबत गेल्या साठ-पासष्ट वर्षात केवळ उलटसुलट चर्चाच झाली. महिलांनीच आपले कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध करून दाखवल्याने लष्करालाही आपली मानसिकता बदलावी लागली. भारतीय संरक्षण दलात सध्या महिला अधिकार्‍यांची संख्या मर्यादित आहे. एकीकडे संरक्षण क्षेत्रासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, अशी कायम ओरड असताना अर्ध्या अवकाशाला संधीपासून कायम दूर ठेवण्यात आले. मुंबईवरील हल्ला, बॉम्बस्ङ्गोट किंवा अन्य महत्त्वाच्या दहशतवादीविरोधी मोहिमांपासून महिला अधिकार्‍यांना कायम दूर ठेवण्यात आले. भूदलात १४३६, नौदलात ४१३ आणि वायुदलात ९४ एवढ्याच महिला अधिकारी कार्यरत आहेत. संरक्षण क्षेत्रातील महिलांना १४ वर्षांनंतर निवृत्ती दिली जाते. तेथेही त्यांच्यावर पुरुष सहकार्‍यांच्या तुलनेत अन्याय होतो. कायम नियुक्तीबाबत त्यांचा लढा अजून सुरूच आहे. देशभक्ती, सचोटी, चिकाटी ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही तर महिलाही तेवढ्याच ताकदीने हे गुण सिद्ध करू शकतात. आझाद हिंद सेनेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणार्‍या महिला आणि स्वातंत्र्ययुद्धात महिलांचा नोंदवलेला सक्रिय सहभाग पाहिला तर त्यांच्यावर एकदा विश्‍वास टाकून पाहायला काहीच हरकत नाही, असे वाटून राहा यांनी भारतीय वायुदलातील लढाऊ विमानांचे सारथ्य करण्याची जी संधी देण्याचे सूतोवाच केले ते जास्त महत्त्वाचे आहे. लढाऊ विमान शत्रूच्या हद्दीत पडले तर महिला पायलटला कसा त्रास दिला जाईल, त्यांच्यावरच्या वेगवेगळ्या अत्याचारांचे काय, असा प्रश्‍न काहींच्या मनात उत्पन्न झाला असेलही, परंतु प्रत्येक वेळी लढाऊ विमाने शत्रूच्या हद्दीत जात नाहीत. त्यांना तसे वारंवार जावे लागत नाही. हवेतूनच शत्रूची विमाने पाडता येतात. तेवढे कौशल्य महिला प्राप्त करू शकतात. सारंग या विमानाची पहिली पायलट झालेल्या दीपिकाला किती खडतर प्रशिक्षणातून जावे लागले हे तिच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. पुरुष सहकार्‍यांच्या बरोबरीने प्रशिक्षण घेताना तिचा शारीरिक आणि मानसिक कस लागला होता. संधी मिळायचा अवकाश, महिला कशाचीही सवलत मागत नाही, हे वारंवार अनुभवाला आले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे आव्हानात्मक दालन खुले झाले आहे. राहा आणि पर्रिकर यांनी घोषणा केली म्हणजे लगेच उद्यापासून महिलांना युद्धभूमीवर लढायला जावे लागेल, असे नाही. ही प्रक्रिया दीर्घकालीन असते. धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर महिलांसाठी किती जागा ठेवायच्या, त्यांची भरती कशी करायची, सामान्य सैनिकापासून ब्रिगेडियरपर्यंतच्या अधिकार्‍यांचे स्वरूप कसे ठेवायचे हे ठरवावे लागेल. ते ठरल्यानंतर महिलांना खडतर प्रशिक्षणाला तोंड द्यावे लागेल. त्यासाठी दोन-तीन वर्षे सहज निघून जातील. आता केवळ भूमीवरून युद्ध लढले जात नाही. भारतात तर पाकिस्तानकडून ‘प्रॉक्सी वॉर’ खेळले जाते. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अनेक मोहिमा राबवाव्या लागतात. त्यांचेही कठोर प्रशिक्षण द्यावे लागेल. अतिरेक्यांशी लढताना त्यांचे मनोधैर्य उच्च प्रतीचे असले पाहिजे, यावर भर दिला जाईल. पर्रिकर यांनी महिलांना थेट रणगाडे चालवण्याचे प्रशिक्षण का देऊ नये, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. महिलांना सर्वच क्षेत्रात समान संधी देण्याची भूमिका स्वागतार्ह आहे. संयुक्त अरब अमिरातीत ङ्गायटर विमान चालवण्याची जबाबदारी महिलांवर आहे. या एका मुस्लिम देशातील महिलांनी ‘इस्लामिक स्टेट ऑङ्ग इराक ऍण्ड सीरिया’च्या तळावर हल्ले करून अनेक तळ उद्ध्वस्त करण्याचे काम केले. तसेच काम भारतीय महिलांनी यापुढे केले तर आश्‍चर्य वाटायला नको. युद्धतंत्रात आता अनेक बदल झाले आहेत. ते बदल महिलांना शिकवावे लागतील. महिलांच्या प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. ते करण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे पर्रिकर यांनी जाहीर केले आहे, ते जास्त महत्त्वाचे आहे. सैनिकांच्या हाती देश सुरक्षित आहे, असे म्हटले जाते. आता त्यात महिलांच्या हाती देश सुरक्षित आहे, असे म्हटले जाईल. हा काळाचा महिमा आहे. महिलांच्या सबलीकरणाच्या दिशेने टाकलेले ते एक पाऊल आहे.

                                                                                                                                    मागील लेख वाचा

No comments:

Post a Comment