या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२०) प्रेम देवाचे देणे

'वह कभी अपनी

जफापर न हुए शर्मिंदा।

हम समझते रहे

पत्थर भी पिघल जाते है।।'
माझ्यावर अन्याय, अत्याचार करूनही त्याला म्हणजे माझ्या जीवाच्या जिवलगाला त्याबद्दल थोडीही जाणीव नाही की, शरम नाही. आम्हाला वाटलं होतं, आमची अशी बिकट अवस्था पाहून त्याला पाझर फुटेल, पण नाही. दगडालाही फुटला असात! पाझर फुटतोसुद्धा. अर्थात दगडाला पाण्यापुढे शरणागती पत्करावी लागते की, पाणीच दगडाचं हृदय फोडून वाहातं, हे कोण सांगणार? त्याचं शास्त्र सांगितलं की, काव्य संपून जातं.
वयात आल्यावर जेव्हा प्रेमानं मला जाग आणली तेव्हा त्यानं थेट हृदयालाच गुलाबी स्पर्श केला. स्वप्न सौंदर्याच्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी त्यानं आमंत्रण दिलं. हृदयाची एकेक पाकळी विकसित होत गेली. ती धूसर धुक्यातून आलेली स्वप्नपरी कोण होती, अजूनही कळलं नाहीए. प्रत्येक दिवस स्वप्नासारखा सरत होता. रात्र एखाद्या स्वर्गसुखाच्या नंदनवनात मैफिल भरवत होती. तिच्या रंगविभ्रमांनी मला लावण्यपूजनाचे मंत्र दिले. तिच्या उदासतेनं प्रीतीचं भरभरून दान दिलं. माझ्या कवितेची ती सुरुवात होती..
प्रीतीच्या स्मृतीनं वियोगातही सुखाचा मी सुयोग साधला. त्या आनंदी क्षणांनी नेहमीच मला अंतर्मुख केलंय. स्वप्नातल्या सुखांना सत्यात आणण्याची जादू केवळ प्रेमच करू शकतं. या सुखांना अश्रूंचा ओलावा असतो. आशेचा फुलोरा असतो. केवळ एका प्रसन्न स्मितरेषेनं आयुष्यात फुलपंखी ध्येय निर्माण होतं. कोरड्या जीवनाला प्रेमसागराचा सहवास लाभल्यावर एकटेपणाला दुकटेपणाचा प्रवास आवडू लागतो. कालांतरानं दुकटेपणा जातो, 'एकटेपणा' येतो. ही एकरुपता रसदार असते.
आंतरिक संघर्षात मन आणि बुद्धी गुंतली असताना अहंकार उसळून वर येत होता. त्या स्वप्नपरीनं आयुष्याचा आरसा दाखवला. तेव्हा कुठं दिलासा मिळाला अन् अहंकाराला कुठलाही पुरस्कार न मिळाल्यानं तो म्हणाला, 'बघून घेईन.' म्हणजे 'तुला सोडणार नाही' असा अर्थ!
आता त्या स्वप्नांत काय उरलंय?
आठवणी!
त्याच आठवणींना दु:खांच्या आसवांची वर्षा हवीए.. ती स्वप्नपरी पुन्हा कधी भेटण्याची सुतराम शक्यता नाहीए. स्वप्नांची समाधी आणि हे उद्ध्वस्त मन.. यांच्याशिवाय माझ्या मालमत्तेत काहीच उरलं नाहीए. देही देऊन टाकलं तर कफल्लकच होणार मी. एकवेळ पैश्यांची खंडणी देऊ शकतो आपण, पण आसवांची खंडणी आठवणींनी मागावी म्हणजे स्वप्नपरीसारख्याच आठवणी पाषाणहृदयी म्हणायला हव्यात. व्याकुळतेचा कोणी वाली नसतो, हेच खरं. खिन्न अवशेषांचा राजा म्हणून मिरविण्यात कसली आलीय मदरुमकी?
अस्वस्थ शांततेच्या राज्यात अधिराज्य गाजविण्यात काय पराक्रम आहे? बेचैनीला मौनाच्या पांघरुणाखाली झाकून ठेवणं सोपं नसतं. प्रीतीचं हे रहस्य जगाची दृष्ट लागू नये म्हणून अस्तित्वालाच काजळाची तीट लावावी लागते. आपल्या खत्रूड नशिबाची नजर लागू नये म्हणून!
मनाचा कोंडमारा हा प्रेमाच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा. उदासीनता हीच एकाग्रतेकडे नेते का? भूतकाळाला साद घालावी लागत नाही. सर्मपणाच्या अंधुक प्रकाशात अभिलाषेची गाणी गात, प्रीतीच्या स्मारकाला ती अर्पण करीत, तारुण्याच्या संगीताला लपविता येत नाही. त्या स्मारकाला वाहिली जाणारी शब्दांची फुलं कधीही कोमेजत नाहीत. कारण त्यांना आसवांची शिंपण केलेली असते!
जागतिक कीर्तीचा लेबनीज लेखक खलील जिब्रान म्हणतो, 'काही जणांना वाटतं, प्रेम हे पुष्कळ वर्ष एकत्र राहून प्रदीर्घ सहवासानं निर्माण होतं. सतत संगतीनं प्रेम अंकुरतं असं वाटतं. वेडे लोक! प्रेम दोन जीवांच्या मीलनानं निर्माण होतं. हे मीलन एका क्षणात झालं नाही, तर ते एका वर्षात, फार काय एका शतकातही पूर्ण होणं शक्य नाही.'
याचा अनुभव नंतर आला. स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर आल्यावर. वास्तवाच्या प्रखर उन्हात पोळून निघाल्यावर. सत्याच्या घरात निवास करताना कल्पनांचा प्रवेश नसतो, हे समजल्यावर. या सप्टेंबरमध्ये श्रावण मावळलाय. महिना भाद्रपद लागलाय. हवा तेवढा पाऊस न झाल्यानं, सर्वत्र उदास वातावरण पसरलंय. येत्या मे महिन्यात पाणीकपात निश्‍चित आहे. गणेशोत्सवात असेच देखावे आहेत. ज्या मंडळांना मैदान आहे, त्यांनीच मंडप उभारले आहेत. प्रत्येक राजकारण्यानं याबाबतीत नेहमीप्रमाणे नम्रपणे, न्यायालयाच्या निर्णयास मान्य करून, अठरा इंचांपेक्षा मोठी गणेशमूर्ती न आणल्यानं वृत्तवाहिन्यांना दहा दिवस आग लावण्यासाठी कुठलीच बातमी दमदार वाटत नाहीए हे बघून विद्वान प्रवक्ते टिव्हीवर झळकून झळकून कंटाळलेत! वृत्तवाहिन्यांना विश्लेषक मिळत नसल्याने ते रिक्षावाले, कामवाल्या बायांकडे वळले आहेत.



कांदा महाग झाल्यानं लोकांनी कांदा न खाण्याची शपथ घेतल्यानं साठवलेला हजारो टन कांदा सडल्यानं साठेबाजांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येताहेत. दुष्काळ दूर करू शकत नाही. म्हणून संबंधित अधिकार्‍यांनी, मंत्र्यांनी गळफास लावून घेतल्याच्या बातम्या गणेशोत्सवात आल्यानं लाऊडस्पीकर्स बंद आहेत. जुगार बंद, नाचगाणी बंद. विद्यार्थ्यांना या स्मशानशांततेत अभ्यास करणं अशक्य झालंय. एक वर्ष कुणीही कुठलीही टिव्ही मालिका बघायची नाही, हे ठरवून सर्वांनी आपले टिव्ही बंद ठेवलेत. वाहिनीवाले भिकेला लागलेत. वृत्तपत्रांचा खप प्रचंड वाढल्यानं सोळा पानांची बत्तीस पानं झालीएत. आपल्याला भविष्यात मधुमेह होऊ नये म्हणून सर्वांनी गोड खाणं बंद केलंय. साखर मिठाच्या भावात विकली जात आहे. परंतु ग्राहकच नसल्याने काळाबाजार कसा करावा, हेच व्यापार्‍यांना कळेनासं झालंय. मंत्रालय, मनपा वगैरे देण्याघेण्याच्या ठिकाणी गर्दी नसते. सरकारी कर्मचार्‍यांना कुणी साहेब म्हणत नसल्यानं जराही शरम वाटत नाही. वरकमाई नको, पण खरी कमाई तरी पगार म्हणून द्या, या मागणीसाठी आंदोलन केलं, तर कुत्रंही तिकडे फिरकणार नाही. या भीतीनं युनियन लीडर परदेशात ठेवलेला स्वीस बँकेतील पैसा कुठल्या देशातल्या बँकेत ठेव्ीावा, याची पाहणी करायला गेले आहेत.

थोडक्यात काय 'या आणि शिका' या थोर विचारानं प्रेरित होऊन इंग्लिश माध्यमाच्या शाळेत फुकट शिक्षण दिले जात आहे. घटस्फोटासाठी फुकट शिक्षण दिले जात आहे. घटस्फोटासाठी तारीख पे तारीख पडणं बंद झाल्यानं कोर्टकचेर्‍या ओस पडल्या आहेत. रेल्वेतही गर्दी कमी झाल्यानं प्रत्येक गाडी नफ्यानं भरलीय. उपनगरीय बससेवा नफ्यात चालली आहे, तर समस्त नागरिक आणि राजकारणी एकत्र बसून महासत्तेची वाट पाहात आहेत. काहीही न करता भारत देशात मंदी का नाही, म्हणून विदेशी विचारवंतांची झोप उडालीय. बॉम्बस्फोट नाही. सीमेवर चकमक नाही. अमेरिका भिकेला लागलीय. पाकिस्तान आणि हिंदुस्थान पुन्हा एक झाल्यानं चीनची झोप उडालीय..
हे सगळं एका रात्रीत कसं काय घडलं?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी कपडे घातले. घरात कपडे घातलेले असतात माझे, पण बाहेर जाताना बरे कपडे घालतो. रस्त्यावर आलो. सगळीकडे सन्नाटा.
मी घाबरलो. काहीही कारण नसताना गाडीचे हॉर्न सतत वाजवणारे ड्रायव्हर्स तेच असून निमुटपणे गाड्या कसे काय चालवू शकतात! देशद्रोही अभिनेत्यांचे सिनेमे कुणीही पाहात नसल्याने अन् गुन्हेगार कलावंतांना मार्केट नसल्याने ते सगळे हॉलीवूडला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून 'दे दे, भगवान के नाम पे काम दे दे' करीत त्यांचे सेक्रेटरी फिरताहेत, असंही समजलं. समस्त मॉलसुद्धा ओस पडल्यानं 'रस्तेका माल सस्ते में' असे भलेमोठे फलक लावून चौवीस तास उघडे पडले आहेत. सर्वत्र आनंदीआनंद. रस्त्यावर क्रिकेट खेळणारी मुले आणि सार्वजनिक बगीच्यात तरुण, प्रेमी जीवांची तुफान गर्दी वा! हे सगळं कोणे एकेकाळी आपल्या पूर्वजांनी न वर्तविलेलं भविष्य कलियुगात खरं ठरलं होतं. मी आनंदानं ओरडलो, 'या..हू! या..हू!!'



'काय रे, काय झालं?' या प्रश्नानं मी झोपेतून जागा झालो. समोर आई उभी होती.


                                                                                                                   मागील लेख वाचा