या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

८) आई तू उन्हातली सावली!

  आई’ या नावातचे सर्व काही सामावले आहे. देव प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही. म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली.

आई तू उन्हामधली सावली 

आई तू पावसातली छत्री

आई तू थंडीतली शाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी

आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी    

     माझी आई ही एक सर्वसामान्य स्त्री होती, पण तिला तिन्ही देवी प्रसन्न होत्या. एक म्हणजे अन्नपूर्णा, ती छान सुगरण होती. पाककला स्पर्धेत तिला बक्षीस मिळायचेच मिळायचे. ती पुरणपोळी, बेसन लाडू, रवा लाडू, बदामी हलवा, पुरी-भाजी, खिचडी इतकी उत्कृष्ट बनवायची की, आम्ही ती चव कधीच विसरू शकत नाही.

     दुसरी देवी म्हणजे सरस्वती. ती खूप हुशार होती. कोणताही निबंध लिहायला सांगितला तर ती उत्कृष्ट लिखाण करायची. त्या वेळची ती अकरावी मॅट्रिक झाली होती. अक्षर मोत्याच्या दाण्यासारखे सुंदर होते. इंग्रजीतसुद्धा छान लिखाण करायची. कोणाचा कोणत्या कामाचा जर अर्ज भरला तर त्या माणसाचे काम झालेच म्हणून समजा, अशी होती आई माझी.
     तिसरी देवी म्हणजे लक्ष्मी. आम्ही गडगंज श्रीमंत नव्हतो. परंतु ब-यापैकी थोडीफार श्रीमंती होती. परंतु पैशाचा गर्व तिला कधीच नव्हता. लहानपणापासून तिने दूध पोहोचवण्याचे काम केले. अतिशय काबाडकष्ट करून शिकली. आम्हाला तिन्ही मुलांना छान शिक्षण दिले. चांगल्या शिकवणी, चांगले संस्कार दिले. ती नेहमी म्हणायची दुस-यांना मदत करा, अन्याय सहन करू नको, दुस-यांना उलटून बोलू नका, मेहनत करा, कोणत्याही स्पर्धेत भाग घ्या, त्यामुळे आपल्याला अनुभव मिळतो. नंबर यायलाच हवा, असं नसतं. एक हरतो तेव्हाच दुसरा जिंकतो.
     आमचे पप्पा आम्हाला खूप लवकर साडून गेले. पण तिने तिचे दु:ख बाजूला सारून आम्हाला छान वाढवले. आमच्या दोन्ही बहिणींची (मुलींची) लग्ने लावून दिली. आमच्या घरात खूप मोठी चोरी झाली. पण ती खचली, पण न डगमगता पुन्हा उभारीने कामाला लागली.
तिला स्तनाचा कॅन्सर झाला. एक स्तन काढून टाकले. तिला खूप त्रास झाला. त्यातूनही मुलांसाठी, आमच्यासाठी ताठ उभी राहिली. ती कामालाच देव मानायची. दूधविक्रीचा व्यवसाय करायची. त्यात तिला खूप दम लागला. तिचा आवाज बंद झाला. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
     आम्ही तिला मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे हृदयाच्या झडपेचे ऑपरेशन झाले. तीन दिवस शुद्धीत नव्हती. तेवढे दिवसच ती झोपली. नंतर दीड महिना ती झोपली नव्हती. फक्त बसून झोपायची. ती थकली होती. पण तिने जगण्याची आशा सोडली नव्हती. एक दिवस ती खूप बरी असायची. पण एक दिवस अतिशय खराब असायचा. तिची तब्येत सुधारण्याऐवजी खालावतच गेली. तिला बोलता येत नव्हतं. आवाज ऐकू यायचा नाही. ती आमच्याजवळ बोलण्यासाठी खूप कासावीस व्हायची. डॉक्टरांना कळत नव्हते, की काय झालेय ते. शेवटी एमआरआय काढला. त्यात तिला लिव्हरला कॅन्सर झाल्याचे कळले. दोन डॉक्टर तिच्यासमोर इंग्रजीत बोलत होते. तिला समजले आपल्याला काय झालंय ते. पण तिने आम्हाला कळू दिले नाही. तिने माझ्या भावाला सांगितले की, मला घरी घेऊन चला, मी बरी येईन. तिची घरी येण्याची खूप प्रखर इच्छा होती. माझा भाऊ दिवस-रात्र तिच्याजवळ असायचा. घरी यायचा नाही. त्याने तिची खूप सेवा केली. आम्ही तिला घरी आणले. तिच्यासाठी हॉस्पिटलमध्ये असते तशी कॉट आणली. तिच्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर आणला. २३ ऑक्टोबर २०१२ रोजी घरी आणले. ती रात्र गेली.
      दुस-या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी दसरा होता. तिने माझ्या काकीला छान जेवण करायला सांगितले. १० वाजल्यानंतर तिची तब्येत थोडी-थोडी बिघडायला लागली. भावाने दुसरा मोठा ऑक्सिजन सिलिंडर आणला. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिने काका-काकींना जेवण करायला सांगितले. मी तिच्याजवळ उभी राहून स्वामींचे नामस्मरण करत होते. माझ्या भावांना जेवायला सांगितले. तो रडत रडतच जेवला. नंतर तिने जेवायला मागितले. माझ्या भावाने तिला स्वत:च्या हाताने जेवण भरवले. ती जेवली. दीड महिना ती हॉस्पिटलमध्ये आयसीयूत असल्याने पाहायला देत नव्हते. म्हणून आज सकाळपासून तिला माणसे भेटायला येत होती.
     संध्याकाळी साडेसात वाजता मी तिच्या बाजूने उठली व तिला म्हटले घरी जाऊन येते. तेवढय़ात तिने मला घरी जा म्हटले व भाऊ जवळ बसला, त्याच्या खांद्यावरच मान टाकली. मला अगदी जरासाठी फसवून गेली. आम्हाला खूप वाईट वाटले. आमचा आधारच हरवला होता. सगळय़ांना पोरकं करून ती गेली होती. आम्हाला तिची प्रत्येक क्षणाला आठवण येते. तिची ती आमच्याशी बोलण्यासाठीची धडपड आम्हाला अस्वस्थ करते. तिचा निरागस चेहरा, आमच्याजवळ जगण्यासाठी केलेली धडपड, तिचे ते बोलके डोळे आठवले तरी आमचे हृदय गलबलून येते. अशा वेळी वाटते, जन्मोजन्मी हीच आमची आई असावी.